Shri Navanath BhaktiSar Adhyay 29
God Datta told Goraksha to meet Bhartari and follow the nathpanth. Earlier Bhartari had agreed to do so after 12 years since God Datta had given him Diksha. Goraksha met Bhartari and shown him how his sorrow of losing his wife Pingla was destroying his life. With the example of a bottle he showed Bhartari that everything including body is vanish able thing. Further he made hundreds of Pingla alive by using his Mantra-Vidya. Bhartari talked with Pingla. She also told her that she was now enjoying Moksha. Nothing is permanent in this world. Bhartari realised and went to Girnar to meet God Datta with Goraksha for further sadhana of Natha-Pantha. What happened next would be told by Dhundisut Malu from Narahari Family in the 30th Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकोणतीसावा (२९) भाग २/२
यापरी माझा काम चित्तीं । वरुनि आचरलां संसारनीती ।
परी मुक्तिमोक्षाची मांदुस हातीं । चढणार नाहीं महाराजा ॥ १०१ ॥
मी पिंगला तुमची कांता । आचार आचरलें पतिव्रता ।
तेणें डौरवोनि श्रीवरें माथा । दिधलें हिता मजलागीं ॥ १०२ ॥
आतां तुमचे सर्व हित । तुम्ही विलोका प्रज्ञावंत ।
मी तुमची दासी तुम्हां संमत । चालूं शकें महाराजा ॥ १०३ ॥
ऐसें वदोनि निवांतपणीं । पिंगला बैसली राव वेष्टोनी ।
परी तो चमत्कार पाहोनी । विस्मय त्यासी वाटला ॥ १०४ ॥
मग धांवूनि गोरक्षचरणीं । लोटूं पाहे दंडवत अवनीं ।
परी सर्वज्ञ गोरक्ष धरुनि पाणी । रायाप्रती बोलतसे ॥ १०५ ॥
हे महाराज महीपाळ । माझा गुरु जो मच्छिंद्रबाळ ।
मच्छिंद्रनामें प्रतापशीळ । शिष्य आहे दत्ताचा ॥ १०६ ॥
तरी यापूर्वीं तुझिया देहीं । दत्तानुग्रह लाधला पाहीं ।
तरी तूं मच्छिंद्रसहोदर महीं । गुरु माझा अससी कीं ॥ १०७ ॥
तरी तूं वंद्य आहेसी मातें । म्हणोनि नमना अनुचित ।
तरी माझा साष्टांग प्रणिपात । तव चरणीं असो कीं ॥ १०८ ॥
तरी राया सद्गुरुभ्राता । सांग कीं कामना केवीं उद्भवली चित्ता ।
राज्यवैभव संसारदुहिता । पिंगला भोगूं इच्छितसे ॥ १०९ ॥
किंवा सोडूनि सकळ संपत्ती । कामनाविरह वैराग्य चित्तीं ।
आचरुं ऐसी बोधमती । तरी स्थिति सांगें कीं ॥ ११० ॥
जैसी कामना असे चित्ता । तैसीच लाभेल तेजभरिता ।
ऐसें बोलतां गोरक्षनाथा । राव बोले उत्तर ॥ १११ ॥
म्हणे महाराजा द्वादश वरुषां । बैसलों पिंगला उद्देशा ।
परी पिंगला स्वरुपास । प्राप्त झाली नाहीं कीं ॥ ११२ ॥
तरी येऊनि त्वरितात्वरित । पिंगला दाविल्या शतानुशत ।
तरी ऐसें सबळ सामर्थ्य । राज्यपदीं दिसेना ॥ ११३ ॥
मी पूर्वींच भ्रांतीं वेष्टिलों । श्रीगुरुचे हातापासूनि निसटलों ।
निसटलों परी कष्टलों । संसारतापामाझारीं ॥ ११४ ॥
तरी आतां कृपाघन । दत्तदर्शनाचें अपार जीवन ।
मज चातका करीं पान । कृपाघन महाराजा ॥ ११५ ॥
आतां मातें संसारराहणी । राजवैभव सुखावणीं ।
तुच्छ लागे योगधर्मी । प्रतापानें हीन तें ॥ ११६ ॥
धन्य तूं एक प्रत्ययास । पिंगला दाविली चमत्कारास ।
जेवीं आवडीं कुरुपाळास । कौरवदर्शना दाविलें ॥ ११७ ॥
तैसें पूर्ण कथेंत । दर्शन करविलें मातें तेथ ।
तरी मी न राहें भवभ्रांतींत । वेष्टोनियां महाराजा ॥ ११८ ॥
आतां आचरेन पूर्ण योगा । साधीन सकळ कलांसीं प्रयोगा ।
माझा स्वामी अनसूयाकुशिगा । रत्न मातें दावीं कां ॥ ११९ ॥
गोरक्ष म्हणे विरहें नृपाळा । मनीं वरिली आहे पिंगला ।
तरी लक्षावधी प्राप्त या वेळा । तूतें झाल्या महाराजा ॥ १२० ॥
तरी तितुक्या भोगूनि आतां । संतुष्ट करीं आपुल्या चित्ता ।
येरु म्हणे एकीकरितां । दुःख इतुकें भोगिलें ॥ १२१ ॥
मग लक्षावधी भोगून । तयांचें दुःख अवर्णन ।
कोणीं भोगावें चंद्रार्कमान । अवधीतें सांडोनियां ॥ १२२ ॥
एक वृश्र्चिक दंशिल्या अंगा । वेदना होती भोगा ।
त्यांत लक्षानुलक्ष सुयोगा । दंशिल्या काय सांगावें ॥ १२३ ॥
तरी आतां असो कैसें । पुन्हां अदृश्य करीं पिंगलेस ।
आणि तूं राज्यवैभवास । सांभाळ करीं महाराजा ॥ १२४ ॥
तरी माझिया स्वामीचे चरण । आतां दावीं मजकारण ।
इतुका उपकार करुन । कीर्तिध्वजा मिरवीं कां ॥ १२५ ॥
मग अवश्य म्हणे गोरक्षसुत । करी अदृश्य पिंगला समस्त ।
मग धरोनि भर्तरीनाथाचा हस्त । नगरामाजी आणिला ॥ १२६ ॥
आणिला तेव्हां हर्ष समस्तां । लोटती झाली आनंदसरिता ।
विक्रमरायानें माथा । गोरक्षचरणीं ठेविला ॥ १२७ ॥
रायें बैसवोनि कनकासनीं । षोडशोपचारें पूजिला मुनी ।
मग जोडोनियां पाणी (हात) । गोरक्षकातें पुसतसे ॥ १२८ ॥
म्हणे महाराजा मम भ्राता । पिंगलाविरहें पेटल्या चित्ता ।
कैसा आणिला देहावरता । तरी ती कथा सांगावी ॥ १२९ ॥
मग रायातें सांगूनि सकळ कथन । तुष्ट केला मनोधर्म ।
उपरी वैराग्यसंकेत पावून । पुढील कार्य सांगीतले ॥ १३० ॥
परी विक्रम तो सर्व मर्मज्ञ । तुष्टतांचि मिरवी मनोधर्म ।
यावरी बोलतां झाला वचन । गोरक्षकातें तेधवां ॥ १३१ ॥
हे महाराजा कृपामूर्ती । आपण बरीच योजिली युक्ती ।
परी आपण येथ षण्मास वस्ती । भ्रात्या समवेत करावी ॥ १३२ ॥
म्हणाल तरी काय कारण । तरी द्वादश वर्षें सोडिलें अन्न ।
तेणें कृश शरीर होऊन । प्राण डोळां उरलासे ॥ १३३ ॥
म्हणोनि आपणां विनंतिपात्र । पुढें वाढितों पवित्र ।
तरी ते स्वाद्वन्न सेवोनि चित्र । मम मानसा पोसावें ॥ १३४ ॥
यावरी बोले गोरक्षजती । जाणत आहे माझे चित्तीं ।
परी नेणों यावरी पुढें मती । कैसी होईल रायाची ॥ १३५ ॥
त्याकरितां तप्तातप्त । देईन रायाचे हाती हित ।
आतां राहणे योग्य मातें । दिसत नाहीं महाराजा ॥ १३६ ॥
ऐसें विक्रमा गोरक्ष बोलोन । प्रविष्ट झाले सकळांकारण ।
द्वादशशतें राण्या आदिकरोन । वृत्तान्त त्यांतें समजला ॥ १३७ ॥
मग तें असुख मानूनि चित्तीं । शोकें युवती विव्हळ होती ।
गोरक्षातें शिव्या देती । मेला मेला म्हणूनियां ॥ १३८ ॥
नाना वल्गना बोलती ऐसी । म्हणती होता दृष्टीसरसीं ।
मेल्यानें येऊनि घातलें फांशीं । दूरदेशीं न्यावया ॥ १३९ ॥
तरी याचें जळो वदन । नेतो आमुचे सौभाग्यरत्न ।
ऐसें म्हणोनि म्लानवदन । रुदनातें दाविती ॥ १४० ॥
असो यापरी विक्रमाकरितां । त्रिरात्र झाला राहता ।
मग भर्तरी गोरक्ष उभयतां । निघते झाले तेथोनी ॥ १४१ ॥
राव विक्रमा आनंद चित्तीं । उभयतांचे येऊनि संगतीं ।
बोळवीतसे अति प्रीतीं । गोरक्षातें वंदूनियां ॥ १४२ ॥
परी स्त्रियांचे कटकांत (समुदायांत) । थोर ओढवला आकांत ।
शरीर टाकूनि भूमीवरतें । आरंबळती अट्टहास्यें ॥ १४३ ॥
आठवोनि रायाचे निपुण गुण । स्त्रिया करिती अट्टहास्यें रुदन ।
म्हणती आमुचा गेला प्राण । रावशरीरीं मिरवला ॥ १४४ ॥
येरीकडे गोरक्षनाथ । भर्तरी आणि विक्रमासहित ।
अपार मंडळ प्रज्ञावंत । गांवाबाहेर पातले ॥ १४५ ॥
तों गोरक्ष पुसे भर्तरीतें । कीं राज्यवैभव अत्युद्भुत ।
यांत मानस जरी गुंडाळत । असेल तरी मज सांग ॥ १४६ ॥
ऐसी ऐकोनि गोरक्षवार्ता । भर्तरी बोले प्रांजळ अर्था ।
हे महाराजा वैभव नलगे चित्ता । योग आचरुं वाटतसे ॥ १४७ ॥
राज्यवैभव कनककामिनी । वाटलें मातें नीच वमनाहुनी (ओकारी) ।
लक्ष लावोनि श्रीगुरुचरणीं । प्रचीत (अनुभव) घेऊनि वहिवाटला ॥ १४८ ॥
मग आपुली शैली शिंगी कंथा । देता झाला राया यशवंता ।
भिक्षाझोळी घेऊनि हाता । कुबडी फावडी ओपीतसे ॥ १४९ ॥
ऐसिया सरंजामेंकरुन । रायासी बोलता झाला वचन ।
वैभव मानसीं वमनासमान । तरी प्रचीत दावीं कां ॥ १५० ॥
तरी संचरोनि अंतःपुरांत । कामिनी तुझ्या द्वादश शत ।
त्या परक्या मानूनि चित्तांत । भिक्षा मागूनि येईं मम दृष्टी ॥ १५१ ॥
ऐसें ऐकूनि भर्तरीनाथ । अवश्य म्हणे काय आहे यांत ।
मग तैसाचि उठूनि कृतांतवत । अंतःपुरांत संचरला ॥ १५२ ॥
आदेश अलक्ष निरंजन । शब्द गाजवी सवालपण ।
शिंगी सारंगी वाजवोन । स्त्रियांचे सदनीं फिरतसे ॥ १५३ ॥
तों तें आधींच स्त्रीकटक । बैसलें होतें करीत शोक ।
याउपरी पाहूनि रायाचें मुख । आक्रंदती अट्टहास्यें ॥ १५४ ॥
एक धरणीवरी लोळती । एक कबरीकेश तोडिती ।
एक मृत्तिका मुखीं घालिती । मस्तक आपटिती धरणीये ॥ १५५ ॥
महीं आपटूनि कपाळ । रुधिरें व्यक्त करिती बंबाळ ।
एक उभयहस्तें वक्षःस्थळ । धबधबां पिटिती पैं ॥ १५६ ॥
एक रडती एक पडती । एक शोकें मूर्च्छित होती ।
परिचारिका धांवोनि हस्तीं । सावध करिती तयांतें ॥ १५७ ॥
एक म्हणे रायासमान । उपरी न देखों शतजन्म ।
अहा रायाचें मायिक धन । मायेहूनि आगळिक ॥ १५८ ॥
एक म्हणती अहा राव । कैसा मिटला आमुचा भाव ।
अहा विधात्या आमुचें दैव । कैसें रेखिलें निजभाळा ॥ १५९ ॥
जैं वत्सालागीं गाय । एक घडी न टाकूनि जाय ।
त्याचि नीतीं तो पतिराय । होय माय आमुचा ॥ १६० ॥
अगे स्नेहेंकरुनि एकशयनीं । परमस्नेहाचे चांगुलपणीं ।
किंचित कोमाइलें पहात वदनीं । अर्थ पुसे तयाचा ॥ १६१ ॥
पुसे परी इष्टार्थासमान । राव पूर्ण करी स्नेहेंकरुन ।
जैसी माय करी कन्येकारण । तैसा लळा पाळीतसे ॥ १६२ ॥
ऐसी माया जयाचे चित्तीं । तो आतां होऊनि निष्ठुरमती ।
कैसा जातसे अदृश्य क्षितीं । आम्हां वश करुनियां ॥ १६३ ॥
तरी आतां अर्थहीन । राया जातात आमुचे प्राण ।
आम्हां निढळवाणी (निराक्षित) करुन । अघोर रानीं सोडिसी ॥ १६४ ॥
ऐसें म्हणोनि आरंबळती । उलथोनि महीवरती पडती ।
पुन्हां उठोनि रायासी पाहती । दैन्यवाणी शरीरें ॥ १६५ ॥
मग म्हणती अहा जी राव । मिरवत होतासी कैसा भाव ।
कीं महीलागीं कामदेव । अवतार दुसरा दिसतसे ॥ १६६ ॥
अहा राजाचें वैभववर्णन । ठेंगणा वाटतसे सहस्त्रनयन ।
तो कृशशरीर दैन्यवाणा । भिक्षा मागे घरोघरीं ॥ १६७ ॥
ऐसें बोलूनि पहात त्यातें । पुन्हां सांडिती शरीरातें ।
मग सकळ उठोनि रायातें । वेष्टन घातलें स्त्रियांनीं ॥ १६८ ॥
म्हणती राया आम्हां सांडून । दूर देशीं नको करुं गमन ।
येथेंचि पाहूनि चंद्रवदन । तुष्ट होतों आम्ही कीं ॥ १६९ ॥
तरी आतां निःस्पृह निराश । दाही दिशा पडल्या उदास ।
तरी मुक्त करुनि आमुच्या प्राणांस । पाऊल मग पुढें ठेवावें ॥ १७० ॥
ऐसें बोलतां राया मनीं । संचरला क्रोधद्विमूर्धनी ।
मग कुबडी उगारोनी । निघता झाला माघारा ॥ १७१ ॥
परी तो गोरक्ष गुप्तहेर । पाहात होता चमत्कार ।
राव निघतां त्यजूनि स्त्रिया सत्वर । मान तुकावी गोरक्ष ॥ १७२ ॥
असो भर्तरी सहजस्थितीं । निघतां मागें त्या युवती ।
आरंबळोनि पाठीं येती । नको जाऊं म्हणोनिया ॥ १७३ ॥
आज द्वादश वर्षेंपर्यंत । बैसला होतासी स्मशानांत ।
आतां जोग आचरण करुनि वनांत । तैसाचि येथें राहें कां ॥ १७४ ॥
परी तो राव सकळ सांडोन । गांवाबाहेर आला परतोन ।
येरीकडे विक्रम उज्जयिनीं । स्त्रिया गेल्या स्वस्थाना ॥ १७५ ॥
यापरी गोरक्ष भर्तरीनाथ । पुसोनि निघाले विक्रमातें ।
मग पदीं पदीं दुरवा होत । अर्ध कोस पैं गेले ॥ १७६ ॥
येरीकडे विक्रम नृपती । परतोनि आला स्वस्थानाप्रती ।
परी अट्टहास्य पाहूनि अंतःपुराप्रती । संचार करिता पैं झाला ॥ १७७ ॥
मग माय बहिणी कन्यासमान । सकळां तोषवी बोध करुन ।
येरीकडे उभय जन । मार्गाप्रती गमताती ॥ १७८ ॥
परी कृशशरीरीं भर्तरीनाथ । अशक्त पद ठेवी कंठेना पंथ ।
मग व्यानअस्त्र भस्मचिमुटींत । स्थापिता झाला गोरक्ष ॥ १७९ ॥
मग तें भस्म चर्चितां भाळीं । झडूनि गेली अशक्तकाजळी ।
मग क्षण पातीं लागतां डोळीं । गिरनारपर्वतीं पोंचला ॥ १८० ॥
तों जातां देखे अत्रिनंदन । पायीं लोटले उभय जन ।
मग मायें उभयतां कवळून । वरदइंदु कुरवाळी ॥ १८१ ॥
म्हणे वत्सा गोरक्षनाथा । भर्तरीकरितां शिणविलें तूतें ।
ऐसें म्हणोनि कुरवाळीत । वारंवार मुखातें ॥ १८२ ॥
त्याचि प्रकरणीं मोहस्थिती । राया भर्तरीतें संपादिती ।
म्हणे वत्सा श्रम बहुतीं । आणिलें येथें मम वत्सें ॥ १८३ ॥
असो स्थिति वृत्ति धृति सकळा । एकमेकांतें घोंटाळा ।
निवेदनीं चित्तीं संचियेला । तोषाप्रती तरी वरितील ॥ १८४ ॥
असो आतां तुष्टलक्षण । पुढील अध्यायीं सांगेल धुंडीनंदन ।
मालू नरहरिकृपेंकरुन । संतगणीं मिरवला ॥ १८५ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । नवविंशतितमाध्याय गोड हा ॥ १८६ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार नवविंशतितमाध्याय संपूर्ण ॥
Shri Navanath BhaktiSar Adhyay 29 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकोणतीसावा (२९)
Custom Search
No comments:
Post a Comment