Thursday, March 10, 2016

Shri Navanath BhaktiSar Adhyay 28 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अठ्ठावीस (२८) भाग २/२


Shri Navanath BhaktiSar Adhyay 28 
One day Bhartari and Pingla were enjoying their company and talking how they love each other. All of a sudden Pingala told Bhartari that she wished to die earlier to Bhartari. She told him that she could not think living without Bhatari. Bhartari told her it was not in their hand and each one had to live own destiny. However he asked Pingala what should do if Bhartari dies earlier to her death. Immediately Pingla told him that if such thing hasppens then she would also end her life along with him. Bhartari then changed the subject. One day Bhartari went for hunting and thought that he would play mischief with Pingla. Hence he wet his dress in the blood of the dear and handed over to a messenger, asking him to carry it to Pingla and tell her that Bhartari was killed by the wild animals. The messanger did exactly what had been told to him by Bhartari. Pingala became very sad and she without enquiring anything further finished her life. Bhararti came in the village and knew that Pingla had finished her life after hearing that Bhartari had been killed by wild animals. Bhartari repented and knew what a bad thing he had done. He became sad and for more than 12 years stayed at the place calling Pingala, Pingla where she had ended her life. God Dattatreya sends Goraksha to Bhartari to bring him on the track of Nathpanth. What happened next will be told to us by Dhundisut Malu from Narahari family in the next 29th adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अठ्ठावीस (२८) भाग २/२ 
परी मातें दिसतें अहित । मूर्खपणा घेतला स्वपदरांत । 
ऐसी चिंता करीत । अवंतिके पातला ॥ १०१ ॥
परी यांत श्रोते कल्पना घेती । पिंगला दाहिली पावकशक्तीं ।
तेव्हां विक्रम नृपती । शोधा कैसा अंतरला ॥ १०२ ॥
आणि तो भृत्य आला वस्त्रें घेऊन । तेणें कैसें पाहिलें निर्वाण ।
तरी तो पिंगलेते वस्त्रें देऊन । आला होता अरण्यांत ॥ १०३ ॥
परी रायाची न पडूनि गांठी । कटक शोधितां महीपाटी ।
मग तो अस्तमान होतां शेवटीं । कटकालागीं मिळाला ॥ १०४ ॥
आणि त्या समयीं विक्रम नृपवरें । सेविलें होते मातुलघर ।
मिथुळेसी जाऊनि समाचार । सत्यवर्म्याचा घेतसे ॥ १०५ ॥
मग सुमतिप्रधान चमूसहित । शुभविक्रमरायादि प्रज्ञावंत ।
सकळ मंडळीही ज्ञानभरित । रायासवें गेली ती ॥ १०६ ॥   
गृहीं तितुकें स्त्रीमंडळ । ग्रामजनादि रक्षपाळ ।
सकळ अबुद्धि केवळ । ज्यांतें शक्ति नातुडली ॥ १०७ ॥
ऐसा समय आला घडून । तों त्यांतही घडलें अपार विघ्न ।
पिंगला अबुद्धिपणें रत्न । तैं देहान्त पावली ॥ १०८ ॥
असो पाहिली मार्गवाट । राव भर्तरी चमूनेट ।
येऊनि अवंतिकेनिकट । ग्रामद्वारीं संचरला ॥ १०९ ॥
तंव ते उठोनि द्वारपाळ । रायासमोर आले सकळ । 
आश्र्चर्य मानूनि उतावेळ । रायाप्रति वदताती ॥ ११० ॥
म्हणती परी कैसे रीतीं । नम्रोत्तरें मंजुळ करिती ।
मुजरे करुनि निवेदिती । पिंगलेचा वृत्तांत ॥ १११ ॥
म्हणती महाराजा दिनमणी । भृत्य एक आला वनांतूनी ।
तो दुश्र्चिन्ह वदोनि वाणी । ग्राम बुडविला शोकांत ॥ ११२ ॥
परी त्या शोकाची ऊर्ध्वनळी । सती पडली सुमतिबाळी ।
नरस्वामिनी पिंगला दवडिली । परत्र देशीं गेलीसे ॥ ११३ ॥
तरी तियेची करुनि बोळवण । आतांचि गृहीं आले सकळ जन ।
स्मशानवाटिका झाली भस्म । एक प्रहर लोटला ॥ ११४ ॥
ऐसें राव ऐकतां वचन । परम घाबरलें अंतःकरण ।
मग सुखासनांतूनि उडी टाकून । स्मशानवाटिका पातला ॥ ११५ ॥
पातला परी आक्रंदत । अट्टहासें शब्द करीत ।
अति लगबगें धांवत । स्मशानवाटिकेजवळी पैं ॥ ११६ ॥
पातला परी चमू मागें । करीत जातसे अति लाग ।
सकळ कुळवृद्ध योग । रायालागीं कवळिती ॥ ११७ ॥
राव जातां स्मशानमहीसी । पहात पिंगलेचे चितेसी ।
राव विरागी होऊनं मानसीं । उडी टाकूं म्हणतसे ॥ ११८ ॥
परी ते चमूमेळींचे गृहस्थ थोर । रायासी कवळूनि धरिती समग्र ।
स्मशानकुंडीचा वैश्र्वानर वेष्टूनिया बैसले ॥ ११९ ॥ 
परी राव ते उद्देशी । प्राणघात इच्छी मानसीं ।
परी वेष्टन पडतां शरीरासी । उपाय कांहीं चालेना ॥ १२० ॥
मग बैसल्या ठायीं आरंबळत । महीं मस्तकातें आपटीत ।
हृदय पिटूनि शोक करीत । मूर्च्छनेलागी पावतसे ॥ १२१ ॥
मूच्छा गेलिया पुन्हां उठत । अग्नीं आहुती द्यावया पहात । 
परी अपार जनांचें वेष्टन बहुत । बळ कांहीं चालेना ॥ १२२ ॥
उर्ध्व करुनि आपुला माथा । घडीघडी पाहे पिंगलाचिता ।
अहा म्हणोनि भाळ तत्त्वतां । महीलागीं आफळीतसे ॥ १२३ ॥
आफळूनि आठवी पिंगलेचें गुण । म्हणे कैसी वो गेलीस मज सांडून ।
माते मृत्युमहीं ठेवून । परत्र कैसी झालीस ॥ १२४ ॥  
हे पिंगले तुझें मन । गमत नव्हतें मजवांचून ।
आतां कैसी निष्ठुर होऊन । परत्रदेशीं गेलीस तूं ॥ १२५ ॥
हे पिंगले तुझा मी पती । नव्हतों शत्रु होतों या जगतीं ।
कैसें जल्पूनि कुडेमती । भस्म तूतें म्यां केले ॥ १२६ ॥
अहा मी पतित दुष्ट दुर्जन । मूढमतीनें घेतला प्राण ।
तरी मी तुझा शत्रु पूर्ण । पति न म्हणें पिंगलें ॥ १२७ ॥
ऐसें म्हणोनि अंग धरणीं । टाकी हा हा शब्द करोनी ।
हृदय पिटी दणाणोनी । महीं मस्तक आफळीतसे ॥ १२८ ॥
अहा पिंगले म्हणोन । हांक मारी अट्टहासेंकरुन ।
अहा पिंगलें एकदा तव वदन । मज दृष्टी दावीं कां ॥ १२९ ॥
अहा पिंगले परत्रभुवनीं । गेलीस मातें तूं सांडोनी ।
हृदय पिटी दणाणोनी । महीं मस्तक आफळीतसे ॥ १३० ॥   
हे पिंगले आसनी शयनीं । मज बैसवीत होतीस अंतःकरणीं ।
आतां माझा विसर धरोनी । कैसी रहासी परत्र ॥ १३१ ॥
अहा पिंगले तुजवांचून । सर्वत्र मातें दिशा शून्य । 
अहा पिंगला माझा प्राण । कुडी टाकून गेलासे ॥ १३२ ॥
 अहा पिंगले तुजवांचून । सर्वत्र मातें दिशा शून्य । 
शून्यमंदिरीं निद्राशयन । कैसें येईल सांग पां ॥ १३३ ॥
अहा पिंगले माझी अधिक । जाणत होतीस तृषाभूक ।
आतां निष्ठूर मन केलें निक । कैसी सांडोनि तूं ॥ १३४ ॥
अहा पिंगलें माझे शयनीं । होतीस मृदुभाषणें करुनी ।
पाहतां उर्वशी दिसे नयनीं । संतोष माझा होतसे ॥ १३५ ॥
ऐसें पाहुनि सुगंध द्रव्य मी । रुंजी घालीं षट्पदकामीं ।
ऐसें सुख सरितासंगमीं । सुख कोठें पाहूं आतां ॥ १३६ ॥
यापरी पिंगले तव गुण । दयेचें भांडार मुक्त करुन ।
कीं जगाचें करिसी पालन । धर्मानुकूळें सर्वस्वी ॥ १३७ ॥
ऐसिया प्रज्ञेचे पहुडपण । पिंगले कोठें मी जाऊन । 
ऐसें म्हणूनि धडाडून । धरणीं अंग सांडीतसें ॥ १३८ ॥
यापरी सर्व जाणोनि लोक । रायाचा पाहूनि शोक । 
गहिंवर येतसे आणीक । शोकशब्देंकरुनियां ॥ १३९ ॥
कीं तरु मलयागरा । गंधी मिरवती समग्रा ।
तैसें रायाच्या शोकपारा । शोकें व्याकुळित जाहले ॥ १४० ॥
असो हा ग्रामांत वृत्तान्त सकळां । कळला परी सुखवसा झाला ।
जैसा प्राण जावोनि आला । शवशरीरा पुन्हां कीं ॥ १४१ ॥
मग गावींचे ग्रामजन । स्मशानाजवळी आले धांवोन ।
परी रायाचा शोक पाहून । तेही तैसेचि होती पैं ॥ १४२ ॥
परी तो मायिक सहजस्थितीं । दुःखरहित शोकावरती ।
जैसे बहुरुपी खेळाप्रती । शूरत्व मिरवती अपार ॥ १४३ ॥
कीं गुजरदेशीं चाल सघन । रुदन घेती मोल देऊन ।
तैसे घरचे सर्व जन । येती प्रेतसंस्कार करावया ॥ १४४ ॥
तन्न्यायें शोक करीत । राव पडला शोकार्णवांत । 
न वर्णवे तो आकांत । अल्प येथें वर्णिला ॥ १४५ ॥
असो ऐसी रुदनस्थिती । ज्याची त्याला माया चित्तीं ।
परी ते लोक अभावनीतीं । समजाविती रायातें ॥ १४६ ॥
तुम्ही सर्वज्ञ सकळराशी । बोध करितां अन्य जनांसी ।
होऊनि गेलें होणारासी । आश्र्चर्य याचें कायसें ॥ १४७ ॥
म्हणती महाराजा भविष्योत्तर । होऊनि गेलें तें होणार ।
तयाचा शोक करणें चतुर । योग्य आम्हां दिसेना ॥ १४८ ॥
अशाश्र्वताचा शोक करणें । तरी काय शाश्र्वत आपुलें जिणें ।
पिंगला गेली आपणही जाणे । कदाकाळीं सुटेना ॥ १४९ ॥
पहा आपुले पूर्वज अपार । मृत्यु पावले समग्र ।
एकामागें एक सर्वत्र । गेले न राहिले मेदिनीं ॥ १५० ॥
कीं आजा गेला नातू उरला । ऐसा कोणीं पाहिला ।
तरी अशाश्र्वताचा घट भरला । रिता होय क्षणमात्रें ॥ १५१ ॥
तरी हें सकळ अशाश्र्वतपण । पूर्ण मानिती ज्ञानवान ।
तरी तयाचा शोक करुन । व्यर्थें जीवा कष्टवितां ॥ १५२ ॥
अहा पाहती जपी तपी । सिद्ध साधक नानारुपी ।
शांकोण वांचले देहसंकल्पीं । मृत्युभुवनीं महाराजा ॥ १५३ ॥
तरी जी जी जाईल घडी । ती सुखाचीच मानावी प्रौढी ।
ईश्र्वर नामीं ठेवूनि गोडी । चित्त स्थिर असावें ॥ १५४ ॥
ऐसें बोधितां सर्वही जग । युक्तीप्रयुक्तीं नानाबोध ।
परी रायाचें हृदय चांग । शोककाजळी उजळेना ॥ १५५ ॥                  
मग ते ग्रामींचे सकळ जन । थकित झाले बोध करुन ।
एकामागें एक उठोन । आपुल्या सदना सेविती ॥ १५६ ॥
असो तीही लोटली रात्री । उदया आला गभस्ती ।
पिंगलाचितेची पाहूनि शांती । पावक झाला अदृश्य ॥ १५७ ॥
मग तो मानूनि दुसरा दिन । पुन्हां पातले आप्तजन । 
उत्तरक्रिया संपादोन । अस्थिमीलन केलें तैं ॥ १५८ ॥
तें भर्तरीरावें पाहून । चित्तीं विचार करितां पूर्ण ।
घेऊं देईना अस्थिसंचयन । स्पर्श कोणा न करवी ॥ १५९ ॥
आपण बैसूनि चिता रक्षीत । कोणा लावूं देईना हात । 
मग ते आप्त जन समस्त । पुन्हां गेले माघारे ॥ १६० ॥
परी तो राव तैसाचि चितेंत । बैसता झाला दिवसरात ।
अन्नपाणी त्यजूनि समस्त । पिंगला पिंगला म्हणतसे ॥ १६१ ॥
मग हें निर्वाणींचें वर्तमान । मिथुळेसी दूत सांगती जाऊन ।
राव विक्रम करितां श्रवण । निघता झाला तेथोनी ॥ १६२ ॥
सत्यवर्मादि शुभविक्रम । विक्रमादि सुमति प्रधान । 
परम शोकार्णव रचून । अवंतिके पातले ॥ १६३ ॥
मग येतांचि स्मशानवाटीं । पिंगला आणूनि चित्तदृष्टी ।
परम शोकें जाहला कष्टी । शोकसिंधूंत निमग्न ॥ १६४ ॥
आठवी कन्येचे सर्व गुण । म्हणे मम हातींचें गेलें निधान । 
विक्तम म्हणे मम गृहींचें रत्न । काळतस्करें नेलें कीं ॥ १६५ ॥
अहा माउली उभयकुळांत । तारक झाली भवसरितेंत ।
पुन्हां दीपाची लावी वात । अदृष्य कैसी झाली वो ॥ १६६ ॥
अहा स्त्रीकटकीं अंतःपुरीं । मुख्य मिरवीत होती सज्ञानलहरी ।
जैसा हस्ती चमूभीतरी । चांगुलपण दावीतसे ॥ १६७ ॥
रुपवंत गुणवंत । सर्व लक्षणीं ज्ञानवंत ।
सूचक सदा सर्वकाळ संगोपीत । चित्त सकळांचें लक्षी कीं ॥ १६८ ॥
ऐसे आठवोनि नाना गुण । शोक करी अति दारुण ।
मग विक्रम नृपति पुढें होऊन । भर्तरीलागीं समजावी ॥ १६९ ॥
नाना युक्ती नाना वचन । भर्तरीचें बोधी मन । 
परी तो नायके पिसाटपण । पिंगला वदतसे ॥ १७० ॥
परी राव बोध करितां उत्तम । लोटूनि गेला दिन दशम ।
मग विक्रमें उत्तरक्रिया करुन । शुचिर्भूत जाहला ॥ १७१ ॥
यापरी पुढें तेरावें दिवशीं । जातिभोजन दानमानेंसीं । 
सर्व उरकोनि राज्यासनासी । घेऊनि राव बैसला ॥ १७२ ॥
भर्तरी न सोडी स्मशानवाटिका । धरुनि बैसला अचळ निका ।
जैसा वृंदे धरुनि हेका । विष्णु बैसला स्मशानीं ॥ १७३ ॥
ऐसेपरी अचलपण । मिरवता झाला मित्रनंदन ।
परी नित्य नित्य विक्रम येऊन । बोध त्यातें करीतसे ॥ १७४ ॥
ऐसा बोध करितां नित्य । द्वादश वर्षें लोटली सत्य ।
पूर्ण तृण भक्षूनि जीवित । उदक आहारें राखिलें ॥ १७५ ॥
अहा देवा अनाथनाथा । कैसें केलें त्वां अनंता ।
पिंगला माझी सगुण कांता । तूतें कैसी आवडली ॥ १७६ ॥
ऐसें म्हणोनि नामोच्चार । शोक करीतसे वारंवार ।
रात्रंदिवस चित्तीं विसर । पिंगलेचा पडेना ॥ १७७ ॥
कृश शरीर झालें तेणें । कंठीं उरलासे प्राण ।
मुखीं आणूनि हरीचें नाम । शोकें पिंगला वदतसे ॥ १७८ ॥
ऐसीं लोटलीं द्वादश वर्षें । शुचिष्मंत झालें शरीर ।
तें पाहूनियां अति क्लेश । मित्रावरुणी द्रवलासे ॥ १७९ ॥
पुत्रमोहाचें अपार भरतें । लोट लोटले चित्तसरिते । 
मग मित्रावरुणी तुष्टोंनि मनांत । अत्रिजानिकटीं पातला ॥ १८० ॥
तंव तो प्राज्ञिक अत्रिनंदन । मित्रावरुणीसी सन्मान देऊन ।
म्हणे महाराजा कामना कोण । धरुनि येथें आलासी ॥ १८१ ॥
येरी म्हणे जी द्विजोत्तमा । ज्ञानलतिकेच्या फलद्रुमा । 
जाणत असूनि पुससी आम्हां । अज्ञानत्व घेऊनी ॥ १८२ ॥
तरी तव शिष्य जो भर्तरी । त्याची कैसी झाली परी । 
तें हृदयीं आणूनि हितातें वरीं । विलोकी कां महाराजा ॥ १८३ ॥
मग तो महाराज ज्ञानवान । हृदयीं पाहे विचारुन ।
तों विपत्काळीं शोकेंकरुन । भर्तरीनाथ मिरवला ॥ १८४ ॥
अति क्लेश तयाचे पाहून । परम द्रवला मोहेंकरुन ।
मग मित्रावरुणीतें बोले वचन । चिंता न करीं महाराजा ॥ १८५ ॥
तुम्हीं जावें स्वस्थानासी । मी भर्तरीचे आहे उद्देशीं ।
स्वहित करीन चिंता मानसीं । पाळूं नका महाराजा ॥ १८६ ॥
माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ । तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत ।
तो महीं भ्रमतो करीत तीर्थ । येथें येईल महाराजा ॥ १८७ ॥
तो परम आहे प्रज्ञावान । तयासी तेथें पाठवीन ।
तो नाना प्रयुक्तीं करुन । शुद्धपंथा आणील कीं ॥ १८८ ॥
ऐसें बोलतां मित्रावरुणीसी । संतोषें मिरवला तो चित्तासी ।
मग पुसूनि अनसूयात्मजासी । स्वस्थानासी पैं गेला ॥ १८९ ॥
यावरी पुढील अध्यायीं कथा सुंदर । अध्यात्मदीपिका मनोहर ।
मालू सांगे धुंडीकुमर । नरहरिकृपेंकरोनियां ॥ १९० ॥
दत्त सांगेल गोरक्षनाथा । गोरक्ष येऊनि विरहसरिता । 
शोषण करील तत्त्वतां । घटोद्भवाचे (अगस्ती) कृपेनें ॥ १९१ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । अष्टविंशतितमाध्याय गोड हा ॥ १९२ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार अष्टविंशतितमाध्याय संपूर्ण ॥ 
Shri Navanath BhaktiSar Adhyay 28  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अठ्ठावीस (२८) 

Custom Search

No comments: