Sunday, March 20, 2016

Shree Navanath Bhaktisar Adhyay 33 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेहतीसावा (३३) भाग २/२


Shree Navanath Bhaktisar Adhyay 33 
Manik a farmer offered Bhiksha to Goraksha when he was very hungry. Manik also asked him to ask anything more from him. Goraksha knowing Manik's future and to do good to him, asked him not to do anything comes in his mind which was agreed by Manik. When Manik thought to go into the village to eat something, he immediately remembered what he had agreed and stood into the farm eating the leaves coming to him by the wind and started to chant God's name. Goraksha reached to Badrikedar and took Chourangi who had completed his 12 years tapas, with him to go to king Shashangar, Chourangi's father at Koudinyapur. Chourangi told to the king how his step mother Bhujavanti had behaved with him and miss guided the king. King was very angry and asked Bhujavati to leave the palace. Then Goraksha and Chourangi came to Shiva temple at Prayag where lifeless body of Machchhindra was kept in the cave. Wife of the pujari told him how Queen Revati had destroyed the body. Goraksha told Chourangi to protect his body which he was leaving and going for the search of Machchhindra's body. He reached to Kailas where he found Machchhindra's body. There was a big war between Virbhadra who was God Shiva's son and Goraksha. Virbhadra was defeated. God Shiva asked Chanmunda's to give the body of Machchhindra to Goraksha. Now in the next 34th Adhyay what happens will be told to us by Dhundisut Malu from Narahari Family.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेहतीसावा (३३) भाग २/२
द्वादश संवत्सरपर्यंत । त्वां तप केलें शुचिष्मंत ।
तयातें फळ कुडें मत । भ्रष्ट केलें राज्यासी ॥ १०१ ॥
तें पाहूनि गोरक्षनाथें । राया संबोधूनि केला शांत ।
एक मास राहिला तेथ । शशांगरभक्तीनें ॥ १०२ ॥
यापरी गोरक्ष जातेसमयीं । वंश वेष्टी मोक्षप्रवाहीं ।
प्रसाद देऊनि राजदेही । वीर्यवान पैं केला ॥ १०३ ॥
म्हणे कामिनी करुनि दुसरी । भोगीं वंशलतेची लहरी ।
ऐसें सांगूनि शशांगरीं । चौरंगीसह चालिला ॥ १०४ ॥
मार्गीं चालतां मुक्काम । पाहते झाले प्रयागस्थान ।
स्नान करुनि उत्तमोत्तम । शिवालयीं पातले ॥ १०५ ॥
येतांचि करुनि शिवदर्शन । मग शिवदारेसी बोलूनि वचन ।
गुरुकलेवराचें वर्तमान । तियेलागीं पुसतसे ॥ १०६ ॥
तंव ती होईनि भयभीत । बोलती झाली चाचरे घेत ।
शरीरेंकरुनि थरथरां कंपित । पायांवरी लोटली ॥ १०७ ॥
म्हणे महाराजा गुरुनाथा । राजभाजा रेवतीकांता ।
तिनें मातें भ्रष्टवूनि चित्ता । पुसूनि घेतलें होतें कीं ॥ १०८ ॥
याउपरी दुसर्‍यालागुनी । वदले नाहीं कलेवरकहाणी ।
परी नेणों भय वाटें मनीं । कलेवर पहा निजदृष्टी ॥ १०९ ॥
स्त्रीजाती बोलती एक । परी करणी करिती आणिक ।
मज वाटतसे ती चाळक । समक्ष दृष्टी पहावें ॥ ११० ॥
ऐसी ऐकूनि तियेची वाणी । परम घाबरला गोरक्षमुनी ।
मग एकान्त गुहासदनीं । विदारुनि पहातसे ॥ १११ ॥
तंव ते मोकळें गुहागार । आंत नाहीं कलेवर ।
मग नेत्रीं दाटूनि मोहाचा पूर । शोकसिंधु उचंबळे ॥ ११२ ॥
तंव तो म्हणे महाराजा प्रज्ञावंता । सोडुनि दिधली माझी ममता ।
आतां तेथें गुरुनाथा । कवणे ठायीं पाहूं मी ॥ ११३ ॥
ऐसें म्हणूनि आरंबळत । धरणीप्रती शरीर टाकीत । 
तंव ती शैवदारा मोहस्थित । होऊनि त्यांतें बोलतसे ॥ ११४ ॥        
म्हणें महाराजा धैर्य धरीं । मी राजांगने जाऊनि सत्वरीं ।
पुसूनि येतें मच्छिंद्रशरीरीं । वृतान्त कैसा झाला तो ॥ ११५ ॥
ऐसें बोलूनि गोरक्षातें । शैवदारा अंतःपुरांत ।
शीघ्र जाऊनि रेवतीतें । राजनेमानें नमियेलें ॥ ११६ ॥
तंव ती पाहूनि शैवकामिनी । म्हणे कां आलीस वो मायबहिणी ।
येरी म्हणे अंतःकरणीं । आठव मातें झालीसे ॥ ११७ ॥
म्हणाल तरी आठव कोण । तरी द्वादश वर्षें आलीं भरुन ।
तुम्हांलागीं सांगितली खूण । राजभागीं विचारा ॥ ११८ ॥ 
ऐसी ऐकतां तियेची वाणी । एकातां ने ते राजपत्नी । 
म्हणे माय वो अंतःकरणीं । चिंता सोडीं सकळ ती ॥ ११९ ॥  
अगे तुजविरहित त्याचि दिवशीं । कलेवर काढूनि शस्त्रउद्देशीं ।
वांटलें गे रतिरती मांसी । सकळ विपिनामाझारी ॥ १२० ॥
त्यासही लोटले बहुत दिवस । अस्थिमांसांचा झाला नाश ।
जीवजंतू खाऊनि त्यास । विष्ठा मृत्तिका झाली असे ॥ १२१ ॥
तरी या कार्याचा सकळ तरु । समूळीं उपटिला बीजांकरु ।
आतां चिंतेचें फळ अपारु । कोठूनि दृष्टी पडेल ॥ १२२ ॥
ऐसें बोलतां राजांगना । चिंतें व्यापिली शैवअंगना ।
म्हणे नेणों पुढिल्या कर्मा । कैसे घडोनि येईल ॥ १२३ ॥
परी आतां असो कैसें । श्रुत करावें गोरक्षास ।
जें जें असेल प्रारब्धास । भोग भोगणें लागेल ॥ १२४ ॥                          
ऐसा विचार करुनि चित्तीं । पुनश्र्च आली शिवालयाप्रती । 
जे वदली रेवती युक्ती । प्रांजळ तैसे सांगितलें ॥ १२५ ॥
सांगतां ऐकिलें नाथें । परम पेटला क्रोधानळातें ।
म्हणे शिक्षा करावी राजभाजेतें । दुःखार्णवीं बुडवूनियां ॥ १२६ ॥
ऐसा विचार घटित मनीं । परी पुनः करीत विवेकबंधन । 
रेवती माता मजकारण । मच्छिंद्रनाथें लागतसे ॥ १२७ ॥
जरी अवज्ञा करुन । जंतूंचें झालें भक्षण । 
तरी आतां शोधार्थ मन । मच्छिंद्रशरीरीं ठेवावें ॥ १२८ ॥
न द्यावें तिसी शिक्षेकारणें । तें नाश न पावे निश्र्चय पूर्ण ।
कोणे तरी ठायालागून । मच्छिंद्रदेह असेल ॥ १२९ ॥
मग बोलावूनि चौरंगीतें । म्हणे बा रक्षीं शरीरातें ।
मी देहासी सांडुनि त्रिभुवनातें । कलेवरशोधार्थ जातों कीं ॥ १३० ॥
परी रेवती येथील राजकांता । प्रवर्तली आहे मच्छिंद्रघाता ।
तैशीच वहिवटेल माझिया अर्था । म्हणूनि सावध असावें ॥ १३१ ॥
ऐसें सांगूनि चौरंगीतें । प्रवेश करी गुहागृहातें ।
प्राण सान शरीरातें । भ्रमण करी दश दिशा ॥ १३२ ॥
सकल शोधिला जंबूद्वीप । सरितार्णवीं सकल आप ।
ग्राम कानन सप्तदीप । रतिरती शोधिलें ॥ १३३ ॥
जीवजंतूची देहस्थिती होऊन । शोधितां गुरुचें कलेवर पूर्ण ।
कोणेतरी ठाया लागून । मच्छिंद्रदेह असेल ॥ १३४ ॥
अतळ वितळ सुतळ पाताळ । सप्तही पाताळस्थळ ।
पिंडब्रह्मांड शोधूनियां सकळ । स्वर्गावरी चालिले ॥ १३५ ॥
स्वर्लोक भुवर्लोक तपोलोक । अर्यमा यक्षादि सत्यलोक ।
कुबेर तारागणादि अनेक । शोधूनिया पाहिलें ॥ १३६ ॥
एक मेरु स्वर्गपाठार । गणगंधर्वादि अन्य सुरवर । 
सकल शरीरा करुनि संचार । गुरुशरीर शोधिलें ॥ १३७ ॥       
उपरी पाहूनि वैकुंठ समस्त । त्वरें पातला कैलासाप्रत ।
तों होतांचि प्रवेश शिवगणांत । धुंडाळूनि पहातसे ॥ १३८ ॥
तों शिवगणीं चामुंडासमुदयांत । अस्थि त्वचा मांस देखें समस्त ।
त्यावरी वीरभद्र सर्व गणांत । गर्जोनियां सांगतसे ॥ १३९ ॥
म्हणे द्वादश वर्षाचा सरला नेम । मच्छिंद्रशवातें करा रक्षण ।
तयाचा शिष्य गौरनंदन । कोणे रुपें येईल कीं ॥ १४० ॥
ऐसी ऐकूनि तयाची वार्ता । गोरक्ष तेथूनि झाला निघता ।
तों येरीकडे चौरंगीनाथा । काय सुचलें होतें कीं ॥ १४१ ॥
गोरक्षशवाजवळ बैसून । आणीक सकळ अस्त्र व्यापून ।
जेथें लाग न लागे देवांकारण । ब्रह्मादिकांकरुनियां ॥ १४२ ॥ 
ऐसें शव अस्त्रव्याप्त । तैशांतूनि निघून गौरसुत ।
गुप्तवेषें शरीरांत । येऊनियां प्रवेशला ॥ १४३ ॥
प्रवेशतांचि अकस्मात । उठूनि बैसला गौरसुत ।
मार्ग पाहूनि गुहागृहांत । बाहेर आले उभयतां ॥ १४४ ॥
मग सिद्ध करुनि भस्मझोळी । उभे राहिले दोन्ही बळी ।
पर्वतास्त्र तेणें काळीं । अर्कावरी सोडिलें ॥ १४५ ॥
गोरक्षमुखींचे पर्वतास्त्र । प्रविष्ट होतां अति स्वतंत्र । 
माथा उचलितां अंबरपात्र । भरोनियां निघालें ॥ १४६ ॥
सवालक्ष योजनमिती । स्वर्गीं उंच झाले गभस्ती ।
त्याहूनि माथा पर्वतीं । अंबरातें मिरवला ॥ १४७ ॥
मित्रमार्गींचा धरुनि रोक । आकाशस्तंभ झाला एक ।
तेणेंकरुनि स्यंदनीं अर्क । मार्गावरी अडखळला ॥ १४८ ॥
चक्रपदा चालावया वाट । न मिळे पाहूनि सुभट ।
मग सज्ज करुनि गांडीव चिमुटीं । योजिता झाला महाराजा ॥ १४९ ॥    
तीव्रशरीं वज्रास्त्र । योजूनि सोडी प्रविष्ट मित्र ।
तेणेंकरुनि पर्वतास्त्र । भंगिता झाला ते क्षणीं ॥ १५० ॥
परी पर्वतास्त्र भंगित होतां । आदित्य विचारी आपुले चित्ता ।
हें अस्त्र कोणाची प्रतापदुहिता । आडमार्गीं झालें असे ॥ १५१ ॥
ऐसें पाहतां अर्क अंतरी । तो समजला नर गोरक्षकेसरी ।
मग स्यंदनासह महीवरी । येऊनियां प्रगटला ॥ १५२ ॥
येतां देखती अर्कराज । काय करिती हो विजयध्वज ।
चंद्रास्त्राचें पेरुनि बीज । कोटी चंद्र निर्मिले ॥ १५३ ॥
तेणें करुनि शीतळ प्रवाहीं । मिरवती झाली मही । 
मग तो सकळ दाह स्वभावीं । बाधूं न शके अर्काचा ॥ १५४ ॥         
ऐसी समाधान स्थिती होतां । परी समीप पावला प्रविष्ट सविता ।
मग चौरंगी आणि गोरक्षनाथ । अर्कचरणीं लागती ॥ १५५ ॥
यापरी भाविकस्थिती सांगून । बोलता झाला जगलोचन ।
बा रे तुज सुखसंबंध कोण । दर्शवीं कां वाचेसीं ॥ १५६ ॥
येरु म्हणती महाराजा । आम्ही उदेलों एक काजा । 
मच्छिंद्रदेह तेजःपुंजा । शिवगणें हरियेला ॥ १५७ ॥
तरी आपण जाऊनि तेथें । सुनीति सांगावी वीरभद्रातें ।
कीं मच्छिंद्रदेह महींते । पाठवूनि द्यावा कीं ॥ १५८ ॥
परी या कार्यां बहुधा नीती । सांगून जरी ना ऐकती ।
मग मागूनि बोलावूनि घेऊं या क्षितीं । युद्धालागीं मिसळाया ॥ १५९ ॥
ऐसे पर्वीं महापर्वीं । आमुची जाऊन करावी शिष्टाई ।
इतुका उपकार मच्छिंद्रदेहीं । आम्हांसी साह्य मिरवावें ॥ १६० ॥
ऐसें बोलतां गोरक्षनाथ । आदित्य अवश्य त्यांतें म्हणत ।
मग त्या क्षणीं कैलासाप्रत । त्वरित जाऊनि पोंचला ॥ १६१ ॥
गणें पाहूनि अर्क येतां सहज । पायां लागे विजयध्वज ।
म्हणतसे येणें महाराजा । कवण्या अर्था झालें असे ॥ १६२ ॥
आदित्य म्हणे ऐकें वचन । गोरक्षशिष्टाईसाधन । 
करुं पातलों तुजकारण । मच्छिंद्रदेहाकारणें ॥ १६३ ॥
तरी मम बोलणें आतां । चित्त द्यावें परमहिता ।
महीसी पाठवीं मच्छिंद्रदेह आतां । तुष्ट करीं गोरक्षा ॥ १६४ ॥
तुम्हीं तुष्ट केलिया त्यास । नाथपंथें वाढेल प्रीत ।
ऐसें उत्तर बोलतां आदित्य । वीरभद्र बोलतसे ॥ १६५ ॥ 
हे महाराजा ऐक वचन । आम्हांसी दुःख दिधलें मच्छिंद्रानें ।
तरी आतां गेलिया प्राण । मही न दावूं शवातें ॥ १६६ ॥
जरी गोरक्ष झुंजेल आम्हांते । तरी सिद्ध होऊं युद्धांतें ।
गोरक्ष जिंकूनि समरांगणातें । मच्छिंद्रसम करुनि ठेवूं ॥ १६७ ॥
उपरी बोले नारायण । मच्छिंद्रें दुःख दिधलें तुम्हांकारण ।
तेव्हां तुमचा प्रताप पळून । कवणा ठाया गेलासे ॥ १६८ ॥
आतां अवचट घडले ऐसें । म्हणूनि प्रौढा झालां मानसें ।
परी मच्छिंद्र जैसा तैसाचि गोरक्ष । प्रतापबळी असे कीं ॥ १६९ ॥
तेव्हां मच्छिंद्र होता एक । आतां दोघे असती प्रतापअर्क ।
ते कोपल्या सकळ धाक । कृतांतासम योजिती ॥ १७० ॥
येरु म्हणती असो कैसें । परी कदा न देऊं मच्छिंद्रास ।
यावरी बोले राजस । आवडेल तैसें करावें ॥ १७१ ॥
परी एक आणिक वचन । तुम्ही उतरा महीकारण ।
स्वर्गीं करितां कंदन । सिवलोकांत पावेल ते ॥ १७२ ॥
म्हणसी कीं यासी काय कारण । तरी ते प्रतापी असती तीक्ष्ण ।
कैलासगिरि पिष्ट होऊनि । खंड करितील क्षणार्धें ॥ १७३ ॥
परी ते पाहुनि येथील वस्ती । विनाश होईल स्वर्गाप्रती ।
मग त्या कोपें पशुपती । शासन करील तुम्हांतें ॥ १७४ ॥
भवभवानी अति प्रीती । करिती गोरक्षमच्छिंद्रांप्रती ।
पहा शरीररज सवें चामुंडांहाती । कैलासातें पाठविलें ॥ १७५ ॥
तरी आतां शिवा न कळतां । मानेल तैसें करावें चित्ता ।
ऐशी गोष्ट आदित्य बोलतां । सर्वां परी मानलें ॥ १७६ ॥
मग वीरभद्र म्हणे सर्व गणांसी । तुम्ही युद्धा जावें सर्व महीसी ।
दुःख लागतां कांहीं रणासी । मीही येतों मागून ॥ १७७ ॥
मग अष्टभैरवगण । अवश्य म्हणूनि करिती गमन ।
विमानें प्रत्यक्ष घेऊन । शस्त्रअस्त्रादिकीं उतरले ॥ १७८ ॥
बहात्तर कोटि चौर्‍यायशीं लक्ष । येतांचि देखे नाथ गोरक्ष ।
मग चौरंगीतें बोले प्रत्यक्ष । सावध होई मम वत्सा ॥ १७९ ॥
असो शिवगण येतांचि महीं । लोटते झाले शस्त्रप्रवाहीं ।
तें गोरक्षें पाहूनि त्या समयीं । वज्रास्त्र निर्मियेलें ॥ १८० ॥
वज्रास्त्र पातलें लव न लागतां । सहस्त्र वेळां भवतें फिरतां ।
तेणें शिवगणांचे शर समस्त । अंगीं लिप्त न होती ॥ १८१ ॥
तें पाहूनियां सकळ शिवगण । योजिती अपार अस्त्रांकारण ।
तितुक्याही अस्त्रां उभय जन । लक्ष्य धरुनि उडविती ॥ १८२ ॥
अग्निअस्त्र धूम्रास्त्र । तयावरी प्रेरिती वातास्त्र ।
वातास्त्रावरी उरगास्त्र । प्रेरिती झाले शिवगण ॥ १८३ ॥
काळास्त्र आणि वज्रास्त्र । महाकठिण स्पर्शास्त्र । 
तयामाजी दानवास्त्र । प्रळय करीत आगळा ॥ १८४ ॥
तें पाहूनि गोरक्षनाथ । प्रेरिता झाला जलदास्त्र ।
तयामागें पर्वतास्त्र । लागोपाठ करीतसे ॥ १८५ ॥
तयामागें खगेंद्रास्त्र । तयामागे संजीवनी अस्त्र । 
मग प्रेरी इंद्रास्त्र । तें जाऊनियां झगटलें ॥ १८६ ॥
विभक्तास्त्र देवास्त्र कठिण । तींही झगडती त्वरेंकरुन ।
ऐसें अस्त्र परिपूर्ण । गणास्त्र तें भंगिती ॥ १८७ ॥
त्यांत काय करी चौरंगीनाथ । हळूचि मोहनास्त्र प्रेरीत ।
तें संचरुनि गणहृदयांत । मग मिरवीत पिसाटपणें ॥ १८८ ॥
सर्वांसी नाहीं देहभान । तेणें न कळे आलों कोणकार्यालागून ।
पिशाचवृत्तीं भ्रमत रानोरान । व्यर्थ फिरतें जाहले ॥ १८९ ॥
त्यांत आणिक चौरंगीनाथ । प्रेरी प्रळयकाळींचा वात ।
तेणें गण समस्त । वायुचक्रीं पडियेलें ॥ १९० ॥
तों वीरभद्र मागूनि चामुंडेसहित । युद्धालागीं आला त्वरित ।
परी शिवगण पाहूनि अव्यवस्थित । परम चित्तीं क्षोभला ॥ १९१ ॥
मग गांडीवातें टणत्कारोनी । बाण योजिलें अपार गुणीं । 
कामास्त्र ब्रह्मास्त्र कार्तिक तीन्ही । विविध बाणीं सोडतसे ॥ १९२ ॥
जैसा प्रळयकाळींचा वडवानळ । तों यत्नें न पावे कदा शीतळ ।
तन्न्यायें शिवबाळ । कोपानळीं वेष्टिला ॥ १९३ ॥
ते पाहूनि चौरंगीनाथ । रतिअस्त्र प्रेरीत त्वरित ।
तेणें कामास्त्र त्वरें निश्र्चित । मूर्च्छित होऊनि पडियेलें ॥ १९४ ॥
यावरी दुसरें चौरंगीनाथ ।  दशासुरी अस्त्र प्रेरीत । 
तें पाहूनियां नाभीसुत (ब्रह्मदेव) । झडझडोनि पळतसे ॥ १९५ ॥
चित्तीं म्हणे नोहे बरवें । वेद हरतील आतां सर्व ।       
शंखासुर प्रतापवर्ण । पुनः उदय झाला असे ॥ १९६ ॥
ऐसा विचार करुनि मनीं । ब्रह्मास्त्र दडलें अदृश्यपणीं ।
पुढें कामिनीअस्त्र चौरंगीनाथ । प्रेरिता झाला लवलाहें ॥ १९७ ॥
तें पाहूनि कार्तिकास्त्र । पळूनि लपवी मुखपात्र । 
परी चौरंगीचें पांचजन्यास्त्र । प्रळयालागीं मिरविलें ॥ १९८ ॥
तें पाहूनियां भद्रजाती । मत्स्यास्त्र योजिलें परम निगुतीं ।
तेणें करुनि तदस्त्रशांती । अदृश्य तें मिरवलें ॥ १९९ ॥
परी परम कोपोनि तपोबाळ । तीव्रास्त्र योजिलें तत्काळ ।
संजीवनी योजूनि सबळ । सकळ दानवां उठविलें ॥ २०० ॥
ते दानव म्हणाल कोण कोण । त्रिपुरसुंदराक्ष मालीमल मृदुमान्य ।
म्हैसासुर जालंदर प्राज्ञ । काळयवन अघ बक ॥ २०१ ॥
हिरण्याक्ष हिरण्यकश्यपसहित । मुचकुंद बळी वक्रदंत ।
रावण इंद्रजित कुंभकर्ण त्यांत । सिंहनाद भरिताती ॥ २०२ ॥
ऐसे सबळ राक्षस उठतां । विमानयानीं सुरवर असतां । 
अति भय मानूनि चित्ता । विमानातें पळविती ॥ २०३ ॥
कैंचें युद्ध कैंचें पाहणें । पळती सुर भयभीत होऊन ।
तेहतीस कोटी देवतांकारण । चिंता अपार व्यापिली ॥ २०४ ॥
म्हणती रावणें बंदी घातलें । दैवें दाशरथी रामें सोडिलें ।
आतां दैन्य भोगूनि आलें । दुःख अपार येधवां ॥ २०५ ॥
ऐसे होऊनि भयभीत । कंपें व्यापिले ते समस्त ।
असो सुरवर जाऊनि वैकुंठात । निवेदिती श्रीरंगा ॥ २०६ ॥
मग तो दयाळ चक्रपाणी । ऐसी ऐकूनि सुरवरवाणीं ।
म्हणे भोग आला परतुनी । अवतारदीक्षेकारणें ॥ २०७ ॥
मग तो परम दचकूनि । चित्तीं । शिव पाचारिला सुरवरांहातीं ।
बैसवूनि स्वसंगती । विचित्र करणी निरोपिली ॥ २०८ ॥
म्हणे गोरक्षें केलें अनुचित । पुनः उठविले दानव समस्त । 
आतां दानव तरी रसातळाप्रत । मही सकळ नेतील कीं ॥ २०९ ॥
एक एक दानवासाठीं । आपण माराया झालों कष्टी ।
कल्पवरी अवतार जेठी । धरुनियां भीडलों ॥ २१० ॥
तरी आतां कैसें करावें । निवटितील कैलासा सकळ दानव ।
अहा मूर्ख तो वीरभद्र राव । व्यर्थ द्वेषीं मिरवला ॥ २११ ॥
मग सोडूनि वैकुंठासी । येते झाले गोरक्षापासी ।
म्हणती बा विपरीत महीसी । पुत्रा हे काय मांडिलें ॥ २१२ ॥
अरे एकएका राक्षसालागीं । आम्ही श्रमलों बहु प्रसंगीं ।
अवतार घेऊनि नाना रंगीं । हनन केलें तयांचे ॥ २१३ ॥
तरी आतां कृपा करुन । अदृश्य करीं दानवांकारण ।
येरी म्हणे गुरुशवा आणून । द्यावें आधी मजलागीं ॥ २१४ ॥
मग शिवें बोलावूनि चामुंडेसी । मच्छिंद्रशवातें आणविले महीसी ।
म्हणे बा घेईं आणि राक्षसांसी । शांतदृष्टी दावीं कां ॥ २१५ ॥
यावरी गोरक्ष म्हणे त्यातें । दावन नोहेत अस्त्रव्यक्त ।
संजीवनी प्रयोग देहस्थित । दानव उदया पावले ॥ २१६ ॥
तरी अवतार घेऊन । पुनः योजा रणकंदन ।
नातरी वीरभद्राची आस्था सोडून । द्यावी लागेल तुम्हांतें ॥ २१७ ॥
यावरी बोले भालदृष्टी । येर पोर म्हणे नाहीं म्हणे पोटीं ।
परी नाथा राक्षस जेठी । दुःख देतील आम्हांतें ॥ २१८ ॥
एक मधुदैत्य माजला । तेणें पळविलें रानोरानीं आम्हांला ।
शेवटी एकादशीनें त्याला । मृत्युमुखा पाठविले ॥ २१९ ॥
ऐसें दुःख सांगावें किती । तरी आतां कृपामूर्ती ।
वेगीं निवटीं राक्षसांप्रती । पुत्रमोह सांडिला ॥ २२० ॥
ऐसें शिव विष्णु बोलत । येरीकडे राक्षस समस्त ।
वीरभद्र पाहूनि झुंजत । धनुष्यबाण कवळुनियां ॥ २२१ ॥  
परी तो प्रतापी भद्रजाती । एकटा झुंजतो सर्वांप्रती ।   
नानाशस्त्रआकृती । निवारीत बलिष्ठ ॥ २२२ ॥
ऐसें वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण । एकमेळीं माजलें कंदन ।
येरीकडे शिवविष्णूंनीं । स्तुतीं तुष्टविला गोरक्ष ॥ २२३ ॥
तुष्ट होतां गोरक्षजती । वाताकर्षण अल्पयुक्तीं ।
भस्मचिमुटी रणकंदनाप्रती । फेंकूनियां देतसे ॥ २२४ ॥
तेणें दानव वीरभद्रासहित । महीं पाडिले निचेष्टित ।
श्र्वासोछ्वास कोंडूनि समस्त । प्राणरहित झाले ते ॥ २२५ ॥
सबळ अस्त्रें वाताकर्षण । ठाऊक नव्हती देवदानवांकारण ।
परी नाथपंथीं ती येऊन । प्रसन्न झालीं कृपेनें ॥ २२६ ॥
असो वीरभद्र आणि दानव समस्त । रणीं निमाले प्रतापवंत ।
त्यावरी गोरक्षें जल्पूनि  अग्निअस्त्र । सकल केलें भस्म तेणें ॥ २२७ ॥
यावरी पुढें पंचानन । वेष्टिले अति मोहानें ।
तें पुढिलें अध्यायीं सकळ कथन । श्रोतियांनीं ऐकावें ॥ २२८ ॥ 
परम साधन योजूनि चित्तीं । पाठ थोपटूनि वक्त्याप्रती । 
भला भला म्हणवूनि उक्ती । श्रोते करिती तत्कृपें ॥ २२९ ॥
परम अवधाना योजूनि चित्त । वक्ता जाहला धुंडीसुत ।
नरहरि मालू नाम ज्यांस । संतसेवे अनुसरला ॥ २३० ॥
स्वस्तिश्री ग्रंथ भक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । त्रयस्त्रिंशतितमध्याय गोड हा ॥ २३१ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार त्रयस्त्रिंशतितमध्याय संपूर्ण ॥
Shree Navanath Bhaktisar Adhyay 33  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेहतीसावा (३३)

Custom Search

No comments: