Shri Navnath BhaktiSar Adhyay 37
Nagnath came to know that Dattaguru is daily coming in the afternoon to Kolhapur for Bhiksha. So to meet him and found out him he started to feed all the people in Kolhapur and to those coming into Kolhapur. He was using Siddhi to do all this; So that anybody needs not to prepare food in the house at that place. He knew that Dattaguru would not accept Bhiksha of food that is prepared by using Siddhi. With this he succeeded in finding out his Guru, Who blessed him with Diksha and Brahmopadesh. Dattaguru imparted all the Astra-Shastra Vidya to Nagnath by taking him to Badrikedar. Then got done all the required practices from him and sent him for tirthyatra. Nagnath while on tirthyatra came to Vadval. He made many disciples and stayed there. One day Machchhindra came there and wished to meet Nagnath. However the disciples stopped him at the entrance of cave and asked to wait till their Guru allows him to enter. Then there was a war between Nagnath and Machchhindra at the end Machchhindra called his Dattaguru for his help. Then both knew that their Guru is the same. Then respectfully Nagnath took Machchhindra in the cave, where Machchhindra lived for three days. He told Nagnath that anybody who comes there with a wish to have his (Nagnath's) darshan must have a fee entry. In the next 38th Adhyay Dhundisut Malu from Narhari family will tell us about CharpatiNath.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सदतिसावा (३७ ) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी पंकजाक्षा । आदिपुरुषा सर्वसाक्षा ।
अव्यक्तव्यक्ता सर्वपरीक्षा । महादक्षा रमावरा ॥ १ ॥
मागिले अध्यायीं कथन । करविलें वटसिद्धनागनाथजन्म ।
उपरी सिद्धकळा पावून । कोल्हापुरीं पातला ॥ २ ॥
तेथें राहूनि लक्ष्मीआलयांत । पुजारी करुनि हस्तगत ।
सर्व सामग्री ओवरींत । नेऊनियां दाखविली ॥ ३ ॥
दाखवूनि म्हणे पुजार्यासी । सबळ पडल्या कनकराशी ।
तरी ह्या सरतील ज्या दिवशीं । तंववरी संतर्पण योजावें ॥ ४ ॥
योजावें तरी अन्यवर्ण । कांहींच धरुं नये भिन्न ।
सकळांलागीं करुनि पक्वान्न । पंगतींतें वाढावें ॥ ५ ॥
गांवामाजी सकळांकारणें । पेटूं न द्यावा पाकीं अग्न ।
द्विवेळा त्रिवेळा घालूनि भोजन । तुष्ट करावें सकळांतें ॥ ६ ॥
शेट सावकार राजा रंक । सकळांसी आणूनि ओपावा पाक ।
अंत्यजादि भूदेव लोक । तुष्ट करावें सर्वांसी ॥ ७ ॥
ऐसें सांगूनि पुजार्यातें । शीघ्र कामाठी आणवीत ।
कार्ययोगें अपरिमित । सकाम कामीं योजिलें ॥ ८ ॥
उत्तम तिथी नेम करुन । मांडव मंडप उभारुन ।
पाकालागीं सज्ज करुन । सर्व काम चालविलें ॥ ९ ॥
मग शिष्टाशिष्ट गृहीं धाडून । तयां दिधलें आमंत्रण ।
येरीकडे पाकनिर्माण । करावया लाविलें ॥ १० ॥
आणि ग्रामद्वारीं टिळा लावून । भोजनदवंडी ग्रामीं पिटून ।
सर्व सामग्री सज्ज करुन । काम चालीं चालविलें ॥ ११ ॥
शैव श्रावक आणि ब्राह्मण । भेद चौर्यायशीं देशांसमान ।
देवाग्नी विप्र ऋषि ब्राह्मण । पाक भिन्न भिन्न निर्मिती ॥ १२ ॥
पंच द्राविड देश मुलतानी । मारवाडी गुर्जर हिंदुस्तानी ।
हुसेनी पौंड्र मिळोनी । देशजाती मिळाल्या ॥ १३ ॥
असो भेदाभेद अन्यजाती । षड्मार्गांनीं पाकविती ।
खाज्या करंज्या कचुर मालती । शिरा बुंदी करिताती ॥ १४ ॥
पुरी पोळी क्षिप्रा (खीर) बहुत । चमचमीत भाज्या वरणभात ।
पंचमधु त्यांत अपार घृत । इच्छेसमान मिरवलें ॥ १५ ॥
असो पाकाग्नि सिद्ध करुन । चालते पंक्तीं सेविती अन्न ।
पुन्हां क्षुधा लागल्या परतून । येऊनि अन्न सेविती ॥ १६ ॥
प्रथम पाक जातजाती । तेथें नसे कांहीं अरुती ।
कितीक वाढूनि गृहासी नेती । भोजन करुनि मन माने ॥ १७ ॥
कोणी कोरडेंचि उपटून नेती अन्न । नेऊनि भरिती आपुलें सदन ।
मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न । सर्व झालें गांवांत ॥ १८ ॥
राव रंक कुटुंबांसहित । अन्न सेवूनि होती तृप्त ।
मग वन्ही इतुका दीपानिमित्त । गृहोगृहीं मिरवला ॥ १९ ॥
असो यापरी एक मास । ग्राम सेवी सिद्ध अन्नास ।
यावरी कथा अत्रिसुतास । कैसी वर्तली ती ऐका ॥ २० ॥
प्रथम दिनीं भिक्षेकारण । गांवांत संचरे अत्रिनंदन ।
कुश्र्चितरुपी विरुपवान । भिक्षा मागे गृहोगृहीं ॥ २१ ॥
तंव ते घरोघरींचे जन । म्हणती गांवांत प्रयोजन ।
होतें तेथें आम्हां जाणें । कुटुंबादि भोजना ॥ २२ ॥
तरी तूं सत्वरगती । जाऊनि सारीं कां आपुली भुक्ती ।
व्यर्थ शीण कासयाप्रती । वाईट कदन्न इच्छूनी ॥ २३ ॥
उत्तम पक्व अन्न टाकूनी । व्यर्थ कां शिणसी दरिद्रवान ।
कामधेनूचे कांसे आनन । कांडणकोंडा कां भक्षावा ॥ २४ ॥
कीं कल्पतरु बैसल्या ठायीं । इच्छेसमान पदार्थ देई ।
मग कां शिणावें धांवूनि पायीं । मेळवावया भुक्तीतें ॥ २५ ॥
परीस असतां गृहालागून । मग चाकरी कासया करावी हेमाकारण ।
रागें आतुडतां पीयूषपान । मग वल्लीरसायन कां इच्छावें ॥ २६ ॥
तेवीं तूं प्रकरण करिसी येथें । सोडूनि सुधारसअन्नातें ।
कदन्नाकरितां या गांवांत । हिंडतोसी मतिमंदा ॥ २७ ॥
येपरी असों आम्ही गृहासी । भोजना जातों आम्ही कुटुंबेसीं ।
पाक करावा कवणे अर्थेसीं । तुजलागीं ओपावया ॥ २८ ॥
ऐसीं घरोघरीं भाषणें । होती दत्तात्रेयाकारणें ।
मग मनांत म्हणे प्रयोजन । जाऊनि पाहूं निजदृष्टीं ॥ २९ ॥
ऐसें योजूनि स्वचित्तांत । तेथें पातला तपोनाथ ।
उभा राहूनि पाकशाळेंत । पाक लक्षांत आणीतसे ॥ ३० ॥
तंव तो महाराज योगकारण । देखतां ओळखी सिद्धिअन्न ।
थोडें करिता नगसमान । होय अपार न पचवितां ( न शिजवितां) ॥ ३१ ॥
एक पोळी पडतांचि लागली । परी सहस्त्रही वाढियेली ।
ऐशा चिन्हें ओळखिली । सिद्धिकळा महाराजें ॥ ३२ ॥
मग तेथींच्या जनालागीं पुसत । हें प्रयोजन एवढें कोण करीत ।
येरु म्हणती महा समर्थ । वटसिद्धनागनाथ करितो कीं ॥ ३३ ॥
ऐसें ऐकूनि अत्रिसुत । खूण जाणली स्वचित्तांत ।
कीं म्यां मुलासी सिद्ध पदार्थ । काशीक्षेत्रीं ओपिले ॥ ३४ ॥
तरी त्याचें नांव होतें यथार्थ । वटसिद्धनागेश नागनाथ ।
तरी तोचि काय आहे येथ । मोठेपणा मिरवावया ॥ ३५ ॥
त्यासी वर्षें लोटलीं वीस । तरी झाला असेल स्थूळ देहास ।
तरुणपणीं महंतीस । वाढवावया टेंकला ॥ ३६ ॥
टेंकला परी मजकारणीं । गोचर व्हावें ही इच्छा मनीं ।
या गांवींचें संधान धरुनी । संतर्पण मांडिले ॥ ३७ ॥
हें गांवींचें भिक्षास्थान । भ्रष्ट करावें सिद्धिअन्नें ।
सकळ गांवींचा पाक वर्जून । केला अर्थ मजकरितां ॥ ३८ ॥
तरी आतां असो कैसें । आजिचा दिन करुं उपवास ।
ऐसें योजूनि स्वचित्तास । स्वामी तेथूनि चालिला ॥ ३९ ॥
चालिला परी आणिक जन । पाचारिती बाळाकारण ।
आपण जावें भोजन करुन । तूं ऐसा कां जातोसी ॥ ४० ॥
ऐसें म्हणोनि हातीं धरिती । पुन्हां पाकशाळे आणिती ।
परी तो नायके योगपती । गांवामाजी संचरे ॥ ४१ ॥
मग कणधान्याची भिक्षा करीत । लोक पुसतां त्यांतें वदत ।
कीं आमुचा नेम भिक्षारहित । अन्न सेवीत नाहीं जी ॥ ४२ ॥
ऐसें वदूनि सकळ लोकांत । शुष्क अन्न मागूनि घेत ।'
काशीक्षेत्रीं जाऊनि त्वरित । भोजनातें सारीतसे ॥ ४३ ॥
ऐसे रीतीं एक मास । लोटूनि गेला सहजस्थितीस ।
परी नागनाथ स्वचित्तास । विचार करिता पैं झाला ॥ ४४ ॥
म्हणे लोटला एक मास । स्वामी न दिसे आम्हांस ।
मग बोलावूनि ग्रामस्थांस । पुसता झाला महाराजा ॥ ४५ ॥
म्हणे गांवांत कोणी येत । अतीत आहे भिक्षावंत ।
तंव ते म्हणती सिद्धनाथ । एक अतीत येतो कीं ॥ ४६ ॥
तो येथींचें तुमचे अन्न । न सेवी मागतो भिक्षाकदन्न ।
आम्हीं पुसतां म्हणतो नेम । माझा ऐसा आहे कीं ॥ ४७ ॥
आम्ही सारितों येथें भोजन । म्हणोनि न मिळे त्या पक्वान्न ।
यास्तव कोरडें मागूनि धान्य । नेत आहे महाराजा ॥ ४८ ॥
ऐसें बोलतां सकळ ग्रामस्थ । त्यांसी म्हणे नागनाथ ।
मागूं येतील जे गांवांत । करा श्रुत मजलागीं ॥ ४९ ॥
त्यांसी कांहीं न टाकून । श्रुत करावें मजकारण ।
मग मी जाऊनि ग्लानित वचनें । भोजन घालीन तयांसी ॥ ५० ॥
परी आणिक एक अर्थ । कोरडें अन्न न्या गृहांत ।
येरु येईल जंव भिक्षेतें । तेंचि अन्न वाढावें ॥ ५२ ॥
ऐसें पांच पन्नासांसी । नाथें सांगितलें भाविकांसी ।
जे कदाकाळीं कार्यासी । ढळणार नाहींत निश्र्चयें ॥ ५३ ॥
ऐेसें सांगूनि सिद्धिअन्न । त्यांतें दिधलें वस्त्रीं बांधून ।
मग आपुल्या गृहीं जाऊन । वाट पहात बैसले ॥ ५४ ॥
तों श्रीदत्तात्रेय अत्रिसुत । भिक्षेसी आले अकस्मात ।
तंव ते सिद्धिअन्न घेऊनि हातांत । सन्मुख येती घालावया ॥ ५५ ॥
म्हणती महाराजा आम्ही दीन । आमुचे गृहीं कैंचें अन्न ।
परी नागनाथ कृपाकरुन । देतो अन्न आम्हांसी ॥ ५६ ॥
तरी त्या भिक्षेंत भिक्षा चोज । तुम्हां वाढावें धर्मकाज ।
ऐसें बोलती ते सहज । श्रुत कराया दत्तासी ॥ ५७ ॥
परम चतुर विचक्षण । परीक्षा घेती श्रुत करुन ।
परी तो त्रैदेवांचा अंश हें ऐकून । भिक्षेलागीं आतळेना ॥ ५८ ॥
मागें पाऊल तत्काळ ठेवून । जाता होय अत्रिनंदन ।
मग ते आपुले गृहींचें अन्न । घेऊनियां धांवती ॥ ५९ ॥
म्हणती महाराजा नागनाथाचें अन्न । आपणां न वाटे चित्तीं प्रसन्न ।
तरी आमुचे कष्टा चित्त देऊन । विन्मुख होऊं नका जी ॥ ६० ॥
ऐसें सांगूनि भिक्षा देती । तो घेत नाहीं प्रांजळ चित्तीं ।
मग लगबगें हेर जाती । श्रुत करिती नाथासी ॥ ६१ ॥
नाथासी होतां श्रुत मात । शीघ्र चपळत्वें येत धांवत ।
निकट येतां हस्तसंकेते । हेर दाविती तयासी ॥ ६२ ॥
तोही हस्तसंकेतेखुणें । अत्रिसुताच्या निकट जाऊन ।
प्रथम करें कर कवळून । चरणीं माथा ठेवीतसे ॥ ६३ ॥
म्हणे महाराजा योगपती । माय तूं माउली दयाळ क्षितीं ।
तरी डावलूनि पाडसाप्रती । गुप्त कैसा विचरसी ॥ ६४ ॥
मज करुनियां निढळवान । दैन्यवंत बहुत काननीं ।
तेथें सांडूनि निष्ठुरपणीं । जासी कैसा वो माये ॥ ६५ ॥
मज बाळपणीं आपुलें चोज । दावूनियां तपोभोज ।
गेलासी टाकूनि महाराजा । मागें दृष्टी न करितां ॥ ६६ ॥
तरी मी सखया तुजवांचुनी । पडलों आहे घोर वनीं ।
मागें लक्षितां सूक्ष्मनयनीं । प्राण कंठी उरला असे ॥ ६७ ॥
जैसा चातक दृष्टीकरुन । वाट पाहे अंबुद सघन ।
कीं उखरीं हरिणीलागून । वाट पाहे पाडस ॥ ६८ ॥
वीस संवत्सर गेला काळ । परी चिंतावन्ही दाही तलमळ ।
तैं शांत करावया जळ । तुझें कांहीं दिसेना ॥ ६९ ॥
आपावेगळी आपमासोळी । तेवीं तव भेटी जीव तळमळी ।
परी माये त्वां हृदयगतकमळीं । निष्ठुर कैसें सांठविलें ॥ ७० ॥
ऐसें म्हणोनि आरंबळत । नेत्रअश्रूनीं पाद क्षालीत ।
म्हणे अंतर देऊनि मातें । गेलासी कैसा महाराजा ॥ ७१ ॥
ऐसी वदूनि ग्लानित वाणी । पूर लोटावी नेत्रजीवनीं ।
मग त्रयदेव परीक्षानयनीं । अंतरातें ओळखी ॥ ७२ ॥
चित्तीं म्हणे प्रांजलवंत । तापें तापला आहे नाथ ।
मग मस्तकाखालीं घालूनि हस्त । उठविलें महाराजें ॥ ७३ ॥
प्रेमस्नेहें कवळूनि पाणी । हृदयीं कवळिला प्रेमेंकरुनी ।
वामहस्तें कवळूनि मूर्ध्नी । नेत्रअश्रु पुसीतसे ॥ ७४ ॥
मग धरुनि शीघ्र हस्त । नेत स्वामी एकांतांत ।
कृपें मौळीं ठेवूनि हस्त । कर्णी मंत्र ओपिला ॥ ७५ ॥
देऊनि स्वमुखें आत्मखूण । केला ब्रह्मपरायण ।
अपरंपार अज्ञानपण । मुळाहून नाशिलें ॥ ७६ ॥
ऐसी होतां ब्रह्मस्थितकोटी । तत्काळ गुरुकृपें पडली दृष्टी ।
जैसें अभ्र वितुळतां शेवटीं । सुढाळ अर्क दिसतसे ॥ ७७ ॥
तेवीं पाहतां दत्तस्वरुप । मग उचंबळला आनंदकूप ।
अहा म्हणोनि बाप बाप । पदीं मौळी अर्पीतसे ॥ ७८ ॥
मग परम प्रिय अत्रिनंदनें । अंकी घेतला स्नेहेंकरुन ।
करें मुख कुरवाळून । मागील कथा निवेदी ॥ ७९ ॥
आविर्होत्र नारायण । आहेसी बा तूं महीकारण ।
उरगीकुशीं विधिवीर्यवान । जन्म तुझा होय बा ॥ ८० ॥
तरी ही ऐसी मूळकथा । मज आतुडली हृदयीं शोधितां ।
म्हणूनि बाळा तुझ्या हाता । सिद्धिकळा ओपिली ॥ ८१ ॥
तरी तुज भेटी द्यावयाकारण । इच्छीत होतें माझें मन ।
परी प्रारब्धयोगेंकरुन । आजि घडून आलें बा ॥ ८२ ॥
जें प्रकरण समयोचित । लोह-चुंबकां भेटी होत ।
कीं समुद्रक्षारऐक्यवंत । नगआवळीं होतसे ॥ ८३ ॥
तेवीं बापा तुज मज भेटी । झाली प्रारब्धयोगकांठीं ।
ऐसें म्हणोनि हृदयपुटीं । नाथालागीं धरीतसे ॥ ८४ ॥
मग उभय प्रतापवंत । निघतां सांडूनि ते एकान्त ।
ग्रामाबाहेर निघोनि त्वरित । काशीक्षेत्रीं चालिले ॥ ८५ ॥
चालिले परी ऐसे रीतीं । व्यानमंत्र प्रयोगी विभूतीं ।
नाथभाळीं चर्चूनि निगुतीं । गमन दोघे करिताती ॥ ८६ ॥
मग पवनवेगाचें गमन थकितां । वाटे ऐसे गमती उभयतां ।
लवतां नेत्रपातियें पातां । काशीक्षेत्रीं पातले ॥ ८७ ॥
तेथें कांहींसे टेंकूनि क्षण । सारिला आपुला नित्यनेम ।
बद्रिकेदार चित्तीं धरुन । गमन करिती त्या मार्गें ॥ ८८ ॥
भाळीं प्रयोग दिव्य विभूती । व्यानरुपाची महाशक्ती ।
क्षणें बद्रिकाश्रमाप्रती । जाऊनियां पोंचले ॥ ८९ ॥
संचार करिती शिवालयांत । प्रत्यक्ष झाला उमाकांत ।
मग प्रेमआवडीं उभवूनि पर्वत । एकमेकां भेटती ॥ ९० ॥
यापरी तो उमाकांत । श्रीदत्तातें विचारीत ।
दुसरा कोण आहे भृत्य । मिळविला सेवेसी ॥ ९१ ॥
ऐसें बोलतां अनसूयासुत । म्हणे महाराजा नाम या नागनाथ ।
आविर्होत्र प्रतापवंत । नारायणअवतार ॥ ९२ ॥
ऐसें बोलतां उमारमण । दत्तासी म्हणे ऐक वचन ।
यातें सद्विद्या अभ्यासून । नाथपंथी मिळवावा कीं ॥ ९३ ॥
मग अवश्य म्हणोनि अत्रिसुत । राहता झाला षण्मास तेथ ।
सांगूनि सकळ अस्त्रविद्येप्रत । चवदा कळा चौसष्टी ॥ ९४ ॥
उपरी नागपत्रीं अश्र्वत्थीं नेऊन । केलें सकल सिद्धार्थसाधन ।
उपरी बद्रिकाश्रमीं जाऊन । तपालागीं बैसविलें ॥ ९५ ॥
नाथदीक्षा तत्काळ देऊनी । उन्मनी मुद्रा लेववी कानीं ।
शिंगी शैली सिद्ध करुनी । नाथालागीं ओपिली ॥ ९६ ॥
असो ऐशा दीक्षारुपें । द्वादश वर्षें केले तप ।
मग स्वर्गदेव मेळवूनि अमूप (भरपूर) । वरालागीं दीधलें ॥ ९७ ॥
मावदें करुनि दैदीप्यमान । तुष्ट करुनि स्वर्गींचे जन ।
बोळविले स्थानोस्थान । नाथा वर देऊनियां ॥ ९८ ॥
यावरी पुढें तो अत्रिसुत । नागनाथा बोळवीत ।
म्हणे बा रे महींचीं तीर्थें । सांगोपांग करीं कां ॥ ९९ ॥
तीर्थें अति मळीण । तयांचा मळ सांडिती संतजन ।
तस्मात् बा रे तीर्थाटन । संतमेळीं करीं कां ॥ १०० ॥
Shri Navnath BhaktiSar Adhyay 37 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सदतिसावा (३७ )
Custom Search
No comments:
Post a Comment