Friday, March 18, 2016

Shri Navnatha Bhaktisar Adhyay 32 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बत्तीसावा (३२) भाग २/२


Shri Navnatha Bhaktisar Adhyay 32 
Goraksha and Machchhindra were performing thirtyatra and came to Prayag. King Trivikram had died and people were very sad. Hence they decided to make alive king again. Machchhindra entered in to the body of king. People were very happy. Goraksha took the help of the lady looking after the temple; kept Machchhindra's body into the cave. Queen Revati had a male child from Machchhinda. Once she came in the temple. She knew that Machchhindra's body in the cave and he had entered into the body of king Trivikram. One knight she with the help of two solders broke down the body of Machchhindra into pieces and thrown in to the forest. Uma (wife of God Shiva) came to know about this and as per the order of God Shiva, She asked Chamundas to collect the pieces of the Machchhindra's body and kept on the Kailas under protection of Virabhadra. After 12 years Goraksha came to Prayag. What happens next will be told to us by Dhundisut Malu in the next 33rd Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बत्तीसावा (३२) भाग २/२
व्यंगरहित बोले वचन । करी कांतेचें समाधान । 
यावरी द्वितीय दिनी मंगलस्नान । करुनि सभे बैसला ॥ १०१ ॥
तेथेंही राजवैभवाकारणें । अचूक वर्ते सकळ प्रकरणीं ।
मंत्री आणि सकळ जन । भिन्न कांहीं दिसेना ॥ १०२ ॥
न्यायनीतीं झाला वहिवाट । माहितीसमान वर्तवी पाठ ।
स्नेहक्रूरता समान लोट । रायासमान वर्ततसे ॥ १०३ ॥
यापरी नित्य चतुर्थ प्रहरीं । सकळ वैभवें वना करी स्वारी ।
शिवदर्शना ग्रामाबाहेरी । त्याचि देवालया येतसे ॥ १०४ ॥
प्रथम दिवसीं येतां राव । शिवालयीं वंदितां उमाधव ।
देखोनि गोरक्ष प्राज्ञ अतीव । संपादणी पुसतसे ॥ १०५ ॥
म्हणे नाथ जी आदेशवंत । किती दिवस आलां येथ ।
कवण स्थळीं वास्तव्य करीत । कवण नाम मिरवतसे ॥ १०६ ॥
उभा राहोनि ऐसे नीतीं । गोरक्षातें पुसे नृपती ।
संपादणी ती जगाप्रती । दृढा दावी महाराजा ॥ १०७ ॥
परी तो चाणाक्ष गोरक्षनाथ । संपादणीचें उत्तर देत ।
मग उत्तराउत्तर करुनि महीते । शिवालयीं संवरले ॥ १०८ ॥
संचरले परी गोरक्षकातें । घेवोनि गेला स्वसांगाते ।
शिवालयीं नेमिला एकान्त । राव पुसे गोरक्षनाथा ॥ १०९ ॥
हस्तसंकेतें खुणेंकरुन । म्हणे देहातें बंधनसाधन ।
कैसे रीतीं केलें रक्षण । ठाव लक्षोनि नेटका ॥ ११० ॥
मग तो प्राज्ञिक गोरक्षनाथ । बर्बरभाषा सांगत ।
सवें घेवोनि खूण दावीत । गुहागृहा रायातें ॥ १११ ॥
असो ऐसें केलियापाठीं । गोरक्षें केलिया खूण दृष्टीं ।
मग क्षणें बैसोनि तळवटीं । राव स्थाना पैं गेला ॥ ११२ ॥
गेला परी प्रतीदिनीं । राव येतसे शिवभुवनीं ।
आपुला शरीरठाव लक्षोनी । शिवा नमोनी जातसे ॥ ११३ ॥
क्षण एक बैसोनि गोरक्षा जवळी । दावीत भक्ती प्रेमनव्हाळी ।
आणि चित्ताची संशयकाजळी । फेडूनि जात स्वस्थाना ॥ ११४ ॥
ऐसियेपरी वहिवाटतां । तीन मास लोटले पंथा ।
यापरी एके दिवशीं बैसतां । गोरक्षक पुसे रायातें ॥ ११५ ॥
आम्हीं जातों तीर्थाटनासी । आपण असावें योगक्षेमेसीं ।
दृष्टी ठेवोनि स्वहितासी । स्वशरीरासी रक्षावें ॥ ११६ ॥
अवश्य त्यातें भूप म्हणत । स्वधर्में ठेवूं स्वशरीरातें ।
आपण जावें स्वस्थचित्तें । तीर्थाटनीं गमावें ॥ ११७ ॥
ऐसें वदोनि गोरक्षकातें । भूप पातला स्वस्थानांत ।
येरीकडे गोरक्षनाथ । तीर्थस्थाना वहिवाटला ॥ ११८ ॥
साही लोटले षण्मास । रेवती कांता रतिसुखास । 
ऋतुसंधीं रेतगर्भास । गरोदर पैं ते झाली ॥ ११९ ॥
दिवसेंदिवस नव मास । लोटोनि गेले गर्भास ।
सुदिनदिनीं प्रसूतीस । रेवती कांता होतसे ॥ १२० ॥
प्रसूत झाल्या मदनाकृती । बाळ पाहे माय रेवती ।
बाळककर्णीं तेजोत्पत्ती । बाळ दृष्टीं देखिला ॥ १२१ ॥
त्यासी लोटलें द्वादश दिवस । आनंदउत्सव पालखास ।
बाळ पहुडोनि नाम त्यास । धर्मनाथ ठेविलें ॥ १२२ ॥
त्यासही लोटलीं पांच वरुषें । तों एकें दिवशीं शिवालयास ।
घेवोनि पूजेचे तबकास । राजाराणी पातलीं ॥ १२३ ॥
सवें परिचारिका पंचशत । लावण्यलतिका चपळवंत ।
कीं राजार्णवींच्या लहरी अद्भुत । रेवतीसवें मिरवल्या ॥ १२४ ॥
असो रेवती दासींसहित । संचरोनि शिवालयात ।
प्रेमें पूजीतसे उमाकांत । शुद्धभावेंकरुनियां ॥ १२५ ॥
पूजा सांग जाहलियावरी । शिवा प्रार्थीतसे वागुत्तरीं ।
हे महाराजा त्रिपुरारी । उमापति महानुभावा ॥ १२६ ॥
तरी ऐसें करावें कृपानिधी । श्रीराया त्रिविक्रमाआधीं । 
मातें मरण देऊनि साधीं । सुवासिनीत्व माझें हें ॥ १२७ ॥                         
ऐसें वदतां वाक् सुगरिणी । गदगदां हासे शैवराणी ।
तें रेवतीनें पाहोनि । तियेलागीं पुसतसे ॥ १२८ ॥
म्हणे माय वो शैवदारा । तुज हांसूं कां आलें वागुत्तरा ।
म्हणे हास्य तव उत्तरा । सहज आननीं आलें वो ॥ १२९ ॥
रेवती म्हणे आश्र्चर्येविण । न यावें विकासीपणा मन ।
तरी तूं माये प्रांजळ वचन । सांग संशय सोडोनी ॥ १३० ॥
तंव ती बोले शैवराणी । म्हणे माय वो हास्यचिन्हीं ।
तूतें वदतां कहाणी । विपर्यास होईल गे ॥ १३१ ॥
तरी माये माझें चित्त । वदावया होतें भयभीत ।
नेणों कैसी पुढील मात । घडोनि येईल कर्मातें ॥ १३२ ॥
आम्ही दुर्बळ तुम्ही समर्थ । सहज कोपल्या होईल घात ।
पतंग स्पर्शतां प्रळयानळांत । जीवित्वातें उरेना ॥ १३३ ॥
कीं केसरीगृहीं अन्याय । केलिया जंबुक जीवें जाय ।
कीं नगर पेटतां कोणें वांवावें । जीवित्वातें उरेना ॥ १३४ ॥
ऐसें बोलतां शैवराणी । रेवती म्हणे मायबहिणी ।
निर्भय होवोनि तुवां मनीं । रहस्यार्थ निरोपीं ॥ १३५ ॥
राव आणि माझें कांहीं । भय असेल तुझे देहीं ।
तरी आम्ही सहसा कोपप्रवाहीं । तुजवरी न करुं ॥ १३६ ॥
ऐसें बोलोनि करतळभावास । रेवती देत शैवकांतेस ।
सकळ हरुनि संशयास । म्हणे वार्ता वद आतां ॥ १३७ ॥
तरी ती प्रांजळ बोले वाणी । मग परिचारिका बाहेर काढूनी ।
म्हणे सांगेन वो एकांतभुवनीं । एकांतस्थानी पै गेल्या ॥ १३८ ॥
एकांतालया गेलियावरी । बोलती झाली शैवनारी ।
म्हणे माये तूं सुवासीण स्वदेहीं । कांहीं नाहींस जाण पां ॥ १३९ ॥
राव त्रिविक्रम मृत्यु पावला । तयाचे देहीं मच्छिंद्र संचरला ।
आपुला देह येथें सांडिला । शिवालयामाझारीं ॥ १४० ॥
मग तयाचा शिष्य गोरक्षनाथ । गुहागृहा ठेवोनि गेला प्रेत । 
द्वादश वर्षें नेमस्त । नेम केला उभयतांनीं ॥ १४१ ॥
द्वादश वर्षें सरल्या शेवटीं । मच्छिंद्र वर्तेल स्वदेहराहाटी ।
ऐसी कथा माझिये दृष्टीं । झाली असे जननीये ॥ १४२ ॥
तरी तुज वैधव्यपण । असोनि बोलसी सुवासीण ।
म्हणोनि हास्य आलें मजलागून । जाण जननी निश्र्चयें ॥ १४३ ॥
ऐसें ऐकून रेवती सती । म्हणे दावीं कां मच्छिंद्र प्रेताप्रती ।
येरी अवश्य म्हणोनि उक्ती । गुहेमध्यें नेतसें ॥ १४४ ॥
म्हणे माय वो येचि ठायीं । आच्छादिला मच्छिंद्र देहीं ।
तरी मही विदारुनि गुहागृहीं । निजदृष्टीनें पाहें कां ॥ १४५ ॥
ऐसें बोलोनि दावोनि तीतें । शिवालयीं गेली त्वरित ।
येरीकडे संशयवंत । रेवती स्थाना गेलीसे ॥ १४६ ॥
गेलीसे परी एकांतासी । विचार करी आपुले मानसीं । 
चित्तीं म्हणे पतिव्रतानेमासी । दैवेंकरुनि नाडिलें ॥ १४७ ॥
नाडिलें परी संचितार्थ । घडणार घडूनि आलें निश्र्चित ।
परी पुढती आपुलें हित । विलोकावें आपणचि ॥ १४८ ॥
पति निवर्तल्यापाठी । लाधली मच्छिंद्रवीर्यकोटी ।
परी पाहतां पातकदृष्टीं । वंशवेली दिसेना ॥ १४९ ॥ 
पूर्वी भरतवंश काढून । व्यासवीर्यें केला उत्पन्न ।
त्याहीपुढें कुंतीरत्न । त्याचि नीतीं आचरली ॥ १५० ॥
पंचदेवांचे वीर्य घेवोन । निर्माण केलें पांचही जण ।
तस्मात् वंशवेलीकारणें । शिष्टदेह अर्पावा ॥ १५१ ॥
तरी हा विचार पातकरहित । घडोनि आला यत्नातीत ।
परी द्वादश वर्षें होतां भरित । पुन्हां अनर्थ होईल हा ॥ १५२ ॥  
मच्छिंद्र जाईल स्वदेहाकारणें । सुत धर्मनाथ अति सान ।
राज्यवैभवीं आसरा धरोन । कवण रीतीं राहील कीं ॥ १५३ ॥
त्रिविक्रमदेहीं तपोबळ । आहे म्हणूनि विवर्ते बाळ ।
तो गेलिया सांवली शीतळ । मजलागीं मिळेना ॥ १५४ ॥
तरी आतां करावें कैसें । दृष्टीं पाहें मच्छिंद्रदेहास ।
दृष्टीं पाहिल्यावरी विनाश । करोनियां सांडावा ॥ १५५ ॥
देह झालिया छिन्नभिन्न । मग कैसा संचरेल मच्छिंद्रनंदन ।
मुळींच बीज केला भस्म । बाहेर कांहीं उगवेना ॥ १५६ ॥
ऐसा विचार करुनि चित्तीं । एक परिचारिकां घेवोनि सांगातीं ।
गांवाबाहेर मध्यरात्रीं । येवोनियां पोंचली  ॥ १५७ ॥
आणिक एक गुप्तराहाटी । दोन सबळ घेतले होते कामाठीं ।
त्वरें येऊनि शिवालयापाठीं । गुहाद्वार विदारिलें ॥ १५८ ॥ 
मोकळें केले गुहाद्वार । करिते झाले आंत संचार ।
जातांचि तें कलेवर । मच्छिंद्राचें देखिलें ॥ १५९ ॥
परी ते कलेवर तेजःपुंज । कीं सजीवपणी दिसे सहज ।
माणिकवर्णीं सविताराज । तियेलागीं भासलें ॥ १६० ॥
असो ऐसिये तेजोराशी । मग शस्त्र घेवोनि अस्थिमांसासी । 
रती रती छेदोनियां तयासी । बाहेर तई काढिलें ॥ १६१ ॥
मग भाग टाकोनि काननांत । विखरुनि दिधलें पृथक् तेथ । 
तरी समान रज समस्त । ठाईं ठाईं टाकिले ॥ १६२  ॥
टाकिले परी पातळपणीं । रजरजाची न होय मिळवणी ।
ऐशापरी त्यासी करुनी । स्वस्थानीं गेली ते ॥ १६३ ॥
गुहगृहाचें मुख आच्छादून । जैसें होतें तैसें करुन ।
येरी घडल्या कारण । उमा जागृत झालीसे ॥ १६४ ॥     
मग प्रत्यक्ष होऊनि बोलत । म्हणे महाराजा कैलासनाथा । 
जागृत व्हावें विपरीतपंथा । अघटित झालें महाराजा ॥ १६५ ॥
तुमचा मच्छिंद्रनंदन । गेला आहे स्वदेह सांडून ।
परी रेवतीदारा येऊन । विध्वंसिलें शरीरासी ॥ १६६ ॥
ऐसी ऐकतां उमेची मात । खडबडूनि उठला कैलासनाथ ।
हृदयीं पाहें तों विपरीत । मच्छिंद्रदेहीं वर्तलें ॥ १६७ ॥
मग अंबेसी बोलता झाला शिव वचन । म्हणे माझा आजि गेला प्राण ।
परी उमे यक्षिणी बोलावून । सकळ शरीर वेंचीं कां ॥ १६८ ॥
अस्थि त्वचा मांसासहित । रती रती भाग वेंचूनि समस्त ।
एकत्र करुनि कैलासांत । यक्षिणीहस्तीं पाठवीं ॥ १६९ ॥
अवश्य म्हणूनि नगात्मजा । यक्षिणी पाचारी विजयध्वजा ।
कोटी चामुंडा विभागकाजा महीलागीं उतरल्या ॥ १७० ॥
त्यांतें पाहूनि माय भवानी । येतांचि सांगे कार्यालागुनी ।
मच्छिंद्रशरीर समस्त वेंचोनी । स्वर्गा न्यावें म्हणतसे ॥ १७१ ॥
कैलासगिरीं शिवगण बहुत । त्यांत वीरभद्र मम सुत । 
तयाहातीं ओपोनि समस्त प्रेत । रक्षण दृढ सांगावें ॥ १७२ ॥
ऐसें सांगूनि क्षणिक वार्ता । महीं संचरल्या मांसशोधार्था ।
सकळ शरीर वेंचूनि तत्त्वतां । कैलासभुवनीं चालिल्या ॥ १७३ ॥
कोटि चामुंडा प्रतापवंत । यक्षिणीसह झाल्या स्वर्गस्थित ।
कैलासगिरीं मग जात । वीरभद्रातें निवेदिलें ॥ १७४ ॥
म्हणती परम हर्षेंकरुनी । हे महाराज शिवगणीं ।
राजेश्र्वर भद्रासनीं । वृत्तांताते ऐकावे ॥ १७५ ॥
आमुचा तुमचा शत्रू  पूर्ण । अवचट पावला आहे मरण ।
रती रती देहाचे भाग जमवून । आम्हीं आणिले महाराजा ॥ १७६ ॥
तरी तो शत्रू म्हणशील कोण । या भूमंडळा मच्छिंद्रनंदन ।
त्यानें आम्हांसी नग्न करुन । परम लज्जें विटंबिले ॥ १७७ ॥
अष्टभैरव पाहोनि धरणीं । विटंबिलें दशा करुनी ।
रुधिरपूर लोटूनि अवनीं । विगतकळा (निस्तेजपणा) वरियेली ॥ १७८ ॥
आणि तुम्हांसवें घेतलें कटक । मौळीं पर्वत देऊनि देख ।
वायुसुत करुनि आदिक । विटंबिलें महाराजा ॥ १७९ ॥
सकळ देवांचा शत्रु कुजात । बरा दैवें पावला घात ।
तरी आतां प्रतापवंत । दृढोत्तरीं शरीर रक्षावें ॥ १८० ॥
या मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष । तो परम प्रतापवंत दक्ष ।
तो जिंकूनि नेवदेल ईल शरीर प्रत्यक्ष । तरी आतां सावध असावें ॥ १८१ ॥
सहजस्थितींतें दैवेंकरुन । शत्रु पावला आहे मरण ।
छळांवाचूनि सोडविले हर्षेंकरुन । तुम्हां आम्हां देवानें ॥ १८२ ॥
ऐसें सांगूनि हर्षयुक्त । परी वीरभद्र तोषला आपुलें चित्तांत ।
मग भैरवादि समस्त । अहा अहा म्हणताती ॥ १८३ ॥
मग चौर्‍यायशीं कोटी बहात्तर लक्ष । शिवगण प्रतापी महादक्ष ।
मच्छिंद्रशरीर वेष्टूनि प्रत्यक्ष । रक्षणार्थ बैसविलें ॥ १८४ ॥
कोटि यक्षिणी चामुंडांसहित । डंखिनी शंखिनी पातल्या समस्त ।
अस्त्रशस्त्रादि होऊनि उदित । रक्षण करिती शरीराचें ॥ १८५ ॥
येरीकडे त्रिविक्रमदेहांत । प्रतापशील जो मच्छिंद्रनाथ । 
नित्य येऊनि शिवालयांत । गुहागृहीं लक्षीतसे ॥ १८६ ॥
परी तो ठाव जैसा तैसा । दिसूनि येत दृष्टीभासा । 
मग स्वस्थ भोगी संपत्तिविलासा । राज्यासनीं बैसूनियां ॥ १८७ ॥
परी शरीरा झाला जो प्रयास । हें माहित नव्हतें कांहीं त्यास । 
सदा भोगी संपत्तिविलास । राजभुवना जातसे ॥ १८८ ॥
ऐसे नित्य राजविलास । लोटूनि गेलीं वर्षें द्वादश । 
येरीकडे तीर्थाटनास । गोरक्ष सावध झाला असे ॥ १८९ ॥
तरी तो गोरक्ष पुढील अध्यायीं । काय करील प्रतापप्रवाहीं ।
तरी श्रोते अवधान देहीं । सिद्ध करा पुढारां ॥ १९० ॥
अवधान पाहूनि अर्थ बहुत । कथा वदेल धुंडीसुत । 
मालु नरहरीचा शरणागत । दास संतांचा असे कीं ॥ १९१ ॥
स्वस्तिश्री ग्रंथ भक्तिसार । संमत गोरक्षकाव्य किमयागार । 
सदा परिसोत भाविक चतुर । द्वात्रिंशतितमाध्याय गोड हा ॥ १९२ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार द्वात्रिंशतितमाध्याय संपूर्ण ॥
Shri Navnatha Bhaktisar Adhyay 32  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बत्तीसावा (३२) 


Custom Search

No comments: