Friday, March 25, 2016

Shree Navanath Bhaktisar Adhyay 35 Part 2/2 श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय पस्तीसावा (३५) भाग २/२


Shree Navanath Bhaktisar Adhyay 35 
Revannath blessed by God Dattaguru and received Mahima siddhi as a blessing. He started to feed all the people in the village and those who were coming in the village. He started to give them whatever they want. Machchhindra came to know about this when he came to that village. He started feeding birds, wild animals that were coming near to him for eating without any fear. Birds sit on his shoulders and use to eat. Revananath also asked Mahima Siddhi that he wanted to do the same. But Mahima told him that it was possible to Machchhindra as he was a Brahmavetta. Revananath started tapas so that his Guru ShriDatta Guru should bless him. Machchhindra went to Girnar and ShriDatta Guru about Revananath. God Dattaguru blessed Revananath and imparted him all the knowledge. Then he sends Revananath for tirtha yatra. He came to a village where Saraswati Brahman with his wife Janhavika offered him Bhiksha. Next day Revananath came to know that only son of that couple died. He told them that he would go to Swarga and bring back there son from Yama till such time for three days he asked them to protect body of their son. What happens next will be told to us by Dhundisut Malu from Narahari family in the next 36th Adhyay.
श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय पस्तीसावा (३५) भाग २/२
ऐसी ऐकूनि जगाची गोष्टी । चित्तीं म्हणे हा प्रतापकोटी ।
सिद्धि सकळ साधला जेठी । कोठें तरी गुरुकृपें ॥ १०१ ॥
तरी आतां सिद्धि कोण । झाली आहे यास्वाधीन । 
त्या सिद्धीतें पाचारुन । वृतान्त श्रुत व्हावा कीं ॥ १०२ ॥
मग अणिमा गरिमा लघिमा महिमा । ईशित्व वशित्व प्राप्ति प्रकामा ।
ऐशा अष्टसिद्धि नामा । पाचारिल्या प्रत्यक्ष ॥ १०३ ॥
प्रत्यक्ष होतां त्या शुभाननी । श्रीनाथाच्या लागल्या चरणीं ।
नाथ म्हणे त्यांतें पाहूनि । उत्तर माझें ऐकावें ॥ १०४ ॥
रेवणसिद्ध हा महापुरुष । त्याचे सिद्धि दासत्वास ।
कोणती सांगा आहे आम्हांस । गुरुवाक्येंकरुनियां ॥ १०५ ॥
तंव ती बोलती झाली महिमा । मातें ओपिलें दास्यनेमा । 
श्रीदत्तात्रेययोगद्रुमें । मंत्रसिद्धीकरुनियां ॥ १०६ ॥
मग दत्तात्रेय हा ऐकूनि गुरु । म्हणे हा बंधूचि साचारु ।
आहे तरी सर्वांपारु । हित इच्छिणें तयाचें ॥ १०७ ॥
जैसा अर्धपिंडीं भाग । मारुतिदेहीं उद्भवला योग ।
परी सीताहरणीं भोगिला भोग । साह्य होऊनि तयासी ॥ १०८ ॥
किंवा मागील संगेकरुन । गोपाळ झाले वानरगण ।
सर्व साह्य होऊन । माहात्म्यीं कृष्ण वाढविला ॥ १०९ ॥
तेवीं आपुली ऐसी मती । चमसनारायण स्वसंगतीं ।
तरी या रेवणसिद्धाप्रती । साह्य आपण व्हावें सर्वस्वीं ॥ ११० ॥
मग तेथूनि निघे अतिवेग । गिरनारपर्वतीं आला चांग ।
भेटूनि अत्रिआत्मजयोग । रेवणसिद्धाचें वृत्त कथियेलें ॥ १११ ॥
सलीलपणीं चरणीं माथा । ठेवूनि म्हणे अनाथनाथा ।
हे गुरुराजा दयावंता । साधकहिता भास्करु ॥ ११२ ॥
तरी अवनीं अवतारपूर्ण । प्राप्तिक चमसनारायण ।
तो तुम्हांकरितां क्लेश दारुण । महीलागीं भोगतसे ॥ ११३ ॥
निर्वाण धरुनि चित्तीं । बैसला आहे काननाप्रती ।
तरी कृपाबोध मारुतगती । तयावरी सिंचावा ॥ ११४ ॥
अहा एक सिद्धि आणूनि त्या भास । घालूनि गळां दृढोत्तर फांस ।
तरी तो फास झाला क्लेश । मरणवाट त्या दावी ॥ ११५ ॥
जेथें झाली तुमची भेटी । तेथेंचि बैसला काननपुटीं ।
आहार त्यजूनि प्राण कंठीं । आणूनियां ठेविला ॥ ११६ ॥
त्वचा झाली अस्थिव्यक्त । देहींचें रुधिर आटलें समस्त ।
प्राण कासावीस चक्षु श्र्वेत । कार्पाससम दिसताती ॥ ११७ ॥
सर्वांगींच्या शिरा दृश्य । ढळढळीत दिसती महापुरुष ।
पोटपाठ ऐक्यलेश । हरिकटीसम मिरवत ॥ ११८ ॥
तरी महाराजा सदैव माउलें । वत्सा करावें काय इतुलें ।
अवकृपा करणें नव्हें भलें । महीलागीं मिरवावें ॥ ११९ ॥
लोहाचें कनक करी परीस । तेणें सांडिला पाकरस ।
तरी परीस ऐसें कोण त्यास । म्हणेल दगड मिरवेल ॥ १२० ॥
कीं एक तमाचा अरि पूर्ण । तेणें सोडिलें चांगुलपण ।
मग सविताराज तया कोण । महीलागीं बोलेल कीं ॥ १२१ ॥
आपुला वरदपाणी । स्पर्शिला जाय मौळीलागुनी । 
मग तो सर्वांलागूनि अवनीं । ठेंगणेपणीं मानीतसे ॥ १२२ ॥
ऐशी चाल सहजस्थित । गुरुची असे कृपा मूर्त ।
तरी रेवणनाथदेह आहुत । कष्टानळीं न सांडावी ॥ १२३ ॥
पहा जीवनें केली लावणी । सुखा आणिलें थोरपणीं ।
तें शुष्क केलिया मोहेंकरुनी । बुडवूं न शके जीवन तें ॥ १२४ ॥
त्याचि नीतीं पीयूषभास । सेविल्या ओपी संजीवनपणास ।
तें पुढें कोपल्या मृत्युपदास । पाठवील कीं महाराजा ॥ १२५ ॥
तरी त्या पीयूषरसाच्या गांवीं । स्वप्नामाजी मृत्यू नाहीं ।
तैसें तुमच्या हृदयीं । औदार्य बहु वसतसे ॥ १२६ ॥
ऐसे बोल त्या युक्तिवानाचे । ऐकूनि दत्तहृदयीं प्रेम नाचे ।
डोलवूनि ग्रीवा साचें । साह्य करी आनंदे ॥ १२७ ॥
मग तो उदार शांत दाता । सवें घेऊनि मच्छिंद्रनाथा ।
व्यान अस्त्र जल्पूनि चित्ता । तया ठायीं पातला ॥ १२८ ॥
परी त्या उभय भव्यमूर्ती । जैसे उतरले दोन गभस्ती ।
कीं इंद्र वाचस्पती । प्राज्ञिकपणीं मिरवले ॥ १२९ ॥                            
कीं एक हरि एक हर । कीं द्रोण मंदराचल किमयागार । 
प्रेममारुता होऊनि स्वार । तया ठायीं पातले ॥ १३० ॥
तों येताचि देखिला रेवणनाथ । कृश शरीर काष्ठवत ।
अस्थिमय प्राण व्यक्त । वाट पाहे दत्ताची ॥ १३१ ॥
अतिक्लेशी कंठीं प्राण । पाहूनि श्रमला अत्रिनंदन ।
प्रेमें कवळिला सदयपणें । माय जैसी बाळकातें ॥ १३२ ॥
कीं वत्सालागीं जैसी गाय । हंबरडा फोडी अति मोहें ।
तेवीं अत्रिनंदनें प्रेमहृदयें । प्रियभावें आलिंगिला ॥ १३३ ॥
तेणेंही चरणीं ठेवूनि माथा । होय प्रेमाश्रु ढाळिता । 
म्हणे आजी भेटली माझी माता । निढळवाणीं वत्सातें ॥ १३४ ॥
मग तो महाराजा तपोराज । हृदयीं धरी अत्रिआत्मज ।
मग साधक हिताचें चोज । ओपीतसे उल्हासें ॥ १३५ ॥
जैसें सुतालागीं तात । हिता ओपूनि परत्र होत ।
तेवीं दुर्वाससहोदर मोहित । होऊनि हिता मोहीतसे ॥ १३६ ॥
परम आराधूनि कृपें न्याहाळीं । कर्णी ओपिली मंत्रावळी ।
तेणें तद्धटी (त्या क्षणीं) अज्ञानकाजळी । निघूनि गेली सर्वस्वीं ॥ १३७ ॥
मग तो ज्ञानी हृदयीं दिवटा । नृत्य करीतसे तत्त्वचोहटां ।
तेणेंकरुनि द्वैतकांटा । अंकुरातें खुडियेला ॥ १३८ ॥
मग कृपें आराधूनि वज्रशक्ती । भाळीं चर्चिली दिव्य विभूती ।
तेणेंकरुनि देहस्थिती । शक्तिवान मिरवली ॥ १३९ ॥
मग सवें घेऊनि रेवणनाथ । गिरनारपर्वतीं गेला दत्त । 
तेथें बैसूनि दिवस अमित । विद्यावसन नेसविलें ॥ १४० ॥
ब्रह्मज्ञानरसायन । विपुलपणीं केलें पान ।
तेणेंकरुनि ऐक्यपण । चराचरीं मिरवलें ॥ १४१ ॥
ऐसा झाला तयातें आभास । कीं मीच स्वामीचा भास ।
मीच व्याप्त चराचरीं असें । एकदेहीं मिरवलों ॥ १४२ ॥
मग पक्षिकुळा वनचरांसहित । अचलपणीं पाषाणलता । 
समीप येती पाचारितां । रेवणनाथा वंदावया ॥ १४३ ॥
ऐशी अद्वैतदृष्टि होतां । मग रसायनादि शीघ्र कविता ।
वेदपाठी ज्योतिषअर्था । प्रवीण कळा व्याकरणीं ॥ १४४ ॥
धनुर्धर जळतरणी । वैद्य नाटकें चातुर्यगीत गायनी ।
कोकशास्त्रादि अश्र्वारोहणी । चतुर्दशविद्या निरोपिल्या ॥ १४५ ॥
उपरी नानाशास्त्रप्रवीण । अस्त्रें सांगितलीं मच्छिंद्रासमान ।
वज्रअस्त्रादि वाताकर्षण । संजीवनी सांगीतली ॥ १४६ ॥
वातास्त्र धूमास्त्र अग्निअस्त्र । नागास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र ।
जलदअस्त्रादि खगेंद्रास्त्र । ब्रह्मास्त्रादि निरोपिलीं ॥ १४७ ॥
निर्वाण रुद्रास्त्र वासवशक्ती । देवास्त्र मोहनास्त्र दानवास्त्रगती ।
असो ऐसें वर्णितां किती । अपार अस्त्रीं मिरवला ॥ १४८ ॥
मग नाथपंथीं दीक्षा देऊनि । उन्मनी मुद्रा फाडिले कान ।
तत्त्वामाजीं दिव्यज्ञान । गळां कंथा ओपिली ॥ १४९ ॥
देवविती शुद्ध सांरगी । अनुहत वाजे नाना अंगीं ।
कुबडी फावडी देहप्रसंगीं । देह विदेही मिरवला ॥ १५० ॥
ऐसा होऊनि पूर्ण स्थित । मग सवें घेऊनि मच्छिंद्रनाथ ।
मार्तंडपर्वतीं गेले त्वरित । नागेश्र्वरस्थाना वंदिलें ॥ १५१ ॥
तेथें करुनि देवदर्शन । वरद घेतला विद्येकारण ।
मग साबरीविद्या कवित्वरचन । महीवरी मिरवतसे ॥ १५२ ॥
असो सर्व साध्य झाल्यावरी । मावदें मांडिलें बहुतां गजरीं । 
हरिहरादि साह्यकारी । गिरनारपर्वतीं आणिले ॥ १५३ ॥
सुवर्लोक भूलोक तपोलोक । स्वर्गवासी पुण्यश्र्लोक ।
गणगंधर्व सुरवर अनेक । मावद्यास आणिले ॥ १५४ ॥
ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर । अश्र्विनीकुमार चंद्र भास्कर ।
सकळ समुच्चय पर्वताकार । माचद्यातें पातले ॥ १५५ ॥
चार दिवस यथायुक्त । सोहळा भोगिला अपरिमित ।
मग प्रसन्न होऊनि सकळ दैवतें । पूर्ण वरा ओपिलें ॥ १५६ ॥        
वर देऊनि सकळ विद्येसी । जाते झाले स्वस्थानासी । 
रेवणसिद्धही तीर्थाटनासी । अत्रिआत्मजें पाठविला ॥ १५७ ॥
तीर्थें हिंडतां अपार महीसी । तों विटग्राम मानदेशीं ।
तेथें येऊनि मुक्कामासी । सहजस्थितीं राहिला ॥ १५८ ॥
तों तेथें सरस्वती ब्राह्मण । जान्हविका स्त्री तयालागून ।
लावण्यलतिका स्वरुपवान । चंद्रासी वदनें लाजवीतसे ॥ १५९ ॥
उभय स्त्रीपुरुष एकचित्ती । जेवीं ते लोहचुंबकरीती ।
किंवा जगप्रिय गभस्ती । अवियोगप्रीतीं वाहिलें ॥ १६० ॥
कीं मीनतोयाची संगती । कीं विवरस्थाची एकनीती ।
कीं भावाअंगीं सिद्धभक्ती । सदा धवळारीं नांदतसे ॥ १६१ ॥
तन्न्यायें उभयतां जाण । प्रपंच वहिवाटिती एकप्रमाण ।
परी इतुकें असोनि जठरीं संतान । शून्यपणें मिरवत ॥ १६२ ॥
सप्त पुत्र झाले तयासी । परी बाळपणीं पंचत्व देहासी ।
सातवे आठवे दिवशीं । दहावें दिवशीं पंचत्व होय ॥ १६३ ॥
ऐसे षट्पुत्र देहान्त पावले । यावरी सातवें उदय पावलें ।
तें द्वादश दिन वांचलें । तेणें हर्षलें विप्रमन ॥ १६४ ॥
कांतेसी म्हणे परम वेल्हाळे । पंचम षष्ठ भक्षिले काळें ।
हें द्वादश दिन केवळ वांचलें । काळवेळ लोटली येणें ॥ १६५ ॥
एक आणि चुकल्यापरीस । तो दश वर्षांचा होय आयुषी ।
तरी आतां या पुत्रासी । भय नसे सर्वथा गे ॥ १६६ ॥
ऐसें कांतेसी बोलूनि वचन । बारसें मांडिलें परम आवडीनें ।
गृहीं करुनि पमचपक्वानें । घाली भोजन विप्रांसी ॥ १६७ ॥
तों ते दिवशीं रेवणनाथ । भिक्षा करीत आला तेथ ।
अलक्ष गाजवूनि त्या द्वारातें । पुढें पाऊल ठेवीतसे ॥ १६८ ॥
तंव त्या विप्रें देखिलें दुरोनी । वाढतें पात्र ठेविलें धरणीं ।
तैसाचि बाहेर येऊनी । नाथानिकट लगबगें ॥ १६९ ॥
तंव तेजःपुंज हाटककांती । देखतां विप्र म्हणे चित्तीं ।
हा पूर्वतापसी अवतार क्षितीं । कोणी तरी आहे कीं ॥ १७० ॥
तैसाचि सोहळा लगबगेंकरुन । नाथाचरणीं मस्तक ठेवोन ।
म्हणे महाराजा प्रयोजन । माझे घरीं आहे कीं ॥ १७१ ॥
ऐसें असोनि मज दरिद्रियाचे मनोरथ । डावलूनि जातां किमर्थ ।
तरी हें तुम्हां नव्हे यथार्थ । अनाथा सनाथ करावें ॥ १७२ ॥
मी हीनदीन जाति ब्राह्मण । काय करावा उत्तम वर्ण ।
सेवाचोर अतिथिकारणें । व्यर्थ संसारीं मिरवतो ॥ १७३ ॥
ऐसें बोलोनि म्लान वाणीं । माथा वारंवार ठेवी चरणीं ।
आपुला वर्णाश्रम टाकोनी । विव्हळ झाला भावार्थें ॥ १७४ ॥
त्यावरी नाथ बोले त्यासी । आम्ही शूद्र तूं विप्र मिरविसी ।
मज नमस्कारावया तुजसी । अर्थ नाहीं जाणिजे ॥ १७५ ॥
येरु ऐकूनि बोले वचन । शुद्ध जातीचा ब्राह्मण । 
तो मातंगा करील नमन । अन्य वर्ण चुकेल कैसा ॥ १७६ ॥
कड़ू भक्षिता काय होय गोड । होणार नाहीं धडफुडा ।
प्राज्ञिक मानिला जेणें वेडा । तरी त्या पंडिता धिक्कारा ॥ १७७ ॥
तरी ऐसें वर्म निपुण । मज कैसे येईल घडून ।
परी देखावें श्रेष्ठ वचन । ऐसी विनंती करीतसे ॥ १७८ ॥
ऐसें बोलतां विप्र त्यातें । मनांत म्हणे रेवणनाथ । 
हा विप्र आहे प्रज्ञावंत । बोलापरी चालतसे ॥ १७९ ॥
नातरी बोल बोलतां सोपे । आचार दावितां टीर कांपे ।
तरी आतां असो यातें स्वल्प । सिद्धार्थातें मेळवूं ॥ १८० ॥
मग विप्राचा धरुनि हात । संचार करी त्याचे गृहांत ।
विप्रें नेवोनि स्वसदनांत । महाराज बैसविला ॥ १८१ ॥
पात्र लगबगें आणी वाढून । सर्व पदार्थ भरी प्रेंमेंकरुन ।
पात्रानिकट बैसोन । भोजन सारी नाथाचें ॥ १८२ ॥
अन्य विप्रां विप्र नेमून । सकळांचे करी संगोपन । 
परी आपण न उठे नाथापासून । परमभक्तिसी गुंतला ॥ १८३ ॥
जैसी शर्करेसी पिपीलिका । काढूं जातां दडपी मुखा ।
तेवीं भक्तीचा आवांका । विप्र गुंतला नाथभक्ती ॥ १८४ ॥
असो ऐसे परम भक्तीं । नाथाची झाली जठरतृप्ती । 
येरीकडे विप्रपंगती । गेले भोजन सारुनियां ॥ १८५ ॥
विप्र गेले आपुले सदनीं । येरीकडे नाथालागुनी ।
भोजन झाल्या नम्रवचनीं । बोलता झाला विप्र तो ॥ १८६ ॥
म्हणे महाराजा आजिचा दिन । वस्तीसी सेवावें माझें सदन ।
उदयीक प्रातःकाळीं उठून । जाणें असेल तरी जावें ॥ १८७ ॥
पाहूनि तयाचा परम आदर । अवश्य म्हणे विधिकुमर ।
एकांतस्थानीं शयनावर । नाथा नेऊनि पहुडविलें ॥ १८८ ॥
नाथ शयनीं होतां निद्रित । आपण भोजन सारुनि त्वरित ।
वारासार (झाडलोट) करुनि येत । नाथापाशीं त्वरेनें ॥ १८९ ॥
तों सूर्य गेला अस्तासी । मग उठूनि बैसला तापसी । 
पुन्हां वंदूनि नाथचरणांसी । उपहार करावा म्हणतसे ॥ १९० ॥
तंव नाथ म्हणे आतां भोजन । झालें आहे न इच्छी मन ।
मग आपुला नित्यनेम सारुन । पुन्हां शयनीं पहुडला ॥ १९१ ॥
सरस्वती ब्राह्मण निकट बैसून । नाथाचे चुरीतसे चरण ।
तों मध्यरात्री झाली पूर्ण । तेव्हां विपर्यास वर्तला ॥ १९२ ॥
बाळ जें होतें मातेपाशीं । सटवीनें झडपिलें त्यासी । 
परम तें झालें कासाविशी । शोकसिंधु उचंबळला ॥ १९३ ॥
हांक मारी स्वभर्त्यातें । म्हणे बाळ कासाविसी बहु होतें ।
विप्र म्हणे त्या कांतेतें । होईल तैसें होऊं दे ॥ १९४ ॥
तूं न करीं आतां कांहीं अनुमान । निद्राभंग होईल नाथाकारण ।
आपुलें प्रारब्ध मुळींच हीन । सुलभ पुढें दिसेना ॥ १९५ ॥
मागें आचरलों कांहीं पाप । तें भोगितों अमूप ।
आतांही मोडतां स्वामींची झोंप । सुलभ पुढें दिसेना ॥ १९६ ॥
ऐसें बोलूनि कांतेतें । श्रीनाथाचे चरण चुरीत ।
तों सवितासुताचे येऊनि दूत । बाळ पाशीं आकर्षिला ॥ १९७ ॥
काढूनि चैतन्य जीवदशा रुप । घेऊनि गेले यमासमीप । 
येरीकडे शवस्वरुप । बाळ देहीं मिरवलें ॥ १९८ ॥
मग तो मायेचा मोह दारुण । हृदयीं पेटला विरहअग्न ।
मग मंद रुदन भरतां नयन । जान्हवी तेव्हां करीतसे ॥ १९९ ॥
तों प्रातःकाळसमय झाला । शयनीं नाथ जागृत झाला ।
तों मंद रुदनार्थ आकर्णिला । एकाएकीं तयानें ॥ २०० ॥
नाथें ऐकूनि मंद रुदन । विप्रासी म्हणे रडतें कोण ।
येरु म्हणे बाळकाचा प्राण । कासावीस होतसे ॥ २०१ ॥
म्हणोनि मोहस्थित नाथा । अज्ञानपणीं रडते कांता । 
ऐसी ऐकूनि तयाची वार्ता । बाळा आणीं म्हणतसे ॥ २०२ ॥
मग तो विप्र स्वकांतेपाशीं । येऊनि पाहे स्वपुत्रासी । 
तंव तें मिरवलें प्रेतदशेसी । हांका मारुनि तेधवां ॥ २०३ ॥
म्हणे महाराजा प्राणरहित । बाळ झालें जी निश्र्चित ।
ऐसें ऐकूनि रेवणनाथ । परम चित्तीं क्षोभला ॥ २०४ ॥
म्हणे मी या स्थळीं असतां । कैसा डाव लाधला कृतांता ।
तरी तो कृतान्त पाहीन आतां । पाहूनि नाहींसा करीन मी ॥ २०५ ॥
ऐसे दुर्घट शब्द वदोन । ब्राह्मणासी म्हणे बाळ आण ।
तंव तें शरीर उचलोन । नाथालागीं अर्पीतसे ॥ २०६ ॥
तंव ते बाळ परम गोमटें । नाथ पाहे आपुले दृष्टीं ।
चित्तीं हळहळूनि म्हणे नष्ट । कर्म काय उदेलें ॥ २०७ ॥
विप्रासी म्हणे बाळ तूतें । इतुकेंचि झालें काय नितांत ।
येरी म्हणे कृपावंत । बाळ सातवें हें असे ॥ २०८ ॥
बाळ होतां बाळंतपणीं । मृत्यु पावले पंचसप्तमदिनीं ।
द्वादशदिन तपःप्राज्ञी । बाळ सातवें हें असे ॥ २०९ ॥
तरी आतां असो कैसें । हीन प्रारब्ध आहे आम्हांस ।
तें सुफळपणीं कर्मलेश । फळा कैसें येईल कीं ॥ २१० ॥
परी असो होणार तें झालें । आमुचे सेवेसी चित्त रंगलें ।
तें पुण्यांश हेंचि इतुलें । वारंवार लाधो कीं ॥ २११ ॥
ऐसी बोलतां विप्र वाणी । अंतर जाणितलें प्रांजळपणीं ।
मग सरस्वतीविप्रा पाचारुनी । बोलता झाला महाराजा ॥ २१२ ॥
म्हणे वत्सा तीन दिवस । जतन करीं बाळतनूस ।
मी स्वतः जाऊनि यमपुरीस । साती बाळें आणितों कीं ॥ २१३ ॥
मग अमरमंत्र मंत्रूनि विभूती । चर्चिली बाळशवाप्रती ।
म्हणे विप्रा बाळ हें क्षितीं । येणें नासणार नाहीं रे ॥ २१४ ॥
ऐसें सांगूनि त्वरितात्वरित । तेथूनि निघता झाला नाथ ।
व्यानअस्त्र जल्पूनि सनाथ । अतिवेगेंसी चालिला ॥ २१५ ॥
भोवतें अस्त्राचें करी भ्रमण । तेणें हिमालयाचे अंबुकण (पाण्याचे तुषार) ।
शीतल करुनियां जाण । यथास्थित मिरवले ॥ २१६ ॥
जैसे शीतल झुळुकेआंत । समीप पावक (अग्नि) निश्र्चित । 
तेणेंकरुनि शरीरांत । बाधा न करी अंगातें ॥ २१७ ॥
तेवीं आदिनामास्त्र । सव्य मेळवूनि योगपात्र । 
व्यानास्त्र मुखीं स्तोत्र । जल्पूनि गिरि वेधला ॥ २१८ ॥
सहज चालिला यमपुरीं । संचार करी यक्षधवळारीं ।
तों धर्मराज पाहूनि नेत्रीं । आसनाहूनि उठलासे ॥ २१९ ॥
बैसवूनि आपुले कनकासनीं । षोडशोपचारें पूजिला मुनी ।
सहज करपुटीं नम्र वाणीं । धर्मराजें आराधिला ॥ २२० ॥
म्हणे महाराजा योगदक्ष । किमर्थ कामीं योजिलें लक्ष ।
तरी तें वदूनि सुढाळ पक्ष । मज यक्षातें तुष्टवीं ॥ २२१ ॥
येरु म्हणे यमपुरनाथा । मी सरस्वतीविप्राचे घरीं असतां ।
तुवां येऊनि तयाच्या सुता । हरण केलें कैसें रे ॥ २२२ ॥
तरी जें घडूं नये ते घडलें । परी आतां मागुती देइंजे वहिलें ।
आणि षट्पुत्र त्याचे कोठें ठेविले । तेही आतां देईं आणोनी ॥ २२३ ॥
तरी या बोलासी वर्तन । तूतें न ये जरी घडून ।
मग मम कोपाचा प्रळयाग्न । उरों न देईं तुजलागीं ॥ २२४ ॥
ऐसें बोलतां रेवणनाथ । विचार करी तेजोब्धिसुत (सूर्य पुत्र यम) ।
म्हणे चांगले बोलूनि यातें । शिवधरेतें (कैलासास) धाडावा ॥ २२५ ॥
आपुल्या सर्वस्वीं निमित्ताकडून । अधिकारी करावा उमारमण ।
हा सिद्ध तेथें गेल्यानें । दृष्टी पडेल प्रतापू ॥ २२६ ॥
ऐसा विचार करुनि मानसीं । बोलता झाला योगियासी ।
म्हणे महाराजा मम बोलासी । चित्त द्यावें यथार्थ ॥ २२७ ॥
हे महाराजा हरि हर । आणि तिजा तो नाभिकुमर (ब्रह्मदेव) ।
हे मुख्य त्यांचा कारभार । सकळ करणें तयांचें ॥ २२८ ॥
जरी म्हणाल कैसे रीतीं । त्रिवर्ग त्रिकामीं असती । 
शिव क्षयीं विधि उत्पत्तीं । रक्षणशक्ति विष्णूची ॥ २२९ ॥
तरी यक्षपति तो तमोगुणविहारी । आम्ही त्याची करितों चाकरी ।
मारणें तारणें आमुच्या करीं । कांहींएक नसे जी ॥ २३० ॥
तरी आतां प्रतापराशी । गमन करावें कैलासासी ।
आराधूनि शिवचित्तासी । सप्तपुत्र न्यावे जी ॥ २३१ ॥
आणिक खूण सांगतों उत्तर । तेथेंचि आहेत सप्तकुमर । 
तरी दावूनि आपुला बद्धिसंचार । कार्य आपुलें करणें जी ॥ २३२ ॥      
मजवरी जरी आलां आपण कोपोन । तरी मी काय हीनदीन । 
क्षयकर्ता उमारमण । प्रसिद्धपणीं मिरवतसे ॥ २३३ ॥
क्षयकर्ता आहे भव चराचरीं । शास्त्रादि बोलती साचार ।
आपणही आहांत जाणिव सर्व । अंतरंग सर्वांचे ॥ २३४ ॥
ऐसें असोनि महाराज । कां कोपानळीं योजितां मज ।
सोज्ज्वळतेजीं अर्कराज । तमधवळारा नांदवितां ॥ २३५ ॥
तुम्ही सर्वांचे ज्ञानदिवटे । कूपीं पडतां अज्ञानवाटे ।
हें योग्य नव्हे तुम्हां हळवटे । धोपटपंथीं मिळाना कां ॥ २३६ ॥
ऐसें बोलतां धर्मराज । मान तुकवी तेजःपुंज । 
म्हणे हें पंचाननाचें काज । तें सत्यार्थ बोलसी तूं ॥ २३७ ॥
तरी आतां कैलासीं जाईन । कैसा आहे पंचानन ।
तो सत्वर दृष्टीं पाहीन । अमित्रपण त्यासुद्धां ॥ २३८ ॥
ऐसें बोलूनि योगधारणी । उठता झाला मग तेथुनी । 
व्यानअस्त्र मुखीं स्तवोनी । कैलासातें पातला ॥ २३९ ॥
आतां तेथें कथा सार । होईल तितुकी धुंडीकुमर ।
मूळकाव्य ग्रंथापर । नरहरिकृपें वर्णीत ॥ २४० ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । पंचत्रिशाध्याय गोड हा ॥ २४१ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार पंचत्रिंशाध्याय संपूर्ण ॥ २४२ ॥
Shree Navanath Bhaktisar Adhyay 35  श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय पस्तीसावा (३५) 


Custom Search

No comments: