Tuesday, March 8, 2016

Shri Navanath Bhaktisar Adhyay 27 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सत्ताविसावा (२७) भाग २/२


Shri Navanath Bhaktisar Adhyay 27 
King of Avanti ShubhaVikram had no son. However he was having a beautiful daughter, Sumedhavati. He decided to choose his successor for the kingdom as he himself was becoming older and older. As per the custom on a very auspicious day an elephant with a garland in the trunk was sent. The elephant was searching Vikram when Vikram was seen the garland was put on his neck. After confirming that Vikram was a son of Surochan Gandharv and Satyavati, daughter of King Satyavarma of Mithula, marriage of Vikram and Sumedhavati was done. Bartari was declared as yuvraj. He married to Pingala who was daughter of Sumati Mantri. Bhartari was in the forest for hunting. God Dattatreya gave him Nathpantha diksha. As per wish of Bhartari he allowed him to start the new life as per diksha after 12 years. In the next 28th adhyay Dhundisut Malu from Narahari family will tell us what happened next.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सत्ताविसावा (२७) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी जगदुद्धारा । विश्र्वव्यापका विश्र्वंभरा ।
जगसृजित्या करुणाकरा । दिगंबरा आदिपुरुषा ॥ १ ॥
पूर्णब्रह्मसनातना । पंढरीअधीशा रुक्मिणीरमणा ।
पुढें ग्रंथरचनामहिमाना । बोलवीं कां महाराजा ॥ २ ॥
मागिलें अध्यायीं निरुपण । भर्तरी आणि दुजा विक्रम ।
प्रेमसागरीं भक्ति प्रेम । उभय सरिता लोटल्या ॥ ३ ॥
मग ते उभयतां एक दुर्गी । ग्राम रक्षिती एक प्रसंगी ।
तों एके दिवशीं शुभमार्गी । दैवउदया पातलें ॥ ४ ॥
मोक्षपुर्‍या असती सप्तम । तयांतील तें अवंतिका ग्राम ।
तेथिल नृपति नरेंद्रोत्तम । शुभविक्रम विराजे ॥ ५ ॥
तया जठरीं ती सूक्ष्म वेली । सकळ देहीं संचार पावली । 
पावली परिभवें परतली । संभव तो न ये सांगावया ॥ ६ ॥
ऐसी कन्या असे उदरीं । तीही धाकुटी वरवंटावरी ।
कीं लवणाब्धीची लहरी । मदनबाळी शोभतसे ॥ ७ ॥
नाम जियेचें सुमेधावती । तीक्ष्णबुद्धि असे युवती । 
परी चंद्रकला नक्षत्रज्योती । सांग स्वरुपीं मिरवतसे ॥ ८ ॥
तंव कोणे एके दिवशीं । बैसली होती रायापाशीं ।
रायें परम लालनेंसीं । अंकावरी घेतली ॥ ९ ॥ 
परम सौंदर्यें मुखमंडन । रायें कवळूनि घेतलें चुंबन ।
उपरी कल्पने वेधलें मन । वराविषयीं रायाचें ॥ १० ॥
मग सुमति मंत्री पाचारुनी । बोलता झाला शुभविक्रम वाणी ।
म्हणे सुमेधावती मम नंदिनी । उपवर ती दिसतसे ॥ ११ ॥
तरी इतुकें स्वामित्वपण । पुरुष योजावा दिव्यरत्न ।
यावरी मंत्री बोले वचन । राजउक्ती ऐकूनियां ॥ १२ ॥
म्हणे महाराजा सुरतयोग । जराव्यापक सर्वांग ।
ऐसिया काळीं विषयरंग । सरसावला तुम्हांतें ॥ १३ ॥ 
उदरीं नाहीं वंशसंतती । जरा व्यापिली शरीराप्रती ।
तरी कामना एक वेधली चित्तीं । सुमेधावतीकडूनियां ॥ १४ ॥
तरी स्वआत्मजा लावण्यराशी । दावितों पहा जया वरासी ।
त्यातें स्थापूनि राज्यासनासी । करावें सुरत वैभवातें ॥ १५ ॥
मग तो वर जामातसुत । उभयपणीं या जगांत ।
मिरवूनि जरेतें सकळ हित । संगोपील तुम्हांसी ॥ १६ ॥
तरी ऐसें मम वचन । सिद्धार्थ करा आपुलें मन ।
तरी सुत घ्यावा कन्या देऊन । पुढिलीया सुखातें ॥ १७ ॥
ऐसें मंत्री बोलतां वचन । मान तुकवी शुभविक्रम ।
म्हणे अवश्य ऐसेंचि करणें । योजिलिया अर्थातें ॥ १८ ॥
तरी प्राज्ञिक एक यांत । गोष्ट सुचली आहे मातें ।
आधी योजूनि अधिकारातें । वरी जामात मानवावा ॥ १९ ॥
तरी प्राज्ञिक करावें ऐसें । समारंभीं गजशुंडेस । 
माळ ओपूनि राज्यासनास । स्वामित्वपणीं मिरवावे ॥ २० ॥  
मग तो सहज ईश्र्वरीसत्तें । लोकांत मिरवेल महीपती । 
कन्या अर्पूनि उपरांतीं । सर्वसुखा ओपावें ॥ २१ ॥
ऐसें बोलतां शुभविक्रम नृपती । तेंचि मानलें मंत्रिकाप्रती । 
मग शुभशाळा मंडपक्षितीं । महोत्सव मांडिला ॥ २२ ॥
पाहूनि दिन सुदिन मास । उभारिलें मंडपास ।
गुढ्या तोरणें पताकांस । राजसदन शोभलें ॥ २३ ॥
वस्त्राभरणीं कनककोंदणीं । भूमीं मिरवला कुंजररत्नी ।
दिव्यमाळा शुंडीं ओपूनी । नगरामाझारी संचरला ॥ २४ ॥
मागें मंत्री मानव विप्रांसहित । चक्षुदीक्षा करी नृपनाथ ।
तों दिव्यकुंजर घेऊनि माळेतें । नगरामाजी संचरला ॥ २५ ॥
आधीं सभामंडपींचे जन । दिग्गजें सर्व अवलोकून ।
उपरी नगरामाजी गमन । करिता झाला कुंजर तो ॥ २६ ॥
मग सकळ ग्रामींचे ग्रामजन । पहाती ठायीं ठायीं उभे राहून ।
तों ग्राम शोधीत  दुर्गी येऊन । विक्रमातें विलोकी ॥ २७ ॥
गज येऊनि दुर्गानिकट । उभा राहे न चाले वाट ।
तों दुर्गीं विक्रमासह अष्ट । सेवाधारी असती कीं ॥ २८ ॥
गज खुंटतां पाहे नृपती । खालीं पाचारी अष्टांप्रती । 
एकामागें ऐक उतरती । दुर्गपायर्‍या विशाल ॥ २९ ॥
तों सर्वांमागूनि उतरतां विक्रम । गज आनंदोनि धांवे सप्रेम ।
कुसुममाळा ग्रीवेलागून । शुंडादंडें ओपिली ॥ ३० ॥  
माळा ग्रीवे ओपितां गज । वाद्यें वाजती जाहलें चोज ।
गजस्कंधीं वाहूनि राज । श्रृंगारमंडपीं आणिला ॥ ३१ ॥ 
मग ओपूनियां कनकासन । निकट रायें मंत्री बैसवून । 
परी सहज चर्चा जातीलागून । कुल्लाळ शब्द निघाला ॥ ३२ ॥
तेणेंकरुनि राव चित्तीं । कांहींसा झाला साशंकित । 
मग मंत्रिका नेऊनि एकांतीं । कुल्लाळशब्द दर्शवी ॥ ३३ ॥
म्हणे योजिल्या अर्थाप्रती । भिन्न अर्पाया सुमेधावती ।
आम्हां क्षत्रियां कुल्लाळजाती । वर्ण भिन्न दिसतो हा ॥ ३४ ॥
ऐसें बोलतां शुभविक्रमराव । मंत्रीही व्यापिला संशयभावें ।
परी तो सर्वज्ञ शोधार्णव । राव घेऊनि वहिवटला ॥ ३५ ॥
सवें येऊनि मंडप ग्रामाबाहेर । त्या अष्ट सोबत्यां बोलावूनि बाहेर ।
निकट बैसवूनि जातीविचार । पुसतां झाला तयांसी ॥ ३६ ॥
ते म्हणती नेणों कोण जाती । कुल्लाळ म्हणती विक्रमाप्रती ।
परी याचा शोध कुल्लाळजातीं । कवणालागीं पुसावा ॥ ३७ ॥
मग तो मंत्री परस्परें । कमठा पाचारुन वागुत्तरें ।
एकांतीं नेऊनि परम आदरें । जातिवृत्तांत पुसतसे ॥ ३८ ॥
तंव तो कमठ मुळापासून । सांगता झाला विक्रम कथन ।
माता क्षत्रियकुळीं सत्यवर्म । मिथुळापतीची कन्यका ॥ ३९ ॥
याउपरी पिता सुरोचन । दर्शवी स्वर्गींचें गंधर्वरत्न ।
ऐसें ऐकतां वर्तमान । मंत्री तोषमान होतसे ॥ ४० ॥
मग कमठासी नेऊनि रायासमोर । तेथेंही वदविलें वागुत्तर ।
रावही ऐकूनि तें उत्तर । परम चित्तीं तोषला ॥ ४१ ॥
तोषूनि मंत्रिका पुन्हां बोलत । मंत्री म्हणे कमठ घेऊनि आतां ।
मीच जातों मिथुळाराज्यांत । तरी पाचारण पाठवा सत्यवर्म्यातें ॥ ४२ ॥
अवश्य म्हणे शुभविक्रमनृपती । बोळविता झाला मंत्रिकाप्रती ।
मग कमठ आणि मंत्री सुमती । मिथुळेलागीं पातले ॥ ४३ ॥
रायें सत्यवर्में ऐकून । सदनीं नेलें गौरवून । 
मग कमठ मंत्री सत्यवर्म । एकांतासी बैसले ॥ ४४ ॥
तैं एकांतीं कमठ विचार । सांगता झाला सविस्तर । 
कीं सत्यवतीचें उदेलें जठर । विक्रमफळ मिरवलें ॥ ४५ ॥
तरी आतां दैवेंकरुन । पौत्रा लाभलें राजचिन्ह ।
तरी संशयद्रुम आपण चालून । मूळापासून खुडावा ॥ ४६ ॥
ऐसी सांगूनि सकळ कथा । योगक्षेमाची सांगितली वार्ता ।
स्वर्गवास गंधर्वजामाता । झाल्यासह कथियेलें ॥ ४७ ॥
रायें ऐकूनि सकळ विस्तार । चित्तसरिते आनंदपूर ।
दाटोनि पृतनेसह संभार । शुभविक्रमसंगमीं मिळाला ॥ ४८ ॥
भेटूनि सत्यवतीतें । सकळ पुसूनि वृत्तांतातें ।
मग शुभविक्रमतायाचे चित्तीं । अंतीं पांग फिटला ॥ ४९ ॥   
याउपरी सुघोषमेळीं । विक्रम अभिषेकिला राज्यनव्हळीं ।
मग राज्यपदीं तये काळीं । बैसविला महाराजा ॥ ५० ॥
छत्रचामरें माथा मिरवती । ते राज्यासनीं विक्रम नृपती ।
गहिंवरोनि तोषविला प्रजापती । याचकां धन वांटिलें ॥ ५१ ॥
ऐसा समारंभ झालियापाठीं । मग सुमेधा अर्पिली गोरटी ।
तोही आनंद महीपाठीं । मंगलाचा मिरवला ॥ ५२ ॥
यापरी सत्यवर्म । परम संस्काराचा आनंद घेऊन ।
आपुलें राज्य विक्रमा देऊन । उचित आनंद संपादीत ॥ ५३ ॥
सत्यवतीउदरींचें रत्न । राज्य ओपिलें तया आंदण ।
उभयराज्यीं सार्वभौम । विक्रमनृपति मिरवला ॥ ५४ ॥
असो ऐसा वहिवाट करुन । निघता झाला सत्यवर्म ।
येरीकडे राव विक्रम । भर्तरीतें ओपी युवराज्या ॥ ५५ ॥
मग उभय बंधु समाधानीं । राज्य करिती अवंतिकास्थानीं । 
तों सुमति मंत्रिका एके दिनीं । अर्थ एक सूचला ॥ ५६ ॥
कीं आपुली कन्या पिंगला । देऊं राया भर्तरीला ।
मग विक्रमा पुसूनि सोहळा । शोधिली तिथी लग्नाची ॥ ५७ ॥
परी तेथें विक्षेप आला अवचिता । कुटाळ मिळाला रजक तत्त्वतां ।
मंत्रिका आराटूनि सांगे वार्ता । शोध करा जातीचा ॥ ५८ ॥
ऐसें बोलतां रजक त्यातें । पुन्हां बोलाविलें कमठकुल्लाळातें ।
त्यातें पुसतांसविस्तर तें । कुल्लाळ म्हणे श्रुत नाहीं ॥ ५९ ॥
मग सत्यवतीतें विचारीत । भर्तरी तुमचा कैसा सुत । 
तीही म्हणे उदरव्यक्त । भर्तरी नव्हे माझा कीं ॥ ६० ॥
ऐसी ऐकूनि तयाची उक्ती । विक्रमा विचारी मंत्री सुमती ।
तोही म्हणे नेणों जाती । बंधु मानिला भावार्थें ॥ ६१ ॥
ऐसें बोलता राव विक्रम । संशयीं पडला मंत्री सुगम ।
मग भर्तरीस पुसता झाला वर्म । प्रांजळ सांगे भर्तरी ॥ ६२ ॥
मित्रावरुणीरेतापासून । वनांतरीं वाढलों हरिणीपासून ।
भाटसंगतीं व्यवसायादि करुन । सकळ कथन निरुपिलें ॥ ६३ ॥    
परी मंत्रिका न पडे विश्र्वास । चित्तीं म्हणे स्वकार्यास ।
ऐसें भाषण करीतसे विशेष । सत्य केवीं मानावें ॥ ६४ ॥
तरी आतां असो कैसें । हा म्हणवितो मित्रपिता आम्हांस ।
तरी याचे हस्तें मित्रावरुणीस । कार्यालागीं पाचारावें ॥ ६५ ॥
ऐसें मंत्री चित्तीं योजूनी । म्हणे तुमचा पिता मित्रावरुणी ।
तरी स्वमंगलातें बोलावूनी । आम्हां दृष्टीं दाखवा ॥ ६६ ॥
भर्तरी असे तुमची माता । तरी ती झाली विगलिता ।
परी लग्नविधीतें आपुला पिता । सोहळा घेऊनि पाचारा ॥ ६७ ॥
ऐसें बोलतां मंत्री त्यातें । म्हणे अघटित काय यातें ।
मग उभा राहूनि अंगणातें । ऊर्ध्वदृष्टी करीतसे ॥ ६८ ॥
म्हणे मित्रवरुणी मम ताता । हा देह असेल तव रेता ।
तरी मज बाळाची धरुनि आस्था । मंगलासी येईं कां ॥ ६९ ॥
ऐसें बोलूनि दीर्घवाणी । ध्यान करीतसे आपुले मनीं ।
हें जाणवलें अंतःकरणीं । मित्रावरुणीच्या तेधवां ॥ ७० ॥
मग वातचक्रीं आगमन । अवंतिनगरीं स्वतां येऊन । 
बोलतां झाला मंत्रिकालागून । शुभविक्रमरायाच्या ॥ ७१ ॥
म्हणे मंत्रिका सर्व सुमूर्ती । सकळ संशयाची सांडीं भ्रांती ।
मम सुता विवाहाप्रती । कन्यादान ओपीं कां ॥ ७२ ॥
म्हणसील जरी मंगळा निक । वराचा सिद्ध असावा जनक ।
तरी पुष्पवृष्टि मंगळघोष । सुरवरां हातीं करवीन ॥ ७३ ॥
याउपरी राया विक्रमाच्या तातातें । सुरोचन गंधर्वा पाठवीन येथें ।
सकळ संशय सांडूनि त्वरितें । सुखें द्यावी पिंगळा ॥ ७४ ॥
म्यां जरी यावें मृत्युभूमीं । तरी दाहतील बहुत प्राणी । 
तस्मात् सकळ संशय सोडोनी । पिंगला अर्पीं मम सुता ॥ ७५ ॥
ऐसें तन्मुखीचें ऐकूनि वचन । परितोषलें मंत्रिकाचें मन ।
सकळ संशयातें सांडून । लग्नसोहळा मांडिला ॥ ७६ ॥       
मग नेमिल्या तिथीस सीमांतपूजन । ते संधींत उतरला गंधर्व सुरोचन ।
स्वकांता सत्यवतीसी भेटून । विक्रमातें पाचारी ॥ ७७ ॥
विक्रम येऊनि त्वरितात्वरित । तातचरणीं माथा ठेवीत ।
मग बोलावूनि सुमति मंत्रिकातें । सुरोचनातें भेटवी ॥ ७८ ॥
असो सुरोचन गंधर्वपती । दिव्यतेजें पाहूनि क्षितीं ।
अतिनम्र होऊनि चित्तीं । निकट बैसे गंधर्वी ॥ ७९ ॥
निकट बैसतां सुरोचन । म्हणे सुमति तूं दैववान ।
प्रत्यक्ष धृमीनारायण । सोयरा केला जामात ॥ ८० ॥
अरे भर्तरीपुत्र अवतारदक्ष । मित्रावरुणीचा अवतार प्रत्यक्ष ।
तुवां जामात केला प्रत्यक्ष । सकळ दैवां मिरवला ॥ ८१ ॥
ऐसें बोलतां सुरोचन । पुन्हां वंदिता झाला चरण ।
म्हणे मम भाग्य खरें उत्तम । सोयरे झाले देव कीं ॥ ८२ ॥
तरी मी एक अर्थाअर्थीं । दैववान असें त्रिजगतीं ।
तरी चलावें मंडपाप्रती । करुं सीमांतपूजना ॥ ८३ ॥
अवश्य म्हणोनि सुरोचन । मंडपीं येऊन ।
समारंभे करिती सीमांतपूजन । करुनि विधि उरकिला ॥ ८४ ॥          
वधूवरांतें आशीर्वाद देतां । कुसुमें वर्षती स्वर्गदेवता ।
अष्टकें झालिया करतलहस्ता । टाळी पिटिती आनंदे ॥ ८५ ॥
मग नाना वाद्यांचा गजर । तेणें कोंदलें सकळ अंबर ।
स्वर्गी गर्जती जयजयकार । सुरवर विमानीं बैसूनियां ॥ ८६ ॥
असो पांच दिवस उत्तम सोहळा । नाना रत्नरंगमाळा ।
सकळ तोषवूनि वर्‍हाडपाळा । बोळविलें सुमतीनें ॥ ८७ ॥
याचकांसी अपार धन । रायें बोळविलें देऊन । 
एक मास गंधर्व सुरोचन । तया ठायीं राहिला ॥ ८८ ॥
वरपिता मिरवला सुरोचन । वरमाय सत्तवतीरत्न ।
असो सकळां पुत्रसोहळामान । सुमतीनें ओपिला ॥ ८९ ॥
यापरी एक मासाची अरुती । सुरोचन तोषविला सहसत्यवती ।
मग विचारुनि शुभविक्रमरायाप्रती । स्वस्थानासी पैं गेला ॥ ९० ॥
येरीकडे अवंतिकेंत । दिवसेंदिवस लोटले बहुत ।
पिंगळा नामें स्वरुपवंत । ऋतुकाळ पावली ॥ ९१ ॥
मग उभयतां एकपणें । सदा विचरती संतोषमनें ।
याउपरी भर्तरीनें । लग्नें केलीं अमूप ॥ ९२ ॥
द्वादश शत कामिनी करोनी । सदा विचरे भोगासनीं ।
परी मुख्य दारा पिंगलानामीं । पट्टराणी मिरवत ॥ ९३ ॥
जैसा नवलक्ष नक्षत्रांत । तेजें मिरवें नक्षत्रनाथ ।
तेवीं द्वादश शतांत । पिंगला नामें मिरवतसे ॥ ९४ ॥
असो युवराज्याच्या मंडणीं । भर्तरी राणा मिरवे भूषणीं ।
परी तयासमीप हिरकणी । पिंगळा मिरवे वैडूर्या ॥ ९५ ॥
कीं अर्का शोभवी रश्मिकिरण । कीं धृतीं शर्करा दावी गोडपण ।
तेवीं भर्तरी पिंगलारत्न । स्वस्वरुपीं मिरवतसे ॥ ९६ ॥
ऐसें उभयतांचें एकचित्त । कीं लोह मिळालें चुंबकांत ।
कीं कर्दम उदकातें । कदाकाळीं सांडीना ॥ ९७ ॥
सभामंडपी राय असतां । परी पिंगलेसी वसे सदा चित्ता ।
रायासही न गमे तीतें पाहतां । घडोघडी पाहतसे ॥ ९८ ॥
पाहूनियां पिंगलेचें वदन । मग राया सुचे कारभार पूर्ण ।
जैसें अमलिया पूर्ण । अमल सर्वदा पाहिजे ॥ ९९ ॥
तन्न्यायें उभयतांशीं । ऐक्यप्रीती वर्तें प्रपंचासी ।
ऐसें लोटतां बहुत दिवशीं । वय अर्धें पातले ॥ १०० ॥
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सत्ताविसावा (२७) भाग २/२
तों एके दिवशीं पारधीलागूनी । राव जातसे घोर विपिनीं ।
तों वरुनि पाहे मित्रावरुणी । पुत्रचंद्र दृष्टीनें ॥ १०१ ॥
पाहतां विचारी मनांत । कीं मम वीर्याचे उदेले सुत ।
एक अगस्ती दुसरा भर्तरीनाथ । मृत्युभूमीकारणें ॥ १०२ ॥
परी त्यांत अगस्तीनें हित केलें । चपळपणानें स्वयंभ वरिलें ।
परी भर्तरीचें मन गुंतलें । राज्यवैभवाकारणें ॥ १०३ ॥
तरी अहिताचा विषयप्याला । राजा भर्तरीसी गोड वाटला ।
हितालागीं सर्वस्वी चुकला । अचलपद तोचि राया ॥ १०४ ॥
तरी हा विषयपदापासून । कैसा सुटेल स्वबुद्धीनें ।
याचें हित याजकारणें । प्राप्त कैसें होईल कीं ॥ १०५ ॥               
नवनाथांतील अवतार । धृमीनारायण महा थोर ।
परी वेष्टिला विषयतिमिर । सुटेल कैसा कळेना ॥ १०६ ॥ 
मोह उपजोनि पोटीं । उतरता झाला महीतळवटीं ।
अनसूयात्मजाची घेऊनि भेटी । वर्तमान निवेदिलें ॥ १०७ ॥ 
म्हणे महाराजा योगद्रुमा । काम वेधला आहे आम्हां ।
तरी त्या कामाची सत्य भावना । ऐकूनि घेईं महाराजा ॥ १०८ ॥
तुम्ही विजयप्रतापध्वज । मिरवलां महीं तेजःपुंज ।
तरी मिरवला मम आत्मज । मच्छिंद्रासम भर्तरी ॥ १०९ ॥
तूं रायपंथ मिरवून । सच्छिष्य मिरवले जगांत रत्न । 
ते वित्तीं मम नंदन । प्रविष्ट करीं याचि जगीं ॥ ११० ॥ 
यावरी बोले अनसूयासुत । चिंता न करीं भर्तरीनाथ । 
माझें प्रसादें जाण सत्य । जगामाजी मिरवेल ॥ १११ ॥
मिरवेल परी कैसे रीतीं । चिरंजीव शोभे महीवरती ।
यावत् मही तावत् जती । भर्तरीनाथ मिरवेल ॥ ११२ ॥
हें पूर्वींच भविष्योत्तर । आहे समर्था मम गोचर ।
दिधलें उत्तर केलें वागुत्तर । मम वचनीं सर्वथा ॥ ११३ ॥
तरी आतां संशयासी न रहावें । आतां स्वस्थचित्त असावें ।
मी यत्न करुनि भर्तरीराव । नाथपंथीं मिरवीन ॥ ११४ ॥
ऐसें बोलूनि अत्रिनंदनें । बोळविला मित्रावरुण ।
आपण तेचि घडी कृपा करुन । भर्तरीपासीं जातसे ॥ ११५ ॥
तों येरीकडे भर्तरी नृपती । पारधीस्तव काननाप्रती ।
मृगयेकरितां हिंडे निगुती । नाना वनें उपवनादि ॥ ११६ ॥
सवें सेना अपरिमीत । विपिनीं विस्तारली कृतांतवत ।
चवदा लक्ष वातकृत । वाजी फिरती विपिनीं ते ॥ ११७ ॥
हेमतगटीं श्रृंगारासहित । पाखरा झालरी शोभती मुक्त ।
अलंकारें कोंदणयुक्त । रत्नें मिरवी नवविध ॥ ११८ ॥
तरी ते श्रृंगार म्हणा वाचे । कीं मोहर उजाळे नक्षत्रांचे ।
तेवीं रत्नें चमकपणाचे । भाव दाखविती नक्षत्रांचे पैं ॥ ११९ ॥   
अहो ते हय न म्हणूं वाचे । रत्न उदेलें उदधिउदराचें ।
तेणें इंदिरा हर्षोनि नाचे । बंधु म्हणोनि श्रृंगारी ॥ १२० ॥
त्याचि नीतीं एक लक्ष । दिनसमान गज प्रत्यक्ष । 
विशाळ शुंडादंड सुलभ । चंद्रतेज मिरवलें ॥ १२१ ॥
मिरविलें परी कैसे भावें । इंदूस मानलें बंधुभावें । 
म्हणोनि सर्व पूर्ण स्वभावें । चमत्कार दावीतसे ॥ १२२ ॥
त्याही दंती शुद्धकोंदणीं । चुडे मिरवती हाटकखाणी ।
त्यांत हिरे नक्षत्रें आणोनी । इंदुराज मिरवत से ॥ १२३ ॥
आणि स्वतां तोचि मुक्तासंपत्ती । वरदबाळ ओपिल्याप्रती ।
झालरी अग्रगण्य निगुतीं । एकसारा अर्चियेल्या ॥ १२४ ॥
चांदवे अंबारी कोंदणयुक्त । नवरत्नादि सगुण मुक्त ।
कळसतेजीं लावूनि आदित्य । म्हणती विसांवा घेईं कां ॥ १२५ ॥
आणि रायासमान पंचशत । राजविनवणी प्रज्ञावंत ।
सरदारनामीं भूषणभरित । मूर्ती जेवीं गभस्तीच्या ॥ १२६ ॥
तयां माथां कनकचीर । सहज तेज छत्र चंद्रकार । 
तयांच्या कळसदीप्तीवर । भानुतेज लाजतसे ॥ १२७ ॥
रायामाथीं अर्धशत । कनकअंबरी हाटक व्यक्त ।
पाच माणिकी मणियुक्त । हेमें गुंफिल्या झालरी ॥ १२८ ॥
ऐसिया छत्रकळसउद्देशीं । वैडूर्यरत्नें जडिल्या राशी ।
पद्मरागें आदित्य मानसीं । विरह करुं म्हणतसे ॥ १२९ ॥
विरह तरी केउता तरणी । व्यर्थ फिरतसेअंबरभ्रमणीं ।
तरी वैडूर्यरत्नांच्या पंक्तींलागुनी । येऊनि सुख भोगी कां ॥ १३० ॥
वनें विरहें उदास चित्तीं । अस्ताचळीं जातां गभस्ती ।
चतुर्थप्रहरीं शिणली वृत्ती । रक्तपंक्ती इच्छितसे ॥ १३१ ॥
असो आतां विरहअर्क । म्हणे संपत्ती मिरवला मम बाळ ।
तेणें तो अर्क पावूनि सुख । अस्ताचळा मावळतसे ॥ १३२ ॥
असो ऐशा भाषणस्थितीं । अचाट विपिनीं भर्तरी नृपती ।
मृगया करितां वाताकृती । काननांत हिंडूनियां ॥ १३३ ॥
परी समयास आला चैत्र मास । पुत्रचंद्रा पहावया मित्र ।
स्थिरावे तेणें रश्मि उलटयंत्र । काननांत लखलखी ॥ १३४ ॥
तैं रश्मीचें तीव्रपण । चमू हळहळी तृषेंकरुन ।
मग राव भर्तरी मृगया सांडून । उदक शोधूं धांवतसे ॥ १३५ ॥
परी पंचत्रैयचतुर्थीते । काननविरहित योजनशत ।
उदक न दिसे ऐसें भावीत । कानन रुक्ष मिरवतसे ॥ १३६ ॥
फार व्यापिले तृषेंकरुन । कोणी सोडूं पाहती प्राण ।
कोणी हिंडोनि रानोरान । लवण जीवन पाहाती ॥ १३७ ॥
कोणी त्रासूनि पाला भक्षिती । कोणी लघुशंका सेविती ।
कोणीं तरुच्या सावलीं क्षिती । धरुनियां पडियेले ॥ १३८ ॥
ऐसी पृतना (सेना) आहाळपणीं । व्यापिली आहे तृषेंकरुनी ।
रावही तैसाचि क्लेशें काननीं । पाणी पाणी म्हणतसे ॥ १३९ ॥
प्राण झाला कासावीस । हृदयीं न सांठवे श्र्वासोच्छ्वास ।
मुखां कोरड पडली विशेष । जिव्हा लोटूं लागलीसे ॥ १४० ॥
ऐसे क्लेशाचे प्रकरणीं । श्रीदत्तात्रेय काननीं ।
गुप्तवेषें असोनी । रायामागें हिंडतसे ॥ १४१ ॥
तों विपिनीं मध्यें गोंगावत । काय करी अत्रिसुत ।
मायेचें सरोवर रचूनि तेथ । छंदें व्यक्त दाखवी ॥ १४२ ॥
निर्मलपणीं गंगाजळ । दाटोनि पात्र उचंबळे ।
कुमुदिनी विकसित घालूनि पाळे । नांदताती सभोंवतीं ॥ १४३ ॥
आणि तया सरसीकांठीं । बहु फलित तरुदाटी ।
अनेक पक्षी मराळकोटी । पंक्तिसरी दाटल्या ॥ १४४ ॥
शितळ छाया शीतळ जीवन । सरोवर मिरवलें गहिवरपणें । 
तये तटीं पर्णकुटी करुन । अत्रिआत्मज मिरवला ॥ १४५ ॥       
तों येरीकडे नृपनाथ । क्लेंशें हिंडतां काननांत ।
तों सरोवर ठायीं देखोनि अकस्मात । एकटाचि पातला ॥ १४६ ॥
परम देखूनि गहिंवरें जीवन । धांव घेतसे नृपचिद्रत्न ।
सरसीकांठीं जाऊन । जीवन स्पर्शूं टेकला ॥ १४७ ॥
आतां स्पर्शावें ओंजळांत । तों तिकडूनि उठला अत्रिसुत ।
प्रत्योदक करें कवळूनि हात । रायावरी धांवला ॥ १४८ ॥
अरे अरे वाचे म्हणून । न स्वीकारीं माझें जीवन ।
तूं कोणाचा आहेस कोण । आधीं मातें सांगें कीं ॥ १४९ ॥
येरी पावोनि भय देहातें । भयें दाटला नृपनाथ । 
कांहीं न बोले क्षितींत । टकमकां पहातसे ॥ १५० ॥
अवधूत म्हणतसे कां रे मौन । धरुनि कांहीं न बोलसी वचन ।
माता पिता गुरु कोण । तव देहीं मिरवले ॥ १५१ ॥
माता पिता गुरुसहित । सांगूनि करीं उदकपानातें ।
नातरी सेवितां पावसी मृत्य । जीवन येथेंचि हें राया ॥ १५२ ॥
ऐसें ऐकून भर्तरीनाथ । पदावरी लोटला त्वरित ।
नमूनि जन्मकथेसहित । अत्रिसुता सांगितलें ॥ १५३ ॥
भर्तरीमाता पात्रसांठवणी । पिता मिरवला मित्रावरुणी ।
ऐसें प्रकरण दत्तालागुनी । मूळापासोनि सांगितलें ॥ १५४ ॥
येरी म्हणे गुरु कोण । भर्तरी म्हणे नाहीं अजून ।
ऐसें ऐकूनि अत्रिनंदन । बोलता झाला तयासी ॥ १५५ ॥
म्हणे राया व्यवस्थित । मिरवलासी या देहातें । 
अद्यापि गुरु नाहीं तूतें । भ्रष्टबुद्धि मिरविसी ॥ १५६ ॥
तरी तूं पूर्वींचा परम पापिष्ठ । म्हणूनि गुरु न मिळाला वरिष्ठ ।
तरी आतां क्रियानष्ट । स्पर्श न करीं जळातें ॥ १५७ ॥
तुवां स्पर्श केलिया पाणी । सकळ तोय जाईल आटोनी ।
निगुरुत्वाचा विटाळ मानूनी । तोय त्रासा पावेल ॥ १५८ ॥
मग तोय आटल्या निगुतीं । मम कोपाची पावकशेखी (अग्निज्वाळा) ।
आसडोनि तव देहाप्रती । भस्म करील क्षणार्धें ॥ १५९ ॥  
ऐसे बोलतां अत्रिनंदन । भर्तरी करीतसे नमन ।
म्हणे महाराजा तृषें प्राण । जात आहे माझा कीं ॥ १६० ॥
तरी आतां अनुग्रह देऊन । आपण वांचवा माझा प्राण ।
दत्त म्हणे तव अनुग्रहासी मम मन । द्यावया योग्य दिसेना ॥ १६१ ॥
अरे मम अनुग्रहासाठीं । शिव विरिंची घालिती मिठी ।
तरी अनुग्रहातें पूर्ण कीटी । तुझे पदरीं दिसेना ॥ १६२ ॥
ऐसे भगले थोर नायक । तरी नातुडे अनुग्रह दोंदिक ।
तों येथे तूं मशक । अनुग्रह वांछिसी ॥ १६३ ॥
भर्तरी म्हणे हें तों निश्र्चित । परी तृषेनें होतों प्राणरहित ।
तुम्हीं कृपाळु परम संत । दया क्षमा पाळितां ॥ १६४ ॥
जगाचें न साहे कीचकपण । त्वरेंचि हरितां दैन्याकारण ।
तरी माझा वांचवूनि प्राण । धर्मसाधन मिरवावें ॥ १६५ ॥
ऐसें ऐकतां तपोराशी । म्हणे अनुग्रह देईन तुजसी । 
परी पूर्ण तप द्वादशवर्षीं । आचरावें या स्थळा ॥ १६६ ॥
त्यातपःपुण्यांशेंकरुन । योग्य होसील अनुग्रहाकारण ।
राव म्हणे सध्यांचि प्राण । तृषेंकरोनि जातो कीं ॥ १६७ ॥ 
मग द्वादश वर्षें वांचल्यावरती । कैसी घडेल कृपामूर्ती ।
दत्तात्रेय म्हणे तपा पुढती । संकल्पातें करावें ॥ १६८ ॥
काया वाचा चित्त मन । संकल्प झालिया पुण्यवर्धन ।
वर्धन झालिया पाजीन जीवन । सकळ बाधा वो चुके ॥ १६९ ॥
येरी म्हणे महाराजा । संक्ल्प सांगितल्या चोजा ।
परी आतां मातें उदक पाजा । प्राण रक्षा माझा कीं ॥ १७० ॥
नाथ गुरु संकल्प करिसी । कीं तपा आचरण द्वादशवरुषीं ।
परी तैसें नोहे वैभवासी । पुन्हां लिप्त न व्हावें ॥ १७१ ॥
वमनासमान पाळूनि सर्व । विरक्तपणाची बरवी ठेव ।
योगामाजी नित्य बैसावें । आयुष्यमर्यादापर्यंत ॥ १७२ ॥
ऐसें ऐकता राव कुंठित । विचारदरीं व्यापिलें चित्त ।
म्हणे कैसी करावी रीत । प्राण कासावीस होतसे ॥ १७३ ॥
तरी तो पूर्ण प्रज्ञावंत । म्हणे महाराजा हे नाथ ।
मी प्रपंचराहणीरुप मुक्त । झालों नाहीं अद्यापि ॥ १७४ ॥
परी पितृश्राद्ध पितृऋण । मातेसी केलिया गयावर्जन ।
कांते पुत्र झालियाविण । कांताऋण फिटेना ॥ १७५ ॥
पुत्रविवाह स्नुषामेळीं । ऋणमुक्त होय शुद्धमौळीं ।
एसिया ऋणाची स्थावरकाजळी । फिटली नाहीं महाराजा ॥ १७६ ॥
तरी द्वादश वरुषेंपर्यंत । प्रपंच आचरु द्यावा मातें ।
उपरी योजुनि पूर्ण योगातें । केलिया संकल्प समान कीं ॥ १७७ ॥
ऐसें बोलतां पैं भूपाळ । अवश्य म्हणे अनसूयाबाळ ।
मग कमंडलू भरुनि जळ । तयापासीं पैं आला ॥ १७८ ॥     
उदक ओपूनि करयुग्मीं । संकल्प करवी मनोधर्मीं ।
कीं द्वादशवरुषें संकल्पनामीं । पुण्ययोग आचरेन ॥ १७९ ॥
यापरी तन मन धन । काया वाचा जीवित्व पूर्ण ।
गुरुसंकल्पीं सोडूनि जीवन । अनुग्रह देतसे ॥ १८० ॥
मौळीं ठेवूनि वरदहस्त । कर्णीं बीजमंत्र अर्पीत ।
आपुला करोनि शरणागत । नाम आपुलें सांगतसे ॥ १८१ ॥
म्हणे वत्सा ओळख मातें । मी दत्तात्रेय अत्रिसुत ।
परी तव दैव भाग्यवंत । मम कर मौळीं विराजला ॥ १८२ ॥
परी अनुग्रह होतांचि प्राप्त । मायिक सरोवरासहित झाला गुप्त ।
इतुकें केले जया अर्थी । व्यर्थ होऊं पहातसे ॥ १८३ ॥
ऐसी चिंता मानसीं बहुत । करिता झाला भर्तरीनाथ । 
म्हणे महाराजा गुरुनाथा । प्राण जाऊं पाहे आतां ॥ १८४ ॥
ऐसें ऐकतां भर्तरीवचन । भोगावती पाचारी अत्रिनंदन ।
तरी ती सरिता अपार जीवन । घेऊनियां धांवली ॥ १८५ ॥
सुरभीचें करुनि चिंतन । मही दर्शविली दैदीप्यमान ।
नेमक सहज उपजवोनि अन्न । पर्वतासमान मिरविलें ॥ १८६ ॥
मग चमूसहित नृपनाथ । भोगावतीचें स्नान करीत ।
उत्तम अन्न स्वीकारुनि समस्त । दर्शन करोनि चालिले ॥ १८७ ॥
पृतनेसहित तुष्टचित्तीं । मृगया करुनि येत नृपती ।
येरीकडे भोगावती । तिचे स्थाना पाठविली ॥ १८८ ॥
कामधेनु स्वर्गस्थानीं । पाठवोनि अदृश्य झाला मुनी ।
येरीकडे मृगया करोनी । भर्तरी गेला गावांत ॥१८९  ॥
तरी आतां पुढें श्रोतीं । कथा स्वीकारावी सुधारससंपत्ती ।
धुंडीसुत मालू वदेल उक्ती । नरहरिप्रसादें करुनियां ॥ १९० ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । सप्तविंशतितमाध्याय गोड हा ॥ १९१ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ 
॥ श्रीनवनाथभक्तिसार सप्तविंशतितमाध्याय संपूर्ण ॥ 
Shri Navanath Bhaktisar Adhyay 27  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सत्ताविसावा (२७) 


Custom Search

No comments: