Shri Navanatha BhaktiSar Adhyay 30
King Shashaangar of Koudinyapur punish his son Krushnagar very rudely and cut his arms and legs and thrown him. Krushnagar was punished by the king because his second wife Bhujavanti made a fouled complement of Krushanagar to the king. Krushanagar was a blessing to the king by God Shiva. Earlier king Shashaangar and his first wife Mandakini had taken care of Krishnagar till he became 10 years when his mother Mandakini expired. After her death Shashaangar married to Bhujavanti. Now what happens next will be told to us by Dhundisut Malu from Narahari family in the 31st Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तीसावा (३०) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी जगदुद्धारा । पंढरीअधीशा रुक्मिणीवरा ।
सर्वसाक्षी दिगंबरा । पुढें ग्रंथ बोलवीं कां ॥ १ ॥
मागिले अध्यायीं अनुसंधान । भर्तरीसी आलें विरक्तपण ।
गोरक्षजतीचे समागमेंकरुन । गिरनार अचळा पोंचला ॥ २ ॥
पोंचला परी रात्रंदिन । लेऊनि स्नेहाचें अपार रत्न ।
तेणेंकरुनि उभयतां जाण । सुशोभित पैं झाले ॥ ३ ॥ ३ ॥
यावरी गोरक्ष तीन रात्री । राहता झाला गिरनारपर्वतीं ।
मग पुसूनि श्रीदत्ताप्रती । मच्छिंद्राकडे चालिला ॥ ४ ॥
चालिला परी अत्रिसुत । म्हणे बाळा गोरक्षनाथा ।
मच्छिंद्रवत्स मम देहातें । भेटला नाहीं बहुत दिवस ॥ ५ ॥
तरी तयाचे भेटी माझे चक्षु । परम भुकेले योगदक्षु ।
तरी त्या आणूनि मज प्रत्यक्षु । भेटवीं कां जोवलगा ॥ ६ ॥
ऐसी ऐकतां दत्तात्रेयवाणी । भेटवीन म्हणे गोरक्षमुनी ।
मग श्रीदत्तात्रेयचरणां नमूनी । निघता झाला गोरक्ष ॥ ७ ॥
श्रीमच्छिंद्रमार्ग धरुन । चालता झाला गोरक्षनंदन ।
येरीकडे रायाकारण । काय करी महाराजा ॥ ८ ॥
नाथदीक्षा देऊनि त्यासी । मौळीं स्थापी वरदहस्तासी ।
चिरंजीवपद देऊनि त्यासी । अक्षय केला महाराजा ॥ ९ ॥
जोंवरी कल्याण असे धरित्री । चिरंजीव केला राव भर्तरी ।
ऐसें वचन वागुत्तरीं । प्रसादातें ओपिलें ॥ १० ॥
याउपरी अभ्यासास । प्रारंभीं नेमिला भर्तरीदास ।
ब्रह्मज्ञान-रसायनास । कविता-वेद सांगितला ॥ ११ ॥
ज्योतिष व्याकरण धनुर्धर । जलतरणादि संगीतोत्तर ।
वैद्य अवश्य रोहिणी अपार । गाढ आधींच होता तो ॥ १२ ॥
कोकसहास्त्रादि नारककळा । चतुर्भाष्य बोध रसाळा ।
मीमांसादि पातंजला । प्रवीण केला महाराजा ॥ १३ ॥
यापरी वैद्य शास्त्र गहन । सांगता झाला अत्रिनंदन ।
वातास्त्रादिक जलद पूर्ण । अग्निअस्त्र सांगितलें ॥ १४ ॥
कामास्त्र धर्मास्त्र वाताकर्षण । वज्रास्त्र पर्वतास्त्र वासवशक्ति दारुण ।
नागास्त्र खगेंद्रास्त्र अस्त्रजीवनीं जीवन । ब्रह्मास्त्रादि उपदेशी ॥ १५ ॥
देवास्त्र काळास्त्र आणि मोहन । रुद्रास्त्र विरक्तास्त्र अति निपुण ।
निर्वाणअस्त्रादि दानवप्रवीण । स्तवनास्त्रादि सांगितलीं ॥ १६ ॥
कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र । विभक्तास्त्रादि मानवअस्त्र ।
विहंगम प्लवंगम कामिनीअस्त्र । सकळ अस्त्रादि उपदेशी ॥ १७ ॥
यावरी शस्त्रविद्या सघन । पूर्वीं होता राव निपुण ।
त्रिशूळ फरश अंकुश मान । धनुष्य तोमर असिलता (तलवार) ॥ १८ ॥
परज मुद्गर बरसी । मांडूक चक्रें गदाउद्देशीं ।
दारुकयंत्रें शस्त्रेंसीं बरसी । कुठरादिकीं प्रवीण ॥ १९ ॥
ऐसा शस्त्रविद्येकारण । पूर्वींच होता राव प्रवीण ।
त्यावरी अस्त्रविद्यारत्न । गुरुमुखें लाधला ॥ २० ॥
मग ते विद्येसी अर्थ शेवटीं । कीं कोंदण विराजे रत्नतगटीं ।
मग त्या तेज हेमावटी । मोल काय बोलावें ॥ २१ ॥
कीं सुगंधित मलयगर । त्या मिश्रित झालें मृगमदकेशर ।
मग त्या गंधातें वागुत्तर । कवण अर्थीं बोलावें ॥ २२ ॥
असो ऐसा विद्यासंपन्न । भर्तरीतें करुनि अत्रिनंदन ।
उपरी साबरी व्यक्त करुन । सदनातें पाठवी ॥ २३ ॥
नाग पन्नग उभय ठायीं । सकळ दैवतें तया प्रवाहीं ।
मित्रकुंडासनीं वेढूनि मही । पाठवीत महाराजा ॥ २४ ॥
मग तेथें जाऊनि भर्तरीनाथ । साधिलें सकळ बावन्न वीरांतें ।
जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत । त्याचि क्लेशा वरियेलें ॥ २५ ॥
मग सकळ देव करुनि प्रसन्न । पाहती श्रीगुरुचे चरण ।
मग सवें घेऊनि अत्रिनंदन । बद्रिकाश्रमीं पातला ॥ २६ ॥
तेथें बैसवूनि पूर्ण तपासी । मग येऊनि गिरनारपर्वतासी ।
राहते झाले सुखवस्तीसी । मच्छिंद्रमार्ग विलोकीत ॥ २७ ॥
तों येरीकडे गोरक्षनाथ । पाहता झाला गर्भगिरी पर्वत ।
परम आवडीं आनंदभरित । मच्छिंद्रातें भेटला ॥ २८ ॥
उपरी चरणीं ठेवूनि माथा । म्हणे महाराजा दत्तगुरुनाथा ।
तुमच्या भेटी क्षुधा नितांत । कामानळू दाटला ॥ २९ ॥
तरी तयाची घेऊं भेटी । आनंदे होड दाटला पोटीं ।
जैसी इंदूची अर्णवा गांठी । प्रेमें लहरी उचंबळे ॥ ३० ॥
कीं सोमातें कुमुदपाती । भेटी चुंबक काम वांछिती ।
तन्न्यायें त्रिविधमूर्ती । कामिनली भेटीसी ॥ ३१ ॥
ऐसी गोरक्षकाची ऐकतां वाणी । तोही पडला कामवेष्टणीं ।
म्हणे वत्सा माझा स्वामी । पाहूं ऐसें वाटतसे ॥ ३२ ॥
मग कांहीं दिवस तेथें राहून । करिते झाले उभय गमन ।
वैदर्भदेशींचा मार्ग धरुन । गमत असती उभयतां ॥ ३३ ॥
तों कौंडण्यपुरीं सहज ग्रामांत । करुं गेलें उभय भिक्षेतें ।
तों तेथींचा शशांगर नृपनाथ । कोपलासे स्वसुता ॥ ३४ ॥
कोपला परी चौहटाआंत । दूतांहातीं ओपूनि सुत ।
खांडित करुनि पदहस्त । जौहटातें टाकिला ॥ ३५ ॥
यावरी श्रोते कल्पना घेती । राव कोपला सुतावरती ।
तो कोप तया कवण अर्थीं । सुतावरी पेटला ॥ ३६ ॥
तरी हे कविज्ञ महाराजा । दाव सकळ निर्णय चोजा ।
गूढत्व ठेवूनि ग्रंथीं भोजा । प्रांजळपणीं असावा ॥ ३७ ॥
ऐसें ऐकतां श्रोत्यांचें वचन । कवि म्हणे घ्या अनुसंधान ।
तेथींचा राव शशांगर नाम । प्रज्ञावंत धार्मिक ॥ ३८ ॥
धैर्य औदार्य बळ संपत्ती । सत्त्वस्थ यश करी कीर्ती ।
ऐसा असूनि शशांगर नृपती । परी संतति नसे त्या ॥ ३९ ॥
संतति नसे तेणेंकरुन । राव जाहला चित्तीं उद्विग्न ।
न आवडे वैभव राज्यकारण । छत्रसिंहासन नावडे ॥ ४० ॥
नावडे आसन वसन शयन । नावडे अन्नोदकादि पान ।
नावडे चातुर्यभोगादि गायन । कळाकुशळ गुणस्वी ॥ ४१ ॥
सदा विराजूनि एकांतस्थानीं । वंशलतेची करी घोकणी ।
तो एक दिवशीं मंदाकिनी । कांता बोले रायातें ॥ ४२ ॥
म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा । धाक धरितां संततिकामा ।
परी लल्लाटरेषेच्या विधिउगमा । नसल्या व्यर्थ कां धाक ॥ ४३ ॥
तरी सर्वज्ञा सहजस्थिती । चित्त मिरवा प्रांजळवृत्ती ।
व्यर्थ कांचणी शरीराप्रती । न भंगूं द्यावें अनलातें ॥ ४४ ॥
राया वडवानळ चिंतातों क्लेश । शरीरा साहूनि हरी प्रज्ञेस ।
प्रज्ञेविण संसार ओस । होत आहे महाराजा ॥ ४५ ॥
ऐसें बोलतां मंदाकिनी । परी राया बोध न वाटे मनीं ।
चित्तदरीं व्यग्र कांचणीं । संसारवल्ली सोडीना ॥ ४६ ॥
दिवसानुदिवस अति थोर । नावरे चिंतावैश्र्वानर ।
मग एके दिवशीं अति निष्ठुर । शिव आराधूं बैसला ॥ ४७ ॥
मंत्रिकातें पाचारुन । वैभव केलें त्यांस्वाधीन ।
सवें स्वल्प दूत घेऊन । दक्षिण दिशे चालिला ॥ ४८ ॥
रामेश्र्वरा काम वरुन । जात शिवातें करुं प्रसन्न ।
तों मार्गीं चालतां कृष्णासंगम । तुंगभद्रीं भेटला ॥ ४९ ॥
तेथें राहतां मुक्कामासी । शयन करितां निशीसी ।
दशकर पंचानन स्वप्नासी । येऊनियां बोलतसे ॥ ५० ॥
म्हणे राया संसारवल्ली । तव चित्तदरीं चिंता व्यापिली ।
तरी याचि ठायीं संतानवल्ली । प्राप्त होईल तुज राया ॥ ५१ ॥
परी कृष्णातुंगभद्रा उभयसरितीं । संगमचिमट्यांत तटक्षितीं ।
अपर्णेसहित माझी मूर्ती । नित्य अर्चीं त्या लिंगी ॥ ५२ ॥
लिंग अर्चितां सकाम कामा । स्वार्थ पावशीं नरेंद्रोत्तमा ।
याविण खंती जावया तुम्हा । अन्य उपाय नसेचि ॥ ५३ ॥
ऐसा स्वप्नीं दृष्टांत होतां । तेंचि आवडे नरेशचित्ता ।
मग मित्रडोहसंगमसरिता । जाऊनियां विलोकी ॥ ५४ ॥
तों जुनाट लिंग दिसलें तेथ । होतें तटीं प्रतिष्ठेरहित ।
रायें पाहूनि सप्रेमभरित । प्रतिष्ठेंत मिरविलें ॥ ५५ ॥
मिळवूनि पंचोपचारक । तया उभवूनि प्रेम दोंदिक ।
प्राणप्रतिष्ठा करुनि आरचक । तया ठायीं मिरवला ॥ ५६ ॥
तयालागीं उत्साह थोर । भावने रक्षी रामेश्र्वर ।
परी कीर्तिध्वज संस्कार । अपार लोक मग येती ॥ ५७ ॥
करुनि हराचे जयजयकार । अखंड होतां नामीं गजर ।
जय जय शिव संगमेश्र्वर । ऐसें लोक बोभाती ॥ ५८ ॥
परी तयानिकट मध्यक्षिती । भद्रसंगम ग्रामवस्ती ।
तयामाजी भूदेव जाती । एक असे प्राज्ञिक ॥ ५९ ॥
मित्राचार्य तयाचें नाम । वेदपाठकी उत्तमोत्तम ।
तयाची दारा शरयू नाम । पतिव्रता आगळी ॥ ६० ॥
आगळी परी संततीविण । दोघे होती अति क्षीण ।
मग तीं उभयतां सुलक्षण । त्याचि शिवा अर्चिती ॥ ६१ ॥
ऐसें लोटतां कांहीं दिवस । तों स्वर्गीं वर्तलें काय कथेस ।
सर्व गण मिळूनि सभेस । शिवा बैसले वेष्टूनी ॥ ६२ ॥
सुधाम अति मनोहारक । रत्नजडित तें हाटक ।
तरी धाम नोहे वैडूर्यविकासिक । शिवसभा मिरवतसे ॥ ६३ ॥
ऐसिये सभे ते काळीं । बैसली असतां गणमंडळीं ।
सुरोचना अप्सरा चंद्रमौळी । पाचारिता पैं झाला ॥ ६४ ॥
तंव ती सुरोचना देवांगना । वेगीं येऊनि सिद्धांगना ।
मदनांतकाच्या लागूनि चरणा । नाट्यपरी वहिवटली ॥ ६५ ॥
नाट्यें करितां चातुर्यगायन । चतुर्थ स्वरीं परम संपूर्ण ।
तानमानीं संकेत दावून । नृत्य करी आगळी ॥ ६६ ॥
परी नृत्य करितां भावनेंत । भावना कल्पी स्वचित्तांत ।
कीं स्मरारीतें होऊनि रत । कामभावनें निवटावें ॥ ६७ ॥
ऐसिये कामनीं पेटूनि कामा । परी काम दाटला शरीरउगमा ।
तेणेंकरुनि नाट्यें उत्तमा । नृत्य करिता चांचरली ॥ ६८ ॥
चांचर्णा पाहुनि अपर्णाकांत । तियेची भावना आणून चित्तांत ।
म्हणे कामीण कामनलातें । पेटली ही अप्सरा ॥ ६९ ॥
तरी अहंकार विलक्षण । योग्य नव्हे ही कामीण ।
तरी ईतें सुलभ जन्म । देऊनियां रत व्हावें ॥ ७० ॥
ऐसी कल्पना आणूनि चित्तीं । बोलता झाला पशुपती ।
म्हणे सुरोचने काम चित्तीं । तुझा मातें समजला ॥ ७१ ॥
तरी तूं ऐसिया भ्रष्टपणीं । शीघ्र पावसी मृत्यअवनीं ।
भद्रसंगमी जन्म घेऊनी । विप्रकुशी मिरविसी ॥ ७२ ॥
मित्राचार्य पिता तया नाम । माता शरयू परम सुगम ।
तियेचे कुशीं तुज जन्म । मानवदेहीं मिरवीं कां ॥ ७३ ॥
ऐसें वदतां गिरिजाकांत । सुरोचना भयभीत ।
चित्तीं म्हणे स्वर्गच्युत । हीनदैवें झालें मी ॥ ७४ ॥
अहा चित्तीं उदेलें दैवमांदुस । तेथें उदेला दैवें खईस ।
तेवीं इच्छिल्या शिवरतीस । अलाभातें मिरवलें ॥ ७५ ॥
अहा जी करुं जातां एक । प्रारब्ध घडवी अनेक ।
करी कवळितां रत्नमाणिक । काचमणी निवडिला ॥ ७६ ॥
ऐसी सुरोचना चित्तीं चिंतून । करिती झाली म्लानवदन ।
उपरी तिनें स्तुतिस्तवन । शिवालागीं आरंभिलें ॥ ७७ ॥
म्हणे महाराजा कैलासपती । नंदीवहना चक्रवर्ती ।
त्रिशूळपाणी सर्वांगी विभूति । व्यक्ताव्यक्त अससी तूं ॥ ७८ ॥
फरशांकुश गदा तोमर । डमरु चक्र कपालपात्र ।
इंही शोभी दशकर । रुंडमुंडभूषणिका ॥ ७९ ॥
भाळी इंदु कबरीं गंगा । श्र्वेतवर्णा करिसी योगा ।
वस्ती सुलक्षें आवडे नगा । पूर्ण जोगा साधावया ॥ ८० ॥
तरी हे उभा माया धवा । हेवा श्रेष्ठा महाभावा ।
विज्ञानधारणीं अनुभवा । महादेव तुज म्हणती ॥ ८१ ॥
तरी आतां प्रज्ञावंता । चुकुर माझी वारी व्यथा ।
भोळेपणीं मानूनि चित्ता । उश्शापातें वदावें ॥ ८२ ॥
ऐसी ऐकूनि तिेयेची वाणी । तोषला मृडानीवर मनीं ।
म्हणे सुरोचनें तूतें अवनीं । प्राप्त होईल निश्र्चयें ॥ ८३ ॥
परी मातें तूं आर्चितां । प्रत्यक्ष होऊनि तुझिया अर्था ।
मग सहज माझा स्पर्श होतां । स्वस्थानातें तूं येशी ॥ ८४ ॥
हाचि माझा वरउश्शाप । तरी खेदातें करी लोप ।
ऐसे बोलतां गणार्णवभूप । चालती झाली उर्वशी ॥ ८५ ॥
भद्रासंगमीं विप्रोत्तम । मित्राचार्य पवित्र नाम ।
शरयू कांतें वरितां काम । दृश्य झाली जठरातें ॥ ८६ ॥
पुढें लोटतां दिवसानुदिवस । पूर्ण होतां नव मास ।
कन्यारत्नपंकजास । उदय झाला वेल्हाळ ॥ ८७ ॥
परी ती ठायींची उर्वशी । कवणा न वर्णवें स्वरुपासी ।
बालार्ककिरणीं सतेजराशी । कनकपंकजा मिरवतसे ॥ ८८ ॥
चंद्राननी आकर्ण नयन । खंजरीटकलिका दैदीप्यमान ।
जिचें पाहतां मुखमंडन । मदन मूर्च्छा वरीतसे ॥ ८९ ॥
जिचे दंत माणिकवर्णी । अधर विकासत सुहास्यवदनी ।
दंततेजें पाषाणतरणी । रत्नपंकजा मिरवतसे ॥ ९० ॥
पवळदेंठी अधरभार । सरळ नासिका पवनस्थिर ।
परमतेजवंत वक्र । पाहूनि चंद्र लाजतसे ॥ ९१ ॥
चंपकमालतीसुवासमाला । कीं मलयागरें दिधली कळा ।
ऐसे गंधीं षट्पदमेळा । रुंजावया धांवतसे ॥ ९२ ॥
एक कोश वनांत । तरु होती तैं सुगंधित ।
मृत्तिका वरुनि मृगमदास । सर सर परतें म्हणविती ॥ ९३ ॥
ऐसियेपरी गजगामिनी । दिवसेंदिवस वृद्धि होऊनी ।
द्वादश वरुषें पवित्रपणी । नामें कदंबा मिरवतसे ॥ ९४ ॥
परी ती कदंबा शुभाननी । द्वादश वरुषें इंद्रियदमनीं ।
पिता पतीतें पडतां यत्नीं । परी न वरी भर्त्यातें ॥ ९५ ॥
सदा विरक्त शिवस्मरणीं । शिवध्यान आसनीं शयनीं ।
काया वाचा अंतःकरणीं । शिववेधें वेधली ॥ ९६ ॥
शिवार्चनीं तात माता । जाती नित्य उभयतां ।
तयांसंगें लावण्यलता । कदंबाही जातसे ॥ ९७ ॥
बाळपणीं नित्य नित्य । शिवदर्शन तियेसी होत ।
पुढें होता वयस्थित । शिव स्वतः अर्चीतसे ॥ ९८ ॥
ऐशीं लोटतां द्वादश वरुषें । तों कोणे एके सुदिन दिनास ।
गृहीं सांडूनि तातमातेस । शिवालयीं गेली ते ॥ ९९ ॥
तंव ते समयीं देवळांत । कोणीच नसे एकांतात ।
कदंबा तेथें संचार करीत । एकटपणी शुभांगी ॥ १०० ॥
Shri Navanatha BhaktiSar Adhyay 30 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तीसावा (३०)
Custom Search
No comments:
Post a Comment