Thursday, March 3, 2016

Shri Navanath Bhaktisar Adhyay 25 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय पंचविसावा (२५) भाग २/२


Shri Navanath Bhaktisar Adhyay 25 
Bhartari was with the traders. One night when they were resting foxes started barking loudly. Bhartari knew what foxes are shouting. He told traders that some thieves are coming to rob them. Hence everybody became alert and ready to fight with thieves, what they do and thieves ran away. After sometime again foxes were started shouting. Bhartari told traders that now he knew from their shouting that a demon is passing from North to South who was very dangerous. However who so ever would kill the demon would become king of Awanti as well as would become owner of four precious gems the demon was having. Among the traders there was a brave man named as Vikram. He immediately rose to fight with the demon. Who was demon? The demon was a gandharva. His name was Chitrama and because of the curse of Goddess Parvati came down to earth. Now who was Vikram? Vikram was son of another gandharva named as Surochan who was cursed by God Indra and came to earth in the form of a donkey. Now in the next 26th Adhyay Dhundisut Malu would tell more about this.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय पंचविसावा (२५) भाग २/२
पशु असती वाचारहित । हा गर्दभ बोलतो मात ।
तरी हा पशु नव्हे निश्र्चित । प्रज्ञावंत समजेना ॥ १०१ ॥   
म्हणोनि असती मूढपणें । योजिलें त्यांनीं पलायन ।
त्याचि गर्दभीं ग्रंथिका (सामानाचें ओझें) वाहोन । संसारग्रंथिका भरियेली ॥ १०२ ॥
संसार वाहोनि गर्दभावरता । त्यासवें चालती उभयतां ।
सहजस्थितीं चाल चालतां । ग्रामद्वारीं ते आले ॥ १०३ ॥
परी द्वाररक्षक तेथें असती । तिहीं पाहतां तयांची स्थिती ।
समजोनि त्यांची पलायनरीती । तार्किकज्ञानें करुनियां ॥ १०४ ॥
मग ते हटती कमठाकारणें । म्हणती संसार गर्दभीं वाहोन ।
किमर्थ तूं पलायन । करिशी सांग कमठा रे ॥ १०५ ॥
ऐसें पुसतां द्वाररक्षक । तेव्हां तो झाला भयें व्यापक ।
न बोले वचन कांहींएक । मुखस्तंभ बावरियेला ॥ १०६ ॥
तरी ते नाना युक्तिप्रयुक्तीं । पलायन अर्थ पुसती ।
परी तो न वदे दुःखाप्रती । संशयांत मिरवतसे ॥ १०७ ॥
मनांत म्हणे कमठ कुल्लाळ । जरी हा अर्थ वंदू केवळ ।
तरी सध्यां हा वडवानळ (अग्नि । अंग स्पर्शिल आमुचें ॥ १०८ ॥
म्हणून त्यांतें न बोलेचि कांहीं । मुखस्तंभ विचरे वाचाप्रवाहीं ।
मग ते द्वारपाळ प्रज्ञादेही । अटक करिती कमठातें ॥ १०९ ॥
म्हणती ऐसी वस्ती टाकून । कमठा तूं करिशी पलायन । 
तरी तें रायातें श्रुत करुन । मग बोलावूं तुज कमठा ॥ ११० ॥
ऐसें वदूनि द्वारपाळ । राजांगणीं जाऊनि चपळ ।
म्हणती महाराजा कमठ कुल्लाळ । ग्रामांतूनि जातसे ॥ १११ ॥
मग त्वरें पाठवूनि आपुले दूत । कमठ आणिला राजसभेंत ।
सभेस्थानीं जातांचि त्यातें । राव स्वमुखें पुसतसे ॥ ११२ ॥
म्हणे काय झाली दुःखमात । कोणते दुःख तुज वसत ।
झालें म्हणोनि ग्रामातें । सांडूनियां जासी तूं ॥ ११३ ॥
ऐसी असतां महाराहाटी । तूं कोण अर्थें झालासी कष्टी । 
तरी तो अर्थ वदोनि होटीं । श्रुत करी आमुते ॥ ११४ ॥
म्हणे कमठ सत्यवर्मा । नाव मिरवत महीं आम्हां ।
तरी सत्य चालवीन नेमा । नामासमान वर्ततसे ॥ ११५ ॥
ऐसें बोलतां राव वचन । कमठ बोले रायाकारणें ।
हे महाराजा प्रजापालनाकारणें । दक्ष तुम्हीच आम्हां कीं ॥ ११६ ॥
परी मातें दुःख जें आहे । तें वाचेनें बोलतां न ये ।
बोलों जातां प्राण जाये । देह मुक्त होईल ॥ ११७ ॥
राव म्हणे मजकडून । जात असेल तुझा प्राण ।
तरी अन्याय माफ करीन । रक्षीण प्राण तुझा कीं ॥ ११८ ॥
तरी या बोलाकारणें । संशय मिरवीत असेल मनें ।
तरी माझें सदैव वचन । घेईं घेईं कमठा तूं ॥ ११९ ॥
ऐसी बोलतां राजेन्द्र वाणी । कमठ तुकावी ग्रीवेलागुनी ।
म्हणे महाराजा ऐसी वाणी । भाष द्यावी मज आतां ॥ १२० ॥
अवश्य म्हणोनि सत्यवर्मा । करतळभाष देत उत्तमा ।
मग म्हणे कमठा क्लेशवर्मा । वदोनि दावीं मज आतां ॥ १२१ ॥
येरु म्हणे नरेशा । एकांती दावीन शब्दलेशा । 
ऐसें बोलतां कमठ सहसा । एकांतातें चालिले ॥ १२२ ॥
कमठ आणि नरेंद्रोत्तम । एकांतीं बैसले शुद्ध आश्रमा ।
मग कमठ म्हणे राया कामा । मम क्लेशाचे अवधारीं ॥ १२३ ॥
हे राया तूं सर्वज्ञमूर्ती । तव उदरींची कन्या युवती ।
नाम जियेचें सत्यवती । महीवरती मिरवतसे ॥ १२४ ॥
तरी काय सांगूं विपर्यास । एक गर्दभ मम सदनास ।
तो रात्रीं पाचारुनि आम्हांस । विपरीत वाणी बोलतसे ॥ १२५ ॥
बोलतसे कैसे रीतीं । कीं मज दारा करुनि दे सत्यवती । 
ऐसें बोलतां चक्रवर्ती । भयव्याप्त मन माझें ॥ १२६ ॥
अहो हें पशु काय बोलत । जरी रायातें होत श्रुत । 
मग तो मातें सदनासहित । कोपानळीं जाळील ॥ १२७ ॥
ऐशा भयाची उमजोनि वार्ता । त्रास योजिला आपुले चित्ता ।
म्हणोनि राया सोडोनि स्वार्था । ग्रामाबाहेरी जातसे ॥ १२८ ॥
ऐसें बोलतां कुमठ कुल्लाळ । मग विचार करीतसे नृपाळ ।
चित्तीं म्हणे पशु केवळ । वाचारहित असती कीं ॥ १२९ ॥
तरी तो पशु न म्हणावा सर्वथा । कोणीतरी असेल देवता ।
परीक्षेवीण माझिये चित्ता । पशुवेषें नटला असे ॥ १३० ॥
ऐसा विचार करुनि चित्तीं । बोलता झाला कमठप्रती ।
म्हणे कमठा भय चित्तीं । धरु नको या हेतू ॥ १३१ ॥
तरी आतां कुशळपणें । दावूं आपुलें भावलक्षण ।
आणि यताची परीक्षा करुन । सत्यवती ओपावी ॥ १३२ ॥
तरी तूं आतां सेवोनि सदन । स्वस्थ करीं आपलें मन । 
गर्दभ करितां तूते भाषण । उत्तरयुक्ती तूं ऐक ॥ १३३ ॥
तूंतें बोलता गर्दभ मात । तरी त्यातें उत्तर द्यावें त्वरित ।
कीं हा प्रकार रायातें श्रुत । केला असे महाराजा ॥ १३४ ॥
केलें परी राजउत्तर । आलें आहे तव बोलावर ।
तरी धातुताम्राचें मिथुळानगर । करुनि द्यावें सर्वस्वें ॥ १३५ ॥
पूर्ण झालिया ताम्रवती । मग आपुल्यातें देईल सत्यवती ।
ऐसें सांगुनि तयाप्रती । तुष्ट करीं चित्तातें ॥ १३६ ॥
ऐसे कमठा नरेंद्रोत्तमें । सांगोनि दिला उत्तरनेम ।
तुष्ट करोनि मनोधर्म । बोळविला कमठ तो ॥ १३७ ॥
मग तुष्ट होवोनि कमठ चित्तीं । जाता झाला सदनाप्रती ।
तों अस्ताचळा पावोनि गभस्ती । महीं रात्र संचरली ॥ १३८ ॥
रात्र झाली दोन प्रहर । तंव गर्दभ बोले उत्तर ।
हे कमठा तूं नरेश्र्वर । सत्यवती दे मातें ॥ १३९ ॥
ऐसें बोलतां पशु युक्तीं । कमठ उत्तर दे तयाप्रती ।
म्हणे महाराजा नृपाप्रती । श्रुत केलें आहे मीं ॥ १४० ॥
श्रुत केल्यावरी प्रत्युत्तर । रायें दिधलें अनिवार ।
कीं ताम्रधातूचें मिथुळानगर । करुनि द्यावें आमुते ॥ १४१ ॥
ग्राम झालिया ताम्रसदनी । अर्पीन त्यातें नंदिनी । 
ऐसिया बोलप्रकरणीं । बोलिला आहे नरेंद्र तो ॥ १४२ ॥
तरी ऐसिया बोला सरळ । असेल कांहीं दावा कळा ।
तुष्ट करोनि नरेंद्रपाळा । सत्यवती वरावी ॥ १४३ ॥
त्यातें ताम्रवती देवोन । ग्रहण करावें कन्यारत्न ।
जैसें दानवां सुरा देवोन । पीयुष घेतलें देवांनीं ॥ १४४ ॥     
किंवा कष्टातें कचें ओपूनी । हरोनि गेला संजीवनी ।
तेवीं रायातें तुष्ट करोनि । सत्यवती हरीं कां ॥ १४५ ॥
तरी कांच देवोनि पाच घेणें । हें तों बुद्धिमंतलक्षण ।
असेल कांहीं या प्रमाण । करुनि दावीं महाराजा ॥ १४६ ॥
ऐशी कमठ बोलतां उक्ती । हास्य करी गंधर्वपती ।
म्हणे रायाची विशाळ मती । नव्हे कमठा या प्रकरणीं ॥ १४७ ॥
अरे हेमतगटीं रत्नकोंदणीं । जरी तो आराधिता वाणी ।
तरी करोनि देतों येचि क्षणीं । अमरनगरीसमान कीं ॥ १४८ ॥
कीं सबळ शक्राची संपत्ती । आणूनि देतो तयाप्रती ।
तेथें मागणें ताम्रवती । अदैवपणीं हें काय ॥ १४९ ॥
असें सकळ काननाब्धिसुरभिरत्न । कल्पतरु आदि चौदा करुनि ।
तैं ताम्रवती मागणें वाणी । अदैववाणी हें काय ॥ १५० ॥
कीं सुरभि अब्धिरत्न । मागतां देतो आणून ।
तेथें ताम्रवती नगर पूर्ण । अदैववाणी हें काय ॥ १५१ ॥
कीं रेवाकाननींचे पाषाण । निधि चिंतामणि देतों करुन ।
तैं ताम्रवती नगर मागोन । अदैवपणें हें काय ॥ १५२ ॥ 
तरी आतां असो कैसें । जैसें ज्याचें संचित असे । 
तैसी बुद्धी होय प्रकाश । प्रारब्धबळें अनुक्रमें ॥ १५३ ॥
तरी कमठा अति निगुतीं । जावोनि सांगावें रायाप्रती ।
कीं मिथुळाग्राम ताम्रवती । ग्रहण करीं नरेंद्रा ॥ १५४ ॥
अवश्य म्हणोनि कुल्लाळ । जावोनि वंदिला मिथुळापाळ ।
म्हणे महाराजा भूपा कुशळ । बोलिला तें ऐकावें ॥ १५५ ॥
म्हणे सिद्ध करोनि सत्यवती । कृपें ओपिजे माझे हाती ।
आज रात्रीं ताम्रवती । निजदृष्टीं पहाशील ॥ १५६ ॥
ऐसें पशूचें वाग्वचन । कमठमुखें राव ऐकोनि ।
अवश्य कुल्लाळातें म्हणून । सदनातें पाठवी ॥ १५७ ॥
कुल्लाळ येतांची स्वधामा । म्हणे प्राज्ञिका गर्दभोत्तमा ।
राया सांगता ऐसा महिमा । स्वीकारिलें रायानें ॥ १५८ ॥
मग प्रत्यक्ष होतां विश्र्वकर्मा । म्हणे महाराजा गंधर्वोत्तमा । 
कवण कामिक काम तुम्हां । वेधलासे महाराजा ॥ १५९ ॥
येरु म्हणे विराटस्वरुपतनया । मुख्य माझी तों ब्रह्मकाया ।
काम उदेला गुरुराया । मिथुळा कीजे ताम्रवती ॥ १६० ॥
विश्र्वकर्मा तुझें नाम । तरी जाणसी सकळ विश्र्वाचें कर्म ।
कर्म ओपून जगद्रुम । सुपंथा पंथा लाविलें ॥ १६१ ॥
तरी सकळ कर्म निर्माणकर्ता । म्हणूनि विश्र्वकर्मा नाम शोभत ।
आहेस म्हणोनि त्या अर्थें । पाचारिलें तूतें मीं ॥ १६२ ॥
तरी जगदगुरु तूं कर्मपाड । निवारीं तूं माझें इतुकें सांकडे ।
ताम्रवती मिथुळाकोट । करुनि द्यावा महाराजा ॥ १६३ ॥
ऐसी ऐकतां गंधर्ववाणी । मागिले प्रहरीची यामिनी । 
विश्र्वकर्मा ग्रामधामीं । कृपा करोनि हांसतसे ॥ १६४ ॥
कृपादृष्टीं अविट करितां । ताम्रधातु ग्राम समस्त ।
व्याप्त धामें सर्वथा । ताम्रवर्णी लखलखति ॥ १६५ ॥
राजा-अंत्यजादिसवें सकळ । कोणी न उरला धामीं दुर्बळ ।
ताम्रवटिका सकळ स्थळ । ग्राम मिथुळा मिरवले ॥ १६६ ॥
ऐसें करोनि विश्र्वकर्मा । अदृश्य गेला आपुले धामा ।
येरीकडे उदयोत्तमा । होतां पाहती ग्रामजन ॥ १६७ ॥
तों ताम्रधातू अंगणसहित । धामें विराजलीं सुशोभित ।
ऐसें पाहतांचि अपरिमित । ठक पडलें जगासी ॥ १६८ ॥
म्हणती हे काय अपूर्व झालें । न घडे तेंचि घडूनि आलें ।
परी रायें पाहतांचि जाणवलें । खूणपरीक्षा चित्तातें ॥ १६९ ॥
मग मनांत म्हणे सत्यवर्मा । कन्या ओपितां सुकर्मा ।
परी लौकिक अति जगदुर्गमा । हेळणेतें पावेन मी ॥ १७० ॥
तरी हें जग दुर्गम नोहे भलें । द्विमुख सावज होऊनि बैसलें । 
पैशून्याचीं देखूनि पावलें । दंशावया धांवती ॥ १७१ ॥
तरी आतां गुप्तगुप्तें । कन्या ओपूनि कुल्लाळातें ।
स्वग्रामधामाकारणें विभक्त । दूरदेशीं वसवावा ॥ १७२ ॥
 ऐसा विचार योजूनि चित्तीं । मग पाचारुनि कमठाप्रती ।
लोकनिंदेच्या सकळार्थीं । सुचविलें तयातें ॥ १७३ ॥
म्हणे महाराजा कमठा ऐक । कन्या गर्दभा ओपितां देख ।
लोकनिंदा पतनशब्द चावार्क (धर्मनाश) । प्रविष्ट होईल भवनीं कीं ॥ १७४ ॥
तरी लावण्यचपळा सत्यवती । घेऊनि जावी सदनाप्रती ।
परी या गांवी न करुनि वस्ती । दूरदेशीं वसावें ॥ १७५ ॥
ऐसें बोलतां राव स्पष्ट । अवश्य म्हणे कुल्लाळ कमठ ।
मग सदनीं येऊनि संसारथाट । वस्त्रीं ग्रंथिका वाहिली ॥ १७६ ॥  
अर्क झाला अस्तमानीं । पुन्हां प्रवेशे राजसदनीं । 
म्हणे राया ग्रंथिका बांधुनी । सिद्ध आहे जावया ॥ १७७ ॥
राव पाचारुनि कन्या युवती । म्हणे पवित्र सत्यवती ।
तूतें अर्पिली देवाप्रती । स्वीकारावें तयातें ॥ १७८ ॥
म्हणशील परीक्षिलें कैसें । तरी मिथुळा ताम्रवती लेशें ।
क्षण न लोटतां केलें असे । तस्मात् देव निश्र्चयें तो ॥ १७९ ॥    
तरी तूं त्या स्वीकारुन । ओळखी आणिजे कोणाचा कोण । 
मीं तोचि परीक्षिला निश्र्चयेंकरुन । देवतारुपी गर्दभ तो ॥ १८० ॥
करिसी सहसा अनमान । तरी कायावाचामनेंकरुन । 
शुचि होऊनि उत्तीर्ण । उभयकुळां हेचि करीं ॥ १८१ ॥
जरी गर्दभ म्हणूनि अपमानिसी । तरी डाग लागेल मम कुळासी ।
आणि तो कोपला विपर्यासी । पतनशापा ओपील कीं ॥ १८२ ॥
तरी ऐसें करीं नंदिनी । युक्तिप्रयुक्तीं तयालागुनी । 
गर्दभदेहाचा त्याग करुनी । स्वस्वरुपीं मिरवीं कां ॥ १८३ ॥
तेणेंकरुनि उभयकुळपक्षीं । उद्धारार्थ मिरवेल दक्षी ।
तरी आतां शुद्धकांक्षी । कमठसदना सेवीं कां ॥ १८४ ॥
ऐसें बोलतां तीतें सदनीं । अवश्य म्हणूनि शुभाननी ।
मग कुल्लाळ गृहीं जात घेऊनी । निशीमाजी संचरली ॥ १८५ ॥
संचरली घरीं म्हणतां । बोट लावूनि दावीं भर्ता ।
सत्यवती ऐसें बोलतां । राव पुसे कमठातें ॥ १८६ ॥
राव पुसे कमठासी । दावितांचि राव लागे पायीं ।
म्हणे महाराजा हे जांवई । पाळण करीं कन्येचें ॥ १८७ ॥
ऐसें बोलतां तयापर । गर्दभ बोलता झाला उत्तर ।
राया तव भाग्य असे थोर । मी जांवई तुज असें ॥ १८८ ॥
पाहें माझी कळा गर्दभदेही । लोक यातें म्हणतील काई ।
परी हें असो निंदाप्रवाहीं । परीं धन्य भाग्य तुझें कीं ॥ १८९ ॥
राया तरीं ऐक मात । शक्रशापें गर्दभदेहांते । 
मी विचरतों कृत्रिममतें । नातरी सुरोचन गंधर्व मीं ॥ १९० ॥
मग मूळापासूनि समूळ कथा । सांगूनि तोषविलें नृपनाथा ।
ऐशी नृपें ऐकूनि वार्ता । तुष्ट चित्तीं मिरवला ॥ १९१ ॥
मग देऊनि लावण्यराशी । राव गेला स्वसदनासी ।
भर्ता देऊनि सत्यवतीसी । कुल्लाळातें प्रार्थूनियां ॥ १९२ ॥
राव जातां स्वसदनीं । कमठ सत्यवती घेऊनी ।
अवंतिकेचा मार्ग धरुनी । गमन करी रात्रीं तो ॥ १९३ ॥
असो आतां पुढिले अध्यायीं । सत्यवती करील कायी ।
तेचि कथा परिसावी । अवधान देऊनियां ॥ १९४ ॥
धुंडीसुत नरहरिवंशीं । मालू नटला संतसेवेसी ।
सेवाप्रसाद तयापाशीं । रात्रंदिन मागतसे ॥ १९५ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर ॥ पंचविंशतितमाध्याय गोड हा ॥ १९६ ॥  
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार पंचविशतितमाध्याय संपूर्णम् ॥
Shri Navanath Bhaktisar Adhyay 25 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय पंचविसावा (२५) 

Custom Search

No comments: