Saturday, March 5, 2016

Shree Navanath Bhaktisar Adhyay 26 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सव्वीसावा (२६) भाग २/२


Shree Navanath Bhaktisar Adhyay 26 
Surochan gandharv had become donkey because of curse by God Indra. Surochan made Mithula Nagari into copper as per wish of king Satyavrat. Hence Surochan married with Satyavati who was daughter of king Satyavrat. Satyavati became mother of a boy who was named as Vikram. After birth of Vikram, Surochan saw his face and became free from the curse and went to swarga. Vikram grew older and from his childhood had all the virtues of a king. He was working as a guard when he heard that Bhartari was telling to the traders. Vikram immediately took his sword and fought with the demon and killed the demon. He carried out everything as told by Bhartari. He took the gems from hands of demon. Vikram thought that Bhartari would be an incarnation and not ordinary man. So he took Bhartari with him to his house. Introduced him to his mother asked Bhartari to live with them. In the next 27th Adhyay Dhundusut Malu from Narahai family would tell us what happened next.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सव्वीसावा (२६) भाग २/२ 
महीं पडतां चित्रमा गंधर्व । विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध ।
वस्त्रें भिजवूनि रुधिरें शुद्ध । भाळीं टिळा रेखिला ॥ १०१ ॥
तों राक्षस होऊनि गतप्राण । दिव्यदेहीं निघे तेथून ।
गंधर्वरुपीं स्वपदा पावोनि । विक्रमातें वंदिलें ॥ १०२ ॥    
मग गंधर्व करितां स्वयें दृष्टी । विमान उतरलें महीतळवटीं ।
त्यांत आरोहण करितां जेठी । विक्रम पुसे तयातें ॥ १०३ ॥
म्हणे महाराजा राक्षस पूर्ण । स्वर्गा करुं जासी गमन ।
ही तो कळा राक्षसांकारण । दुर्लभपणीं वाटतसे ॥ १०४ ॥
मग शिवफांसेखेळापासून । विक्रमा सांगितलें शापकथन ।
आपुलें चित्रमा गंधर्व नाम । सांगूनि गेला स्वस्थाना ॥ १०५ ॥
येरीकडे प्रेतशरीरीं । चांचपूनि पाहे करीं ।
तों चार रत्नें मुष्टीमाझारीं । तेजःपुंज देखिलीं ॥ १०६ ॥
तिघे चिंतामणी वैडूर्यवंत । सकळ कामद चवथें अत्यद्भुत । 
ऐसीं चारी रत्नें विख्यात । सकळ कार्या चालती ॥ १०७ ॥
विक्रम देखतां हर्षवंत । मग तो भर्तरीतें धन्य म्हणत ।
ऐसा पुरुष प्रज्ञावंत । अवतारदक्ष म्हणावा ॥ १०८ ॥
जैसा वृक्षांत कल्पतरु । दैन्यहारी सुखपरु ।
तन्न्यायें नगरांत हा नरु । श्रेष्ठ जगीं भासतसे ॥ १०९ ॥
कीं पशूंमाजी धेनुजाती । त्यांत सुरभी कामना द्रवती ।
तन्न्याये मनुष्यजातीं । श्रेष्ठ जगीं भासतसे ॥ ११० ॥
कीं रत्नांमाजी वैडूर्यवंत । निघती चिंतामणी उपकारस्थित ।
तन्न्यायें मनुष्यांत । श्रेष्ठ जगीं भासतसे ॥ १११ ॥ 
कीं पाषाणजाती उपकारस्थित । परीसपणातें मिरवत ।
तन्न्यायें मनुष्यांत । श्रेष्ठ जगीं भासतसे ॥ ११२ ॥ 
ऐसी भावना धरुनि चित्तीं । आणिक कामना वरीतसे पुढती ।
ऐसा पुरुष स्वसांगाती । त्रैलोक्यांत मिरवेल ॥ ११३ ॥
ऐसा विचार मार्गें करुन । पाहतां झाला द्वारग्राम ।
रुधिरटिळा द्वारासी उत्तम । चर्चूनियां निघाला ॥ ११४ ॥
ऐसा निघून अतित्वरा । आला व्यवसायिकाशिबिरा ।
तंव ते भर्तरीस घालूनि घेरा । सकळ बैसले वेष्टुनी ॥ ११५ ॥
त्यांत जाऊनि मध्यस्थानीं । बैसला व्यवसायिकांत गुणी ।
परी बैसल्या दिसे तरणी । कीं नक्षत्रस्वामी नक्षत्रांत ॥ ११६ ॥
त्याचि रीतीं भर्तरीनाथ । कीं चंद्रज्योती तेजवंत ।
असो व्यवसायिक विक्रमातें । पुसती कोण तुम्ही जी ॥ ११७ ॥
येरी म्हणे व्यवसायिक । आम्ही असो राजसेवक ।
राजआज्ञें ग्रामरक्षक । देशावरी नांदतसों ॥ ११८ ॥
तरी सहजस्थितीं मनाची ओज । तुम्हां भेटीस पातलों सहज ।
उत्तम तुमच्या गोष्टी गुज । ऐकूनियां हर्षलों ॥ ११९ ॥
येरी म्हणे आमुच्या गोष्टी । उत्तम कोणत्या ऐकिल्या जेठी ।
विक्रम म्हणे तुम्हां दृष्टी- । सन्मुख पहारा देतसें ॥ १२० ॥
तुम्ही खाली कुशावर्ती । निकट पहारा देतों रात्रीं ।
तुम्ही बोलतां तितुकें निगुतीं । श्रवण होतसे आम्हांतें ॥ १२१ ॥ 
परी हें आतां असो कैसी । तुम्हांवरी धाडी आली विशेषीं ।
ते श्रुत झाली कैसी तुम्हांसी । म्हणोनि शोधा पातलों ॥ १२२ ॥
तुम्हांवरी आली धाडी । हे राया सकळ कळली प्रौढी ।
परी तुमच्या मुखीं कळतां निवाडी । रक्षण करुं तैसेंचि ॥ १२३ ॥
तरी ते तुम्ही दृष्टिव्यक्ती । तस्कर पाहिलें किती जमाती ।
येरी म्हणती एकशती । दृष्टिगोचर झाले जी ॥ १२४ ॥
विक्रम म्हणे तस्कर येतां । कैशी कळली तुम्हां वार्ता ।
येरी म्हणती कोल्हे भुंकतां । वर्णन केलें या वाचें ॥ १२५ ॥
स्वहस्तानें उठवून । भर्तरीसी दाखविती तयालागून ।
येरी म्हणे नामीं कोण । मिरवत आहे हा बावा ॥ १२६ ॥
व्यवसायिक म्हणती त्यातें । भर्तरी नाम आहे यातें ।
मग दृष्टीं पाहूनि प्रांजळवंत । पूर्ण ओळखी जाहली ॥ १२७ ॥
क्षणैक बैसवूनि नाना भाषण । व्यवसायिकांचें तोषवी मन ।
मग उठता झाला त्यांपासून । चालतां ग्रामीं संचरला ॥ १२८ ॥
तैसाचि जाऊनि आला एकांतीं । भेट झाली जकात्याप्रती ।
तंव मागिल्या घटकाराती । सदनाबाहेरी येतसे ॥ १२९ ॥
उदकपात्र विराजलें हातीं । जात होता दिशेप्रती ।
ते हटकूनि बैसविला क्षितीं । वदे त्यातें रसज्ञ ॥ १३० ॥
म्हणे आपुले ग्रामी कटक । वृषभथाटीं व्यवसायिक । 
तयांचें जकातीनाणें देख । हिशेबातें घेतले ॥ १३१ ॥       
तरी त्या वर्तल्या नाणीं । मी देईन त्रैअर्थगुणी ।
परी भर्तरी नामी तया पैं रत्नी । मागूनि घ्यावें महाराजा ॥ १३२ ॥
म्हणाल भर्तरी नामें कोण । तरी मम बंधु पाठीचें रत्न ।
कार्यविभक्त आत्मा होऊन । व्यवसायिकां हिंडतसे ॥ १३३ ॥
तरी तयाचें आमुचे संगोपन । केलिया थोर वाढेल धर्म ।
आणि पुण्ण्याचा स्थावर संगम । परलोकांतें मिरवेल ॥ १३४ ॥    
ऐशा बहुप्रकारयुक्ती । सांगितल्या जकातदाराप्रती ।
हें ऐकूनि ग्लानितमती । द्रव्यलोभें तोषला ॥ १३५ ॥
द्रव्यलोभ तरी कैसा । त्रिगुणार्थ होता ऐसा ।
मग मेलिया जेवीं जात ठसा । संजीवनी होऊनि आगळा ॥ १३६ ॥
तरी द्रव्य न म्हणावें अमृतवल्ली । निर्जीव मनुष्यासी संजीवनी ठेवी ।
आणि दुसरा मार्ग तयाजवळी । मायिकपणीं विराजे ॥ १३७ ॥
तरी धनाचे बहु भास । वर्ते सुखदुःखा लेश । 
धन कांता धवळार सुरस । सर्वसुखा संपादी ॥ १३८ ॥
धनें मोक्षाची पाहील वाट । धनें भोगील महीपाठ ।
धनेंचि नरक भोगील अचाट । यमपदा जाउनी ॥ १३९ ॥
धनाचा अपार तमाशा । सुसंग कुसंग खेळे फांसा । 
सर्व यशकर्ता सबळ पैसा । इष्टा नष्टा वर्ततसे ॥ १४० ॥
ऐसा तयासी विक्रम बोलतां । जकाती सहज आला होतां ।
विक्रमा ते कामदुहिता । पूर्ण करीन मी तुझी कीं ॥ १४१ ॥
ऐसें बोलूनि करतळवचन । देऊनि तोषविलें तयांचें मन ।
मग विक्रमातें बोळवून । शौचविधि सारिला ॥ १४२ ॥
सकळ झालें एकांतीं करणें । सेविता झाला आपुलें आसन ।
मग भुत्यांलागीं बोलावून । व्यावसायिकां पाचारिलें ॥ १४३ ॥
गोण्या माल टिपी लावून । हिशोबापरी बोलूनि धन ।
तंव तें व्यवसायिकीं आणून । तया करीं ओपिलें ॥ १४४ ॥
यावरी बोले जकाती । म्हणे व्यावसायिक ऐका युक्ती ।
भर्तरी नामें कोण जमाती । तुम्हांमाजी आहे रे ॥ १४५ ॥
येरी म्हणती उगलाचि पोसोनी । आहे आमुचे मंडळांगणीं ।
जकाती म्हणे आमुच्या नयनीं । कैसा आहे पाहूं द्या ॥ १४६ ॥
तंव त्यातें पाचारुनी । दाविते झाले विमुटखाणी ।
म्हणती हाचि आमुच्या गणीं । विराजित आहे महाराजा ॥ १४७ ॥   
मग जकाती पाहूनि भर्तरीसी । म्हणे हा प्रत्यक्ष महीचा शशी । 
कोणी तरी अवतारासी । महीलागीं विराजला ॥ १४८ ॥
तरी आतां असो कैसें । हा आपुल्या गांवांत असावा पुरुष ।
व्यवसायिक रानमाणूस । या गणीं योग्य दिसेना ॥ १४९ ॥
ऐसा तर्क आणूनि मनीं । बोलविला पाहूनि नयनीं ।
मग व्यवसायिकांचा मुख्य स्वामी । एकांतांत पैं नेला ॥ १५० ॥
एकांतीं नेतां म्हणे व्यवसायातें । तुमचे द्रव्य देऊं तुम्हांतें ।
माफीचिठी करुनि जी त्वरित । तुम्हांलागीं बोळवूं ॥ १५१ ॥
तरी तुम्ही पुन्हां परतोन । माल आणा सबळ भरुन ।
तोंवरी तुमच्या भर्तरीनें । ग्रामवस्ती येथें असावें ॥ १५२ ॥
तंव व्यवसायी बोले भर्तरीतें । तुम्हां निराश्रित ठेवूनि नाहीं जात ।
बाकी साकी येणें आम्हांतें । गांवामाजी उरली असे ॥ १५३ ॥
सकळ हिशेबप्रकरण । माहीत आहे जकात्याकारण ।
तरी त्याजपाशीं शेर घेऊन । तयासंमतीं वर्तावें ॥ १५४ ॥
मग अवश्य म्हणे भर्तरीनाथ । राहीन म्हणे सर्वांसंमतें ।
देणे घेणें सकळार्थ । उकळोनि येईन माघारा ॥ १५५ ॥
ऐसें म्हणोनि त्वरा करीत । व्यवसायी घेवोनि भर्तरीतें ।
येऊनि शीघ्र जकातगृहातें । तयाहातीं बोळविलें ॥ १५६ ॥
ओपिलें परी कैसें बोलून । कीं तुमचे गृहीं आमुचा गडी जाण ।
ग्रामावळीतें वसूल करुन । जकात तुमची सांवरील ॥ १५७ ॥
आम्ही येऊं पुन्हां परतोन । तोंवरी करा याचें संगोपन ।
आपुलें द्रव्य घ्या फेडून । उरल्या हातीं या ओपा ॥ १५८ ॥
ऐसें बोलूनि तयादेखती । ओपिते झाले जकातीहातीं ।
उत्तम भाषण पुसून तयाप्रती । शिबिराते पातले ॥ १५९ ॥
मालटाल उरला विकून । निघते झाले मग तेथून । 
येरीकडे विक्रमाकारण । पाचारिलें जकात्यानें ॥ १६० ॥
नेऊनि तयां एकांतासी । म्हणें केलें सांगितल्या व्रतासी ।
मग हिशेब दाखवूनि बेरजेसी । द्रव्य आणीं म्हणतसे ॥ १६१ ॥
ऐसें बोलता जकाती वचन । तों काढूनि देतसे एक रत्न ।
म्हणे हें तुजपाशीं असूं दे गहाण । संजायिपणासी ॥ १६२ ॥
तुझें द्रव्य त्रैभाग्यार्थें । देऊनि घेऊं स्वरत्नातें ।
ऐसें वदतां जकात्यातें । अवश्यपणीं होतसे ॥ १६३ ॥
याउपरी भर्तरीनिमित्यें । म्हणे बंधूचे ओळखीतें ।
न बोलूनि कांहींच त्यातें । भोजना पाठवा मम गृहीं ॥ १६४ ॥
नित्य नित्य भोजनीं गांठ । पडतां होईल ओळखी दाट ।
मग सहज बोलण्याचा मेहपाट (सवय) । खुणाखुण मिळेल कीं ॥ १६५ ॥
बाहेर निघाले उभयतांते । ऐसें सांगूनि एकांतातें । 
मग जकाती पाहूनि भर्तरीतें । विक्रमातें बोलतसे ॥ १६६ ॥
म्हणे विक्रमा ऐक वचन । आम्हांपासूनि शेर घेऊनि जाणें ।
तयाची पाकनिष्पत्ती करुनि जाण । हा गडी आमुचा संगोपा ॥ १६७ ॥
तुझ्या गृहीं तुझी माता । आहे विक्रमा पाकनिष्पत्तींकरिता ।
तरी या भर्तरीचे आतां । संगोपन करावें ॥ १६८ ॥
ऐसें विक्रम ऐकतां वचन । म्हणे स्वीकारीन तुमचें बोलणें ।
मग भर्तरी हात धरुन । स्वसदनासी पैं नेला ॥ १६९ ॥
द्वारानिकटीं टाकूनि वसन । त्यावरी बैसविला भर्तरीरत्न ।
चार घटिका करुनि भाषण । गृहामाजी संचरला ॥ १७० ॥                       
माता पाचारुनि सत्यवती । निकट बैसवूनि एकांती ।
तर्जनीखुणेनें दाखवूनि जती । वृत्तान्त सर्व सांगतसे ॥ १७१ ॥ 
जंबुकबोलभाष्यापासून । तीतें सांगितलें सकळ कथन ।
स्वकरीं मिरवला लोभिक रत्न । तोही धीट पैं केला ॥ १७२ ॥
ऐसियेपरी धीट होतां । संतोष मानी सत्यवती माता ।
उपरांत विक्रम झाला सांगता । भर्तरीविषयीं वचनातें ॥ १७३ ॥
म्हणे माते मजहूनि अधिक । भर्तरीचें मानीं स्नेह दोंदिक ।
पूर्ण अवतारिक पाठीरक्षक । पुढें मातें होईल गे ॥ १७४ ॥
तरी आतां दुसरा सुत । ज्येष्ठपणीं मिरवेल लोकांत ।
अणुरेणूइतुकें यांत । भिन्न पडूं नेदीं कीं ॥ १७५ ॥
सकळ मोहाची करुनि गवसणीं । लेववीं भर्तरीशरीरालागूनि ।
आणि तो वर्तेल स्वइच्छापणीं । तैसें वर्तूं दे त्यासी कीं ॥ १७६ ॥
ऐसें सांगूनि मातेंप्रती । पुन्हां बाहेर आला विक्रमनृपती ।
तो पाकसिद्धी होतांचि त्याप्रती । भोजनातें सारिलें ॥ १७७ ॥
भोजन झालिया सवें जाऊन । पाहता झाला दुर्गस्थान ।
मग चार घडी रात्री होऊन । अनुवादिलें रजनीतें ॥ १७८ ॥
यावरी भर्तरी तेथून । पाहता झाला जकातीस्थान ।
जकातदार त्यातें देखून । भर्तरेतें बोलतसे ॥ १७९ ॥
म्हणे भर्तरीराव ऐका वचन । तुम्हीं असावें सदन धरुन ।
कार्या लागतां पाचारुन । घेत जाऊं तुम्हांसीं ॥ १८० ॥
मग अवश्य म्हणोनि भर्तरीनाथ । विक्रमसदना पुन्हा येत ।
मग दिवसानुदिवस ते वस्तींत मोहपूरी लोटला ॥ १८१ ॥
आधींच माय ती सत्यवती । त्यावरी पुत्राची ऐकोनि युक्ती ।
परम मोहातें भर्तरीजती । गुंडाळूनि घेतला ॥ १८२ ॥
जैसा उदकाविण मत्स्य होत । तळमळ करी होतां विभक्त ।
कीं धेनूलागीं वत्स नितांत । विसर कदा घडेना ॥ १८३ ॥
तन्न्यायें मग त्रिवर्ग जण । मोहे वेष्टिले हरिणीकारण । 
मग एकमेकांच्या दृष्टीविण । विरह होतां तळमळती ॥ १८४ ॥
असो ऐसी मोहस्थिती । बंधूपणें जगीं मिरवती ।
यावरी पुढें आतां श्रोतीं । अवधान द्यावें कथेतें ॥ १८५ ॥
नरहरिवंशीं धुंडीनंदन । पुढिलें अध्यायीं सांगेल कथन ।
कवि मालू नामाभिधान । सेवक असे संतांचा ॥ १८६ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । षड्विंशतितमाध्याय गोड हा ॥ १८७ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार षड्विंशतितमाध्याय संपूर्ण ॥ 
Shree Navanath Bhaktisar Adhyay 26  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सव्वीसावा (२६) 


Custom Search

No comments: